आनंद भाविनी

काही कादंबर्या, त्यातील पात्रे , नायिका मनात इतक्या घर करून
राहतात अगदी काल परवा भेटल्यासारख्या. १९७४ चे वर्ष असेल. प्रशिक्षणार्थी म्हणून
कारकीर्द नुकतीच सुरु झाली होती . दिवाळी जवळ आली आणि अर्थात घरी जायचे वेध लागले.
काम करायच्या शेवटच्या दिवशी जरा लवकर निघून ३ च्या सुमारास चिंचवड स्टेशन वर
मुंबई मनमाड पेसेंजर पकडली . आता आरामात ७ वाजेपर्यंत विसापूर येणार होते. हा
नेहेमीचा संथ प्रवास. कंटाळवाणा. केवळ घरी जायच्या उर्मी मुळे सुसह्य होणारा. आज
हातात पु शि रेगे यांची सावित्री साथीला होती. त्यांचीच एक छोटेखानी अवलोकिता
वाचली होती आणि त्यांच्या लेखन शैलीच्या प्रेमात पडलो होतो.
तशी सावित्री पण छोटी
कादंबरी. वाचायला सुरुवात केली आणि वाचून संपल्यावर पाहिलं तर गाडी पुणे सोडून
फक्त २ स्टेशन पुढे आली होती. लोणी स्टेशन. म्हणजे चिंचवड ते लोणी या प्रवासात ती
कादंबरी वाचून झाली होती . गाडीचा एवढासा प्रवास पण मन कुठल्या कुठे भरारी घेवून
आलं होत. मनाची अवस्था आणि सभोवतालचे वातावरण यात कमालीची विसंगती होती. पण मन
त्या कादंबरीतून बाहेर येवू इच्छित नव्हते.
सावित्री ही नायिका. नुकतीच
बंगलोर हून शिक्षण पूर्ण करून कुर्ग मधील आपल्या खेड्यात वडिलांबरोबर राहायला
आलेली आहे. सोबत राजम्मा, लच्छी
अशा काही व्यक्ती आहेत. सोबत तिथला निसर्ग आणि सावित्रीचे विलक्षण मनस्वीपण. ती या
कादंबरीच्या नायकाला पत्र लिहिते आणि तिथे कादंबरीसुरु होते. पूर्ण कादंबरी उलगडत
जाते ती सावित्रीच्या पत्रांतूनच.
ही कादंबरीची सुरुवात पहा.
काही ओळख देख नसताना मी तुम्हाला
लिहिलं आणि तितक्याच अधिरेपणाने तुम्ही मला साथ दिलीत.माझी तुम्हाला ओळख कशी करून द्यायची? मी कशी वाढले ते माझ मलाच ठाऊक नाही.-आईविना आणि सदा कामात गर्क असणार्या अप्पांच्या सान्निध्यात.मी पहिल्याने काय शिकले असेन तर स्वत:ला विसरायला. नाव तुम्हाला कळल आहे. कुणी म्हणतात साउ. पण अप्पा एकदा म्हणाले -"मुली तू खरोखर आनंदभाविनी आहेस. त्यांना असले शब्द सहज सुचायचे. तेव्हापासून मी ही अशी (तुम्हाला पहिल्यान वाटले तशी ) आनंदभाविनी आहे तुम्ही लिहिलत, मनमोकळी.
हा पत्रव्यवहार वाढत जातो आणि कादंबरी पुढे सरकते. कादंबरी जरी लहान असली तरी कालपट मात्र विशाल आहे. दुसरे महायुद्ध सुरु होण्या आधी पासून स्वातंत्र्याची चाहूल लागते तिथपर्यंत. महायुद्धाची अनिश्चितता, अप्पाचे व्याख्यानांसाठी जपान ला जाणे व तिथेच त्यांचा अंत होणे. बोटीवरच्या स्फोटात सेन दाम्पत्याचा अंत होतो आणि त्यांची लहान मुलगी बिना तिच्या आयुष्यात अचानक येते व मातृत्वाचा न मागता अनुभव देवून जाते. नायकाच्या येण्याची तारीख ठरते १५ ऑगस्ट १९४७ . इथे कादंबरी संपते पण पूर्ण कादंबरीभर राजम्माची मोराची गोष्ट जशी रुंजी घालते तशी सावित्रीची पत्रे मनात अखंड रुंजी घालतात. पुढे या कादंबरीची अनेक पारायणे केली.
मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये पु. शि. रेगे यांच्या “सावित्री’ या पत्रात्मक कांदबरी आधारित “सावित्री’ हा एकपात्री नाट्याविष्कार अभिनेत्री प्रिया जामकर यांनी सादर केला. जवळपास दीड तास त्यांनी केलेल्या सादरीकरणामुळे सातारकर मंत्रमुग्ध झाले.
“सावित्री’ ही पत्ररूप कादंबरी. अवघी 49 पत्रं असलेली. आकार छोटा, पण अवकाश मोठा अशी आईविना वाढलेल्या, तरुण बुद्धिमान मुलीच्या विचारविश्वाचा, भावभावनांचा पस मांडणारी सुरुवातीला मुग्ध आणि नंतर परिपक्व होत जाणाऱ्या तिच्या प्रेमाचा प्रवास सांगणारी ही कादंबरी. “सावित्री’ सादर करणाऱ्या अभिनेत्री प्रिया जामकर या पुण्याच्या एसएनडीटी महाविद्यालयात मराठीच्या विभागप्रमुख आहेत. अत्यंत बोलके डोळे, लवचिक आवाज, नृत्याची जाण असल्यामुळे लयबद्ध हालचाली, कवयित्री असल्यामुळे “सावित्री’मधली तरलता समजून घेण्याची क्षमता आणि अभिनयाची मुळातच असलेली आवड या सगळ्या गोष्टी त्यांना “सावित्री’ उत्तमरित्या साकारली.
एकदा रात्री ९च्या सुमारास टिळक स्मारक मंदिर परिसरात भ्रमंती करत असताना , सोबत कोण होत ते आठवत नाही पण एस पी मधून संगीतकार (त्या वेळचे होतकरू) आनंद मोडक बाहेर पडत होते . सहज बोलताना काय चालू आहे असे विचारले तेव्हा ते म्हणाले -आनंदभाविनी करतो आहे. हा शब्द ऐकताच मी आगाऊपणे म्हटले हा शब्द म्हणजे पु शि रेगे यांच्या सावित्री कादंबरीत वाचला होता. तेव्हा ते म्हणाले बरोबर आहे . आम्ही सावित्री वरच "आनंद भाविनी" नृत्य नाटिका करत आहोत. ही नृत्य नाटिका किंवा प्रिया जामकर यांनी केलेला एकपात्री प्रयोग पहायचा योग आला नाही पण सावित्रीने मनात केलेले घर कायम आहे.
अनिल जोशी
०९.०४.२०२०
अनिल जोशी
०९.०४.२०२०
खूप छान कादंबरी आठवली
ReplyDeleteअनिल, माझी सुद्धा ही अत्यंत आवडीच्या कादंबरींपैकी एक आहे आणि पारायणंही खूप झाली आहेत.
ReplyDeleteतारूण्यसुलभ वयात ती हातात आणि सावित्रीने जवळ जवळ एक दशक इतका मोठा कालावधी व्यापून टाकला. कादंबरी वाचतांना मन एका उन्मनी अवस्थेत जातं आणि अस्वस्थ करणारी हुरहूर घेऊन येतं. पु शि रेगे या सिद्धहस्त लेखकाला या कादंबरीसाठी मोठा पुरस्कार मिळायला हवा होता असं राहून राहून वाटतं. तू वर्णन केलेला नाटयाविष्कार बघायची आता तळमळ लागली आहे. - अवी