एका कादंबरीची डायरी


Image result for images of diary with pen

परवा एक प्रकाशक भेटला. बोलता बोलता म्हणाला तुम्ही एक झकास कादंबरी लिहा . आपण कमीतकमी ५ तरी आवृत्त्या काढूच. जबरदस्त मार्केटिंग करू. त्यावर पिक्चर काढू , डेली सोप साठी पण प्रयत्न करू. आपल्या दोघांची जिंदगी बनून गेली पाहिजे. ही चर्चा फक्त चहावर झाल्याने मी ती उडवून लावली नाही. पण हवेत पण नाही उडायला लागलो.
एका आठवड्याने पुन्हा त्याचा फोन आला मग मात्र मी गंभीर पणे विचार करायला लागलो. तशा माझ्या दोन कादंबर्या प्रकाशित झालेल्या असल्याने थोडा आत्मविश्वास होताच. एखादा कथेचा प्लॉट निश्चित करायचा आणि लिहायला सुरुवात करायची. पुढे आपोआप कादंबरीचा प्रवास सुरु होतो. पण चार पाच दिवस उलटले तरी कथानकाचा प्लॉट तयार होत नव्हता. कारण कथानक असे पाहिजे की ज्याला रिपीट वाचक मिळाला पाहिजे. त्यात एखादा चित्रपट तयार होईल असे नाट्य हवे. शिवाय अनेक रोचक प्रसंगांची मालिका हवी जेणेकरून त्यावर मालिका करणे सोपे जाईल. आणि तसे कथानक काही सुचत नव्हते. शिवाय त्यावर बराच विचार करता येईल इतका वेळ पण नव्हता . जास्तीत जास्त दिवसाकाठी एखादा तास काढता येणार होता.
मग त्यावर एक तोडगा काढला. दिवसाकाठी जेवढा विचार होईल तेवढा एका डायरीत लिहायचा. मग पाहू काय होते ते? आणि मग डायरी मध्ये लिहायला सुरुवात केली.
दिवस १
ही कादंबरी नायिकाप्रधान असली पाहिजे. म्हणजे यात मेलोड्रामा येतो. स्त्रीचा संघर्ष हा जास्त भावतो. आणि फ्यामिली ड्रामा असलं म्हणजे बाहेरचा क्रूर आणि दुष्ट खलनायक पण लागत नाही. परिस्थिती आणि कुटुंबातील व्यक्तीच आलटून पालटून या भूमिका वठवतात.
दिवस २
आता या नायिकेचे वय काय हवे? मेलोड्रामा साठी ती वयस्कर असली पाहिजे. पण जर ग्लेमर पाहिजे तर ती तरुण असायला हवी. यावर उपाय म्हणजे कादंबरीचा काळ जास्त हवा म्हणजे जास्त भाग तारुण्यातील व थोडा उतार वयातील.
दिवस ३
आता या कादंबरीचा नायक कसा हवा? यात नाट्यासाठी दोन नायक हवेत. एक प्रियकर व दुसरा पती. पण हा अगदीच घिसा पिटा प्रकार झाला . काही तरी वेगळे आणि हटके पाहिजे.
दिवस ४
नायिकेचा लग्नानंतर काही दिवसांनी घटस्फोट होतो. पण तिला दरम्यान एक मुलगी झालेली असते. इथे ती वयात आल्या नंतर  डबल रोल करता येईल. इथे  घटस्फोटीत तरुण स्त्रीच्या संघर्षाचे अनेक पदर दाखवता येतील.
दिवस ५
कथानकात बदलाव आणण्यासाठी तिच्या आयुष्यात आणखी एक पुरुष येतो आणि तिच्या भाव विवशतेचा आणि परिस्थितीचा फायदा घेवून तिला अजून एक धक्का देतो आणि जगातील चांगुलपणावरील विश्वास उडतो. आणि जीवन संघर्ष टोकदार होतो.
दिवस ६
तिची मुलगी जशी वयात येते तसे तिचे भाव विश्व फुलपाखरासारखे रंगी बेरंगी तर नायिका आपल्या कोशात आपल्या टोकदार भूमिकेवर ठाम . परिणामी मुलगी जास्त बाहेर रमायला लागते .त्यामुळे जेव्हा ती घरी येते तेव्हा दोघींमध्ये फक्त वाद आणि भांडणे.
दिवस ७
एक दिवस अचानक नायिकेचा नवरा तिला भेटायला येतो.पण त्याचा हेतू मात्र तिच्या लक्षात येत नाही. कारण तिच्या बद्दल वा मुलीबद्दल प्रेम जिव्हाळा नसतोच. तो असताना मुलगी येते आणि तिरंगी भांडणाचा सामना.
दिवस ८
कुटुंबात सगळा कडवट पणा आणि सतत धुसफूस. भांडणे आणि नंतर रडारड.
दिवस ९
आता कथेत बदलाव. ही नेहेमीची भांडणे आणि वादावादी पाहून शेजारचे एक काका नायिकेला भेटायला येतात आणि तीन चार दिवसांच्या सतत बोलण्याने नायिकेच्या वागण्यात थोडा फरक पडतो. मग काका त्या मुलीशी पण सविस्तर बोलतात. यातूनएक निष्पन्न होते की आपापसात वाद घालून किंवा भांडणे करून परिस्थिती बदलणार नाही . आणि हा परीशितीचा तिढा या दोघींना मिळूनच सोडवायला हवा याची दोघींना जाणीव होते.
दिवस १०
आता दोघी एक अलिखित करार केल्यासारखे वादग्रस्त मुद्दे बोलायचे थांबवतात. मग काका सुचवतात की दोघी मिळून कुहे तरी ट्रीपला जावून आल्यास फरक पडेल.
दिवस ११एका कादंबरीची डायरी
 आता ट्रिपचे ठिकाण ठरवायचे तर तो पण एक प्रश्न. नायिकेला समुद्र किनारा हवा होता तर मुलीला हिमालयात जायचे होते. पण उन्हाळ्याचे दिवस असल्याने कुलू मनालीचा बेत नक्की होतो.
दिवस १२
आता कथेत पुन्हा बदलाव यायची शक्यता. म्हणजे तिथे कुणीतरी हवेहवेसे वाटणारे भेटणे वगैरे.
पुन्हा प्रकाशकांचा तगादा सुरु झाला तेव्हा त्यांना म्हटले माझ्याच्याने कादंबरी लिहून कधी होईल हे सांगता येणार नाही पण तुम्ही या डायरीतील आराखडा देवून कुणाकडून कादंबरी लिहून घेतल्यास माझी हरकार राहणार नाही.
अनिल जोशी
३०.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments

  1. चांगला झाला की प्लॉट ‌..! आणि तो तुम्ही उदारपणे देऊ पण केलात...! छान छान...!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती