होवो उदंड पाणी सगळीकडे

उजनी धरण - विकिपीडियाकोयना धरण - विकिपीडिया
काही कारणांनी आपण मित्र विरंगुळा म्हणून एकत्र येतो . गप्पा मारतो आणि मन मोकळे करतो. विविध निमित्ताने एकत्र येणारे मित्र जेव्हा कधी तरी नुसते जमतात तेव्हा त्यात चर्चेला येणारे विषय गमतीशीर असतात. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही कालासागारच्या माध्यमातून एकत्र येणारे काही मित्र एकदा सहज जमायचे ठरवले. रेव्हेन्यू कॉलनी मधील एका हॉटेलच्या लॉन वर एका संध्याकाळी बसलो होतो. ठिकाण जरा बाजूला असल्याने गर्दी पण नव्हती त्यामुळे बर्यापैकी एकांत मिळाला होता. कलाकार मित्रांसोबत ज्यांचा समाज विकास या विषयात हातखंडा आहे असे आमचे ज्येष्ठ अधिकारी कै.जयंत जोशी व श्री. मनोहर पारळकर हे पण उपस्थित होते. एकत्र यायला तसे काही निमित्त नसल्याने अघळ पघळ बोलणे सुरु होते आणि कुठून तरी विषय पाणी हा निघाला. मग एकेकाने आपले अनुभव सांगायला सुरुवात केली . अगदी ग्रामीण भागातील पाणी व्यवस्था , पाण्याचे दुर्भिक्ष , सततचा दुष्काळ, पाण्याचे नियोजन,एक ना अनेक. रुक्ष विषय असून पण अनुभवातील जिवंत पणामुळे चर्चा रंगतदार झाली की आजची पार्टी पाण्यासारख्या विषयावर असून पण संस्मरणीय झाली.
पाणी हा विषय तसा अतिशय महत्वाचा आहे. पाऊस यायचा लांबला आणि धरणातील पाणी साठा संपत  आला की शहरातील लोकांच्या तोंडचे पाणी पळते. ग्रामीण भागात तर फेब्रुवारी-मार्च पासूनच पाण्यासाठी वणवण सुरु होते. tanker ने पाणी पुरवठा सुरु केला जातो. जेथे पावसाचे प्रमाण कमी तिथे ही स्थिती तर जिथे भरपूर पाऊस पडतो त्या कोकणात सुद्धा एप्रिल पासून विहिरी आटायला सुरुवात होते.
एकीकडे पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीची ही अवस्था असताना त्याबाबत उपाय योजना मात्र थातूर मातुर होत असताना दिसते. उन्हाळ्यात कामाला लागलेली यंत्रणा ही एकदा पाऊस पडला की थंड पडते.पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून पर्जन्यमान कमी झाले असे नेहेमी बोलले जाते. पण कधी कधी अतिवृष्टी पण होते, पावसाचे वेळापत्रक सतत बदलते आणि हवामानाचा अंदाज न आल्याने शेतीचे नुकसान वगैरे बाबी नेहेमीच्या झाल्या आहेत.
या सगळ्या परिस्थितीत हा विषय जितक्या गंभीरपणे घ्यायला हवा तेवढा घेतला जात नाही हे वास्तव आहे. आपल्या सिंधू नदीकाठच्या मोहेंजोदडो व हडप्पा सारख्या संस्कृती या पाण्याच्या अभावी नष्ट झाल्या. आफ्रिकेत पण पाण्याअभावी अशीच वाताहत होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर परवा सामाज माध्यमावर एक विषय असा आला की पाणी व्यवस्थापन , जलसंधारण या विषयांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा आणि या मुळे असे वाटले की आपल्या शिक्षणात अनेक अनावश्यक विषय ज्यांचा पुढे कधी संबंध येत नाही असे शिकवले जातात त्या ऐवजी हा विषय महत्वाचा असल्याने त्याबद्दल सुरुवातीपासून त्याबद्दल जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे हा एक सक्तीचा विषय होणे गरजेचे आहे.
पाण्याबाबतची अनास्था अशीच राहणे म्हणजे आपल्या अस्तित्वाला धोका आहे. जेव्हा असते तेव्हा आपण पाणी बेसुमार वापरतो. त्यामुळे कमी पाण्याच्या वापराचे तंत्रज्ञान आत्मसात करणे व त्या बाबत आपण गंभीर असायला हवे हे मात्र खरे. हवामान, पर्जन्यमान, पर्यावरण या सगळ्यांचा समन्वय साधणारे संशोधन ही काळाची गरज आहे.
आपल्या व्यक्तिगत पातळीवर मात्र आपण याबाबत गंभीर राहून पाण्याचा अपव्यय टाळायला हवा व शक्य तिथे पुनर्वापर कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे. अखेर पाणी ही लोक चळवळ झाली पाहिजे. गेल्या काही वर्षात याबाबत निश्चित काही गोष्टी मनाला उभारी देणाऱ्या घडल्या त्यांचे प्रमाण वाढायला हवे.
ही भूमी नेहेमी सुजलाम सुफलाम रहायला हवी.
रामदास स्वामी म्हणाले तसे जाहले उदंड पाणी अशी स्थिती यायला हवी.

अनिल जोशी
१२.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी. 

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती