मराठी बाणा

Map of Maharashtra

मराठी स्वाभिमान, मराठी अस्मिता आणि मराठी आकांक्षा या साठी मराठी बाणा हा शब्द वापरला जातो पण मराठी बाणा हा त्या ही पेक्षा व्यापक अर्थवाही आहे. विविध भाषा आणि त्या बोलणार्या भाषा बोलणार्या समुदायांची अस्मिता जपण्यासाठी भरत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेचे सूत्र स्वीकारले गेले. ते अंमलात आणताना मात्र बरीच तारांबळ उडाली. हिंदी भाषा बोलणारे एका प्रांतात सामावले जाऊ शकले नाहीत. तर प्रशासकीय सोयीसाठी आधी तमिळ-तेलगु व मराठी-गुजराथी अशा दोन भाषकांचे एक एक प्रांत झाले पण ते यशस्वी न झाल्याने व लोकांच्या रेट्यामुळे ते वेगळे प्रांत झाले. एका पंजाब चे पंजाब, हरयाणा व हिमाचल असे विभाजन झाले . तर पुढे प्रशासनिक सोयीसाठी उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश यांचे विभाजन झाले.
त्या त्या प्रदेशात त्या त्या भाषकांच्या अस्मिता आणि आकांक्षा जोपासण्यासाठी ही व्यवस्था झाली . पण मराठी भाषकांच्या अस्मिता या थोड्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत आणि त्या जाणून घ्यायच्या असतील तर थोडे इतिहासात पहावे लागेल. जेव्हा सगळ्या हिंदुस्तांवर यावनी आक्रमण झाले व देश त्याच्या अधीन झाला तेव्हा या भूमीने हे वर्चस्व स्वीकारायला नकार दिला. जेव्हा सगळ्या देशाची क्षात्रवृत्ती निस्तेज झाली अगदी लढवय्ये राजपूत सुद्धा मांडलिक होवून आपल्यी संस्थाने सांभाळत बसले तेव्हा या भूमीतून एक हिंदवी स्वराज्याचा हुंकार उठला आणि त्या प्रचंड यावनी सत्तेला या भूमीने आव्हान दिले. थोरले छत्रपती शिवाजी महाराजांनी डोंगर दर्यांतील मावळ्यांना एकत्र करून एका महा सत्तेला आव्हान दिले. हा इतिहास नक्कीच प्रेरणादायी आहे. पण याचा महत्वाचा परिणाम म्हणजे उत्तरेत किंवा अन्य भारत वर्षात सर्वांनी मुस्लिमांकडे राज्यकर्ते म्हणून पहिले व मनोमन स्वीकारले. पण मराठी माणसाने इतिहासात का होईना एकदा अरे ला कारे आव्हान दिले असल्याने एक वेगळे आत्मभान आले. त्यामुळे मराठी माणसाने सदैव देशाचा व्यापक विचार केला. केवळ आपली अस्मिता कुरवाळत बसला नाही . याचा अर्थ असा नाही त्याने आपला स्वाभिमान सोडून दिला. आपली अस्मिता, आकांक्षा, व स्वाभिमान या सगळ्यांचा समावेश असलेला मराठी बाणा त्याने आत्मसात केला.
आता मराठी म्हटले की म्हटले की मोडेन पण वाकणार नाही हे तत्व मराठी अंगिकारले. सहसा कुणाला त्रास द्यायचा नाही पण कुणी अंगावर आलेच तर सोडायचे नाही  हे नक्की.
पण जेव्हा यात राजकारण आले तेव्हा थोडे वेडे वाकडे व्हायला लागले. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्याचे दोन भाग पडले. एक शहरी व दुसरा ग्रामीण. शहरी भाग हा उद्योग प्रवण होता. मुंबई सारखे मोठे औद्योगिक शहर या राज्याची राजधानी आहे. त्या नजीक पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर अशी उद्योग केंद्रे निर्माण झाली. या सगळ्या शहरांतून मराठी भाषकांचे वर्चस्व होते पण मुंबईचे तसे नव्हते. मुंबई ही पहिल्यापासूनच बहुभाषिक. मराठी तरुणांना नोकर्या या विषयावर प्रथम मराठी अस्मितेच्या संघर्षाची ठिणगी पडली. प्रथम टार्गेट केले गेले ते दाक्षिणात्यांना. कारण नोकरी निमित्ताने अनेक दाक्षिणात्य मुंबईत आले. त्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व व प्रशासनिक कौशल्य या जोरावर ते मोठी पदे बळकावून बसले. आणि मग आपापल्या माहितीतील व नात्यातील अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला. परिणाम म्हणजे मराठी तरुणांमध्ये बेकारी वाढू लागली. तेव्हा त्याविरुद्ध मराठी तरुणांना भडकावणे सोपे होते. पण गम्मत म्हणजे खूप मोठ्या संख्येने असलेल्या गुजराथी समाजाविरुद्ध हे आंदोलन झाले नाही कारण गुजराथी तरुण मराठी तरुणांना नोकरीसाठी स्पर्धक नव्हता. तो आपापले व्यवसाय सांभाळत होता. आणि ग्रामीण भागात मराठी माणसाचे वर्चस्व असल्याने तिथे हे आंदोलन पोचले नाही. मराठी तरुणांना इंग्रजी आत्मसात करा, प्रशासकीय कौशल्य वाढवा, उद्योजक व्हा असे कुणी सांगितले नाही.
आज समाज माध्यमांवर असे संदेश येतात की उत्तरेतील-दक्षिणेतील  तरुण स्पर्धा परीक्षा देतात, गुजराथी तरुण सी ए व तत्सम व्यावसायिक कौशल्याच्या परीक्षा देतात तेव्हा ग्रामीण मराठी तरुण कोणत्या तरी पक्षाचाच उपप्रमुख म्हणून नेत्याच्या आगे मागे फिरत आपली महत्वाची वर्षे वर्षे वाया घालवतो.
मग सगळी निराशा नकारात्मकतेत रुपांतरीत होते. मग त्याला स्वस्तात काम करणारे बिहारी मजूर खुपतात, आपल्या ना कर्तृत्वामुळे दुसर्या राज्यात गेलेले प्रकल्प त्या राज्यांची मुजोरी वाटते. आणि येवू शकणार्या प्रकल्पांना विरोध करण्यात आपण भूषण मानू लागतो.
कुठेतरी हा मराठी बाणा हा राजकारणाच्या दलदलीत फसतोय की काय अशी भीती वाटते. मराठी बाणा हा सूर्य आहे तर याला लागत असलेले राजकारणाचे ग्रहण लवकर सुटायला हवे. कारण आपल्याला थोरल्या महाराजांचा  खूप महत्वाचा वारसा आहे. हा केवळ मराठी भाषकांचा प्रदेश नाही तर हे महाराष्ट्र आहे. ते नुसते नावापुरते न राहता सर्वार्थाने व्हायला हवे.
नुकताच १ मे ला महाराष्ट्र दिन झाला . त्या वेळी राहून गेलेले आज लिहिले.

अनिल जोशी
१४.०५.२०२०
आपली प्रतिक्रिया कृपया आपल्या नावासह द्यावी.

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती