वेध महायुद्धाचा

T 72 Main Battle Tank | सोव्हिएत युनियनचा 'टी ...Germany Panzer 4 tank | गाथा शस्त्रांची : नाझी ...
युद्ध हे साधारणपणे दोन राज्यांमध्ये / देशांमध्ये होते. त्याला त्या दोन देशांमधील प्रश्न , वाद कारणीभूत असतात. यात प्रदेशावर कब्जा मिळवणे, आपल्या सामर्थ्याच्या जोरावर खंडणी वसूल करणे (महसूल वाढ ) अशी उद्दिष्टे असतात. पण जेव्ह्या या संघर्षात इतर राष्ट्रे आपला स्वार्थ साधण्यासाठी उतरतात तेव्हा ते महायुद्ध होते. अशी महायुद्धे जेव्हा शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात खूप वाढ होते तेव्ह्य शस्त्रास्त्रांचे दलाल अशी युद्धे घडवून आणतात.
पहिले महायुद्ध ऑगस्ट १९१४ मध्ये सुरु झाले आणि नाताळ पूर्वी युद्ध संपून आपल्या घरी पोहोचू अशा भावनेने युरोपीय राष्ट्रे युद्धात उतरली पण युद्ध विराम व्हायला सव्वा चार वर्षांचा काळ लोटावा लागला . यात सवा कोटी सैनिक व तेवढेच नागरिक बळी पडले.
पोलंड सारख्या देशावर कब्जा मिळवण्यासाठी हिटलर ने हल्ला केला तर दुसर्या दिशेने रशियाने हल्ला केला  त्या देशाचे लचके तोडले. १ सप्टेंबर १९३९ रोजी सुरु झालेले महायुद्ध १४ ऑगस्ट १९४५ रोजी जपान ने पत्करलेल्या शरणागतीने संपले. जर्मन आधीच पडले होते. त्याचे पण विभाजन झाले. अणुबॉम्ब सारखे संहारक अस्त्र अमेरिकेने या युद्धात वापरले. ज्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही असे मानले जायचे त्या ब्रिटन चे या युद्धात कंबरडे साफ मोडले व जागतिक वर्चस्व ब्रिटन व युरोप कडून अमेरिका व रशिया या नव्याने उदयाला आलेल्या महा सत्तांकडे आले. या युद्धात ७ कोटी सैनिक लढले त्यातील १ कोटी ७० लाख सैनिक प्रत्यक्ष युद्धभूमीवर मरण पावले तर त्या पेक्षा जास्त बॉम्ब हल्ल्यांमध्ये मरण पावलेल्या नागरिकांची संख्या त्या पेक्षा जास्त म्हणजे १ कोटी ८० लाख इतकी आहे. या महायुद्धाने जगाला कत्तल, दैन्य, दुष्काळ, रोग राई, अशा गोष्टींनी २१९१ दिवस थैमान घातले.

हे किंवा पहिले महायुद्ध प्रत्यक्ष भारतात लढले गेले नाही पण अनेक भारतीय सैनिक ब्रिटीशांच्या बाजूने युद्धात लढले व मारले पण गेले. टंचाई, महागाई अशा समस्यांना भारतीय नागरिकांना तोंड द्यावे लागले.
या युद्धाचे मराठी साहित्यात काय प्रतिबिंब उमटले हे पाहणे पण उत्सुकता म्हणून योग्य ठरेल.

