लागली आता पहाटेची चाहूल.

Image result for नरेंद्र मोदी फोटो
काल पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करणार म्हटल्यावर ते काय बोलणार किंवा सांगणार याबद्दल उत्सुकता होतीच . सध्याच्या स्थितीत सगळीच अनिश्चितता त्यामुळे काळजी आणि उत्सुकता होतीच. परिस्थिती अशी की लॉक आउट सुरु राहणार हे दिसत होतेच . आणि असे असून पण परिस्थिती आटोक्यात येताना दिसत नाही. समोर आर्थिक संकटाच्या सावल्या दिसत होत्या.
आणि जेव्हा त्यांचे भाषण सुरु झाले तेव्हा जाणवलं की मोदी यांनी आपल्या भाषणात मागे तम्बोर्याचा जसा सूर असतो तसा कोरोनाचा सूर होताच पण पूर्ण भाषणात या संकटाचा संधीत रुपांतर करण्याची भारतीयांची शक्ती, आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प दिसत होता . एक प्रकारे देशवासियांना या परिस्थितीचा सामना करत पुढे कसे जाणार याचे चित्र दाखवले व निराशेतून बाहेर काढायचा प्रयत्न दिसला तो आश्वासक होता.
आणि ते जे सांगत होते ते ऐकताना मला मी माझ्या ७ तारखेच्या ब्लॉग मध्ये जे थोडे विस्कळीत स्वरुपात लिहिले होते त्याचे ठोस रूप दिसत होते. एक निर्धार दिसत होता. ग्लोबल अर्थव्यवस्था नावाचा जो प्रकार आहे तो धोक्यात येणार आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेला त्यापासून दूर ठेवून आपली उदिष्टे गाठायलाच हवीत हा निर्धार दिसत होता. मेक इन इंडिया, स्वदेशी, यासगळ्या संकल्पनांना त्यांनी आत्मनिर्भारतेचा साज चढवला . एक घसघशीत आर्थिक पेकेज जाहीर केले. यामुळे आर्थिक जगताला उभारी आली. आजच निर्देशांक १२०० अंकांनी वधारला . हा उत्साह आणि सकारात्मकता अतिशय आवश्यक होती.
आणि याची प्रचीती आली. आज ग्लोबल जगातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया समजल्या त्या म्हणजे सगळ्या गोष्टींची खिल्ली उडवणाऱ्या होत्या. कारण त्या व्यवस्थेला हादरे बसणार आहेत. त्याला भारत जबाबदार नसेल कारण ती अर्थव्यवस्थेचा डोलारा ज्या पायावर उभा आहे तो पाया ठिसूळ व्हायला लागला आहे. उद्या जर अमेरिका, युरोप, येथील अर्थव्यवस्था धोक्यात आल्या, ज्या येणार आहेत तेव्हा आपल्या अनेक भारतीयांना बाड बिस्तारा गुंडाळून परत यावे लागेल आणि तेव्हा आपले घर त्यांना सामावून घेण्यासाठी भक्कम असणे आवश्यक आहे.
हे संकट लवकर दूर होण्यातले नाही. तेव्हा त्याच्या सह योग्य ती काळजी घेवून पुढे जाण्यातच शहाणपण आहे. गरज आहे ती जबाबदारीने वागण्याची.
या साठी आपल्या नेत्याने जो निर्धार व्यक्त केला त्याकडे सकारात्मकतेने पहायला हवे. बदल आपल्या दाराशी येवून उभा आहे. आणि त्यासाठी आपल्या मनाची दारे उघडणे आवश्यक आहे.
पहाटेची  चाहूल लागते आहे. आवश्यकता आहे डोळ्यांवर असलेली झोपेची झापड उडवून लावायची.
फेकून देत काळ रात्रीची भूल
लागली आता पहाटेची चाहूल.
उघडू डोळे सताड पाहू सगळे जग
घालवू सगळे निराशेचे ढग 
जाईल निघून सारा अंधार
पाहू वाट प्रकाशाची 
थोडा जास्त वेळ लागेल
पण सूर्योदय होणारच 
देवू अर्घ्य त्या सूर्यनारायणाला 
नवीन दृढ संकल्पांचे 
फेकून देत काळ रात्रीची भूल
लागली आता पहाटेची चाहूल.

अनिल जोशी
१३.०५.२०२०
कृपया आपल्या प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी. 

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती