इडली दिवस
आपण अनेक डेज किंवा दिवस , दिन साजरे करत असतो त्यात हा इडली दिवस कुठून आला असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. हा आम्ही आमच्या घरी पाळतो . इतर दिवस हे वर्षातून एकाच दिवशी साजरे लेले जातात पण इडली दिवस हा आपल्या सोयीने व इच्छेने कधी पण आजरा केला जातो. याची पूर्व तयारी म्हणून इडली तयार करायला उडीद डाळ भिजवून तांदळाच्या रव्यासोबत वाटून ते भिजत टाकावे लागते कारण ते आंबून नीट फुगल्याशिवाय इडली मऊशार व लुसलुशीत होत नाही.
वास्तविक इडली हा दाक्षिणात्य उपहार गुहात सदैव मिळणारा पदार्थ आहे. त्या सोबत चटणी व सांबर हे अपरिहार्य आहेत. हा जरी कर्नाटकातील उडिपी येथील खाद्यप्रकार असला तरी तामिळनाडू, आंध्र,केरळ या राज्यांमध्ये पण प्रचलित आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात पण तो तितकाच लोकप्रिय आहे. आमच्या लहानपणी जेव्हा इडलीपात्र वगैरे उपलभ नव्हते तेव्हा आमची आई सध्या कुकर मध्ये (तेव्ह्या प्रेशर कुकर यायचे होते व त्या ऐवजी पितळी साधे कुकर वापरले जात. मिक्सर नसल्याने ते पाट्यावर वरवंटयाने वाटावे लागायचे व तो आकार येण्यासाठी त्या वाटीत लावल्या जात. पुढे मुंबईत रगडा मिळाल्यावर वाटणे थोडे सोपे झाले.
पण अगदीच इच्छा झाली तर उपहार गृहात जावून एक प्लेट इडली खावून येणे सर्वात सोपे. इडली बरोबर चटणी व सांबर हे प्रामुख्याने खाल्ले जाते. चटणी बरोबर झटका मिळतो तर सांबार मध्ये बुडवून म्हणजे
गरम गरम सांबार मी डुबे इडली . अशी इडली म्हणजे सुखाची परमावधी. पुणेकर म्हणजे खाण्याबाबत अतिशय चोखंदळ. स्वीट होम मध्ये इडली सांबार वर बारीक शेव पेरून खायची भन्नाट कल्पना पुणेकरांनी उचलून धरली. अलका टोकीज केळकर रस्त्याच्या सुरुवातीला एका दुकानात खास दाक्षिणात्य सांबार मसाला पत्र्याच्या छोट्या डब्यात मिळतो तो वापरला तर सांबार चवदार लागते. त्याचे भावंड म्हणजे रसम. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या वाडेश्वर मध्ये प्रथम रसम इडली व रसम वडा हे प्रकार खल्ले ते केवळ अप्रतिम. खूप वर्षांपूर्वी बंगलोरला रस्त्यावर हातगाडीवर मोदकपात्रात तयार केलेल्या गरम गरम इडल्या खाल्ल्या होत्या त्या फार छान लुसलुशीत होत्या. अशा गरम इडलीवर लोणी घालून खाल्ली की त्याला बेन्नी इडली म्हणतात.
बाजीराव रस्त्यावरच्या वाडेश्वर मध्ये सकाळी सकाळी वाफाळलेल्या इडल्या खाणे म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात करणे.
आता घरात ४ जणांसाठी जर इडली सांबार करायचे असेल तर त्याची थोडी तांत्रिक माहिती. अर्थात हा आराखडा आहे. त्यावर सुंदर चित्र प्रत्यक गृहिणी आपल्या प्रतिभेने साकारते.
साहित्य:
१/२ कप तुरडाळ
१/४ कप चिंच (१ कप चिंचेचा कोळ)
४ ते ६ छोटे कांदे
दुधी भोपळ्याच्या मध्यम फोडी, ५ ते ६ (साल काढून टाकावे)
वांग्याच्या मध्यम फोडी, ५ ते ६
२ शेवग्याच्या शेंगा (३ इंच तुकडे)
२ मध्यम टोमॅटो, मोठ्या फोडी
१ टीस्पून गूळ
सांबार मसाला
फोडणीसाठी
२ टिस्पून तेल, १ टिस्पून उडीद डाळ, १/४ टिस्पून मोहोरी, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
१० पाने कढीपत्ता
१ हिरवी मिरची
कृती:
१) सगळ्यात आधी सांबार मसाला बनवून घ्यावा. तुरीची डाळ मऊसर शिजवून व घोटून घ्यावी.
२) फोडणीसाठी तेल गरम करावे. त्यात मोहोरी, उडीद डाळ, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी करावी. फोडणीत कांदा आणि शेवग्याच्या शेंगा घालून १ मिनीट परतावे. त्यात १ कप पाणी घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी.
३) अर्धवट शिजल्यावर त्यात वांगे, दुधी भोपळा घालावा. चिंचेचा कोळ आणि १ टिस्पून मिठ घालावे आणि मध्यम आचेवर साधारण १५ मिनीटे वाफ काढावी. वाटल्यास १ कप पाणी घालावे.
४) सर्व भाज्या शिजल्यावर घोटलेली डाळ घालावी. चव पाहून मिठ घालावे. गरजेनुसार पाणी घालावे. तयार केलेल्या मसाल्यापैकी २ टिस्पून मसाला, गूळ आणि टोमॅटोच्या फोडी घालून मध्यम आचेवर पातेल्यावर झाकण ठेवून वाफ काढावी व २ ते ३ मिनीटे उकळी येऊ द्यावी. थोडा रंग येण्यासाठी १/२ चमचा लाल तिखट घालावे
५) तयार सांबाराची चव पाहावी आणि गरजेनुसार मसाला मिठ घालून उकळी काढावी.
गरमा गरम सांबार इडली, डोसा, उत्तप्पा, मेदू वडा यासारख्या दाक्षिणात्य पदार्थांबरोबर छान लागतो.
टीप:
१) सांबार मसाल्यातील साहित्य काळपट होईस्तोवर भाजू नये सांबाराचा रंगा बदलतो.
२) दुधी भोपळ्याच्या साली काढून टाकाव्यात नाहीतर साल कचवट राहते.
३) आवडीप्रमाणे बटाटा, लाल भोपळा यांसारख्या भाज्याही सांबारात वापरू शकतो.
४) जर छोटे कांदे नसतील तर साधे वापरातले कांदे मोठ्या फोडी करून वापरू शकतो.
आता इडली दिवसाबद्दल. आपण बाहेर खायला गेलो तर एक प्लेट इडली (२ नग ) खावून बाहेर पडतो पण मनसोक्त इडल्या खायच्या असतील तर घरी करून खाणे इष्ट. तेव्हा भरपूर इद्ल्यांचा बेत करायचा व सकाळी सकाळी २-४ इडल्या चटणी बरोबर खावून दिवसाची सुरुवात करायची. दुपारी न मोजता सांबार व चटणी यांच्या सोबत खायच्या (म्हणजे जेवणाची आठवण होत नाही) व रात्री पुन्हा दुपार प्रमाणे बेत रिपीट करायचा. अशा प्रकारे इडली दिवस साजरा होतो. यावर सोने पे सुहागा म्हणजे जर काही इडल्या उरल्या जी शक्यता खूप कमी असते तर दुसर्या दिवशी इडली फ्राय विथ टोमाटो केच अप. हा इडली दिवसाचा बोनस असतो.
अनिल जोशी
०४.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी.
Professional grade recipe. What are the ingredients of sambar masala ?
ReplyDelete