तृषार्त , तृप्त धरित्री
आज १ मे . पुण्यात साधारण
पणे एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा असतो. आणि आता एप्रिल संपला तेव्हा उन्हाळ्याचा
कडाका कमी होईल या आशेवर होतो. दुपारची वेळ. महिना अखेर त्यामुळे मोठा कॉल चालू
होता. सगळ लक्ष त्यातच होत आणि अचानक अंगावर काही पाण्याचे थेंब शिडकले. तसा मी
खिडकीच्या फार जवळ नव्हतो आणखी खिडकी पण छोटी आणि पूर्ण उघडी नव्हती तरी पण
पावसाचे थेंब माझ्यापर्यंत पोचले होते. जणू वळीव म्हणत होता किती पण लांब गेलास
तरी तुला पकडलेच की नाही. उन्हाळा कडक झाल्यावर एखाद्या दुपारी आकाशात काळे ढग जमा
होऊन वळीवाची सूचना देतात आणि त्या सूचनेने पण मन सुखावते. आणि जेव्हा जलधारा
कोसळू लागतात तेव्हाचा आनंद काय सांगावा? असा हस्ताचा जोरकस पाऊस जेव्हा नवरात्रात
कोसळतो त्याचा असा आनंद होत नाही. आणि हा वळीव अंगावर झेलण्यात खरी मजा आहे.
आजच्या पावसाच्या निमित्ताने काही आठवणी जागृत झाल्या.
१९७३ मध्ये आमच्या
वसतिगृहाच्या गच्चीवर असाच वळीव कविमित्र किशोर पाठक याच्याबरोबर झेलला होता ती
आठवण मागे एका ब्लॉग मध्ये लिहिली होती.
असेच मे महिन्याचे दिवस
होते. आणि वर्षाखेरच्या कामानिमित्त साप्ताहिक सुटी असून पण गुरुवारी कामावर गेलो
होतो. सुटी असल्याने कामे उरकल्यावर घरी यायला निघालो. १९७९ साल होते. आमच्यासाठी
एका छोट्या बसची व्यवस्था केली होती. मुख्य रस्त्याने वाहतुकीचा अडथळा नको म्हणून
औंध मार्गे येत होतो. तेव्हा तो रस्ता म्हणजे मोकळ्या माळावरून जावे तसा मोकळा ,
रिकामा असायचा. आणि मधेच वळीव सुरु झाला . सगळेच सुखावले. तेवढ्यात लक्षात आले की
गारा पडत आहेत. मग बस थांबवून सगळे गारा वेचायला खाली उतरले. आणि त्यांचा मनसोक्त
आनंद घेतला. घरी आलो तर तेथे पाऊस कोसळून गेल्याच्या खुणा दिसत होत्या. इमारतीचे काम चालू असल्याने काही ठिकाणी वाळूचे ढिगारे होते. त्यावर पडलेल्या गारा पाहून
हिमाच्छादित शिखरे आमच्या इथे अवतरल्याचा भास झाला.
असेच एका उन्हाळ्यात बेळगाव
येथे गेलो असता एकदम कोवाड ला जायचे ठरले. कोवाड हे स्वामीकार रणजीत देसाई यांचे
गाव. त्यांचे दु:खद निधन नुकतेच झाले होते. त्यामुळे या सहलीला एक वेगळे परिमाण
मिळाले. तेथील एक रहिवासी आप्त दत्ता जोशी यांनी आम्हाला देसाई यांचा विस्तीर्ण
मळा दाखवला त्याला वारी म्हणतात. तिथेच त्यांचा बंगला पण आहे. त्या जवळच्या
ओट्यावर आम्ही काही काळ स्थिरावलो. तिथेच देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले
होते त्या जागेवर एक बांबू व चटई यांच्या सहाय्याने एक शेड उभारली होती. मग
त्यांचा वाडा पहिला. आता आकाशात ढग दाटून आले होते. आम्हाला पुन्हा बेळगावला
पोचायचे होते. आम्ही घाई घाईत बस स्टोप वर आलो. ती एक पिक अप शेड होती. आम्ही तिचा
सहारा घेतला. कारण पाऊस कोसळायला सुरुवात झाली होती. त्या शेड चा आसरा पुरेसा
नव्हता. सगळेच चिंब भिजलो. पण बसने परत जाताना त्या आठवणी मन चिंब करणाऱ्या
होत्या.
नंतर माधवी देसाई यांचे नाच ग घुमा हे पुस्तक वाचले त्यात आम्ही बंगल्या शेजारच्या ज्या ओट्यावर विसावलो होतो त्या ओट्यावर त्यांनी डॉ वसंतराव देशपांडे यांना ओवाळल्याची आठवण दिली आहे . ती वाचल्यावर आपण एका खास जागेवर बसून आल्याचा फील आला.
उन्हाच्या तडाख्यात सगळी
सृष्टी तप्त झालेली असते. पण जमीन , धरित्री जास्त तृषार्त असते कारण या जलधारांनी
तिला नव्याने प्रसवायचे असते. नवी निर्मिती करायची असते. त्यामुळे हा वळीव तिची
तृषा तृप्त करतोच पण जमिनीखालचे झरे पण ओलावून पाझरू लागतात.
म्हणून वाटले असा वळीव
कोसळला की तृषार्त धरित्री कुठेतरी एक तृप्तीचा हुंकार देत असते.
अनिल जोशी
०१.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया
आपल्या नावासह द्यावी.
वाह अनिल साहेब... सुंदर!
ReplyDeleteसहीच
ReplyDelete