पु लं च्या व्यक्ती आणि वल्ली मधील नंदा प्रधान या युद्धाबाबत व्यक्त होताना म्हणतो -
"ती संध्याकाळ मात्र मी जन्मात विसरणार नाही. नंदा भर बॉम्ब हल्ल्यात लंडन मध्ये राहत होता. भुयारी रेल्वेच्या फलाटावर त्या वेळी माणसे जीव वाचवण्यासाठी येवून रहात असत. मृत्युच्या जबड्यातून सुटून मुंग्यांसारखी माणसे एकमेकांना चिकटून झोपत. तेव्हा प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण होता. कुणी ही कुणाच्या ही मिठीत त्या वेळी केवळ भय विसरण्यासाठी विसावत, विलीन होत.तेथे वासनाहीन भोग होते. भीती खेरीज कोणतीच भावना जगात नव्हती. धर्म, नीती,सदाचार, पातिव्रत्य हे शब्द तेव्हा रद्द केलेल्या चलनासारखे कागदाचे कपटे होवून गटारात पडले होते. त्या वेळी ज्याला जगात कुणी नाही असा नंदा त्या मृत्युच्या तांडवाकडे नाटक पहिल्यासारखा पाहत हिंडत होता."  
विश्राम बेडेकर यांच्या रणांगण कादंबरीतील नायक एका इटालियन बोटीवरून जिनेव्हा ते मुंबई प्रवास करतो आणि बोटीत त्याला महायुद्धाचे रणांगण जाणवते. त्याची ओळख हेंटा नावाच्या ज्यू तरुणीशी होते. आणि ती ज्यू असल्याने तिला तो काहीच मदत करू शकत नाही. करतो ते निर्व्याज प्रेम पण त्या मुळे तिचे जीवावरील संकट दूर होणार नसते. बोट मुंबईजवळ आल्यावर त्याच्या मनाची जी उलघाल होते ती रणांगणावरील युद्धापेक्षा कमी नाही.
"मुंबई आली.सगळ्यांना आनंद झाला, पण मला वाईट  वाटले. हिंदुस्तान माझी जन्मभूमी. दूर देशाहून मी आलो. पहिल्या दर्शनाने आनंद व्हावा ना? पण मला दु:ख झाले. माझे सगळे  जगच बदलले होते. एडन गेले तेव्हा आता मुंबईच अशी धास्ती वाटे. तरी अशा वाटे. समुद्रात तुफान होते. तेव्हा विचार येई हे वाढले तर बरे. बोट हळू चालेले ,मुंबई उशीरा  येईल .पण ठरलेली वेळ .ती यायचीच. ती आलीच. आम्ही डेक वर उभे होतो. हेंटा एकदम जवळ आली.डोळे डबडबलेले होते. आवाज कातर झाला होता. म्हणाली -पाहिलस ? हिंदुस्तान आले रे अखेर. आता तू जाणार? आणि अश्रू घळघळ वाहू लागले . तेच अश्रू .त्यांचा त्या दिवशी पूर वाहिला. बोट सुटायच्या पूर्वी अर्धा तास असताना उतरलो. ते पण पाय मागे ओढत."
" दोन मानवी जीव जवळ येतात. हातात हात घेतात आणि म्हणतात -हा भेटीचा क्षण अखेरचा . असे आयुष्यात सहसा कधी होते का ? मृत्यू वेळे शिवाय? पण रणांगण होते त्यामुळे असे घडले. "
पु शि रेगे यांच्या सावित्रीचा कालखंड तर दुसर्या महायुद्धाचा आहे . त्यात ते अनेकदा अप्रत्यक्षपणे डोकावत राहते.
चौविसाव्या पत्रात युद्धाचे पडघम आणि परिणाम अधिक तीव्र झालेत, एजवर्थ, जे इंग्लिश असूनही प्लांटेशनवर कुर्गमध्ये मागे थांबलेत त्यांना पहिल्या महायुद्धाचा पूर्वानुभव असल्याने अशुभाची प्रखर जाणीव झाली आहे आणि ते व्याकुळून आप्पांना परत बोलावत आहेत असं सावित्री लिहिते.

ही मला भावलेली महायुद्धाची साहित्यात पडलेली प्रतिबिंबे.

अनिल जोशी
११.०४.२०२०
आपली प्रतिक्रिया कृपया आपल्या नावासह द्यावी. 





Comments

  1. सही. माहितीपूर्ण तरी रोचक
    धनश्री जोशी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती