मुलायम मधाळ स्वर अरुण दाते

अतिशय तलम व मधाळ स्वरांचा बादशहा म्हणजे अरुण दाते हे एक समीकरण आहे. सुमारे ६२-६३ वर्षे या स्वरांच्या बादशाहने मराठी मनावर अक्षरश: राज्य केले. जेव्हा साधारणपणे गाण्याला प्रतिष्ठा मिळाली आणि ते राजमन्यतेमधून लोकमन्यतेकडे झुकले तेव्हा जे गायक व गायिका स्वर नभात झळकत होते ते सगळे दमदार आवाजाचे सम्राट होते. अशात पातळ आवाजाचे गजानन वाटवे, सुधीर फडके यांच्यासारखे काही गायक होते त्यांच्या आवाजाला ही दमदार खयाल वा शास्त्रीय संगीताची गायकी मानवणारी नव्हती. शिवाय शास्त्रीयसंगीत हे स्वर प्रधान म्हणजे तसे अमूर्त असे म्हणजे अनुभवण्यासारखे . मग शब्दप्रधान व भावपूर्ण सुगम संगीताचा उदय झाला . यात संगीत होतेच पण त्यात शब्द व भाव यांना महत्व होते. गजानन वाटवे, राम फाटक, राम पेठे, बबनराव नावडीकर या कलाकारांनी सध्या सोप्या अशा मराठी कवितांना छान चाली लावून मराठी भाव संगीतआचे असे एक साम्राज्य निर्माण केले. त्याच सुमारास मराठी चित्रपटांतून लोकसंगीताबरोबर भाव संगीत ऐकू यायला लागले. त्यात मग सुधीर फडके, वसंत पवार, वसंत प्रभू, दत्ता डावजेकर, यशवंत देव, प्रभाकर जोग, श्रीनिवास खळे , बाळासाहेब मंगेशकर, अशी अनेक मान्यवर मंडळी आपले योगदान देवू लागली.
या संगीताला आकाशवाणीने पण खूप प्रोत्साहन दिले व ही गाणी वाजवून लोकप्रिय करण्यात हातभार लावला. अशा वेळी १९५५ मध्ये आकाशवाणीवर भाव सरगम या कार्यक्रमात मंगेश पाडगावकर यांचे "शुक्रतारा मंद वारा " हे गीत अरुण दाते व सुधा मल्होत्रा या जोडीने गायले. संगीत होते श्रीनिवास खळे यांचे. इथे हा मुलायम मधाळ स्वर प्रथम रसिकांपर्यंत पोचला आणि मग त्याला उसंतच मिळाली नाही.
रसिक सम्राट रामुभैय्या दाते यांचे हे चिरंजीव, घरात अभिजात संगीताचे वातावरण, अनेक मान्यवर कलाकारांचा राबता अशा वातावरणात हा कलाकार घडला.
यांच्या अनेक गाण्यांनी माझ्या तर मनावर गारुड केले आहे. शुक्र तारा हे गाणे तर इतके भावलेले आहे की त्यावर मी एक कथा पण लिहिली . दिवस तुझे हे फुलायचे हे गाणे ऐकताना कुणी तरी अदृश्य व्यक्ती न झुलणार्या झोपाळ्यावर कशी झुलत असेल याची प्रचीती येते. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे ऐकताना निदान या गाण्यासाठी तरी जीवनावर प्रेम करायला हवे असे वाटून जाते. मराठी मधील एक संपादक कै ग वा बेहेरे यांनी त्यांचा जो शेवटचा लेख लिहिला होता त्याचे शीर्षक होते -या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ही पाडगावकर याच्या शब्दांची जशी ताकत आहे तशीच अरुण दाते यांच्या मधाळ स्वराची पण जादू आहेच.
त्यांची काही गाणी सहज आठवली तरी मन सुखावून जाते.
शुक्रतारा मंदवारा
अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
असेन मी नसेन मी
काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
जेव्हा तिची नि माझी चोरुन भेट झाली
डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
दिवस तुझे हे फुलायचे
दिस नकळत जाई
भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी
भेट तुझी माझी स्मरते
मान वेळावुनी धुंद बोलू नको
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील
सूर मागू तुला मी कसा
सखी शेजारिणी
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
स्वर गंगेच्या काठावरती मधला मारवा मन कातर करून जातोच पण जेव्हा भातुकलीच्या खेळामधली या गाण्याच्या सुरुवातीचा क्लोरोनेट चे आर्त सूर त्या करुण कहाणीची चाहूल देतात आणि ती विराणी मग विराणी न राहता एक भाव कथा होवून हृदयात घर करते.
बरेच जण म्हणतात की अरुण दाते म्हणजे मराठी मधील तलत मेहमूद. तलत मेहमूद हे थोर गायक आहेतच पण मला नेहेमी वाटत की ही तुलना गैर आहे. तलत हे तलत आहेतच तर अरुण दाते हे अरुण दाते .
या स्वरांच्या बादशाहाला सलाम.
अनिल जोशी
१५.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
Comments
Post a Comment