सिनेमा सिनेमा
मी जेव्हा कॉलेज मध्ये होतो किंवा नंतर नोकरीला लागलो तेव्हा घरोघरी टी व्ही यायचे होते आणि त्यामुळे थेटर मध्ये जावून सिनेमा पाहणे ही सगळ्यात स्वस्त करमणूक होती. म्हणजे त्याकाळी जर खिशात दीड रुपया असेल तर रु.१.३५ चे तिकीट व १० पैसे सायकल स्टेन्ड साठी यामध्ये तीन तास चंदेरी स्वप्नांच्या भुलभुलैय्या नगरीत विहार करून येत येत असे. प्रत्यक्षात न येणारी अनेक स्वप्ने तिथे डोळे भरून पाहता येत असत. बर्याच वेळेला त्यासोबत सुमधुर गाण्यांची मेजवानी असे. थरार अनुभवायला मिळे. श्वास रोखून धरणारे रहस्य असे, सुंदर नायिके बरोबरचे प्रणय प्रसंग असत. कधी डोळ्यांतून पाणी काढणारे भावूक प्रसंग असत तर कधी विनोदी प्रसंगांची धमाल असे. एकूण अतिशय स्वस्त असे हे करमणूक पेकेज असे.
वास्तविक याचे मूळ गोष्टीत आहे. आपण सुरुवातीला आई किंवा आजीकडून गोष्ट ऐकायचो. पुढे त्या वाचू लागलो. मग त्यातील नाट्य प्रभावीपणे तीच गोष्ट रंगमंचावर नाटक दाखवू लागले. सिनेमा ही त्या पुढची पायरी. त्यात रंगमंचाच्या मर्यादा नव्हत्या. गोष्ट ऐकताना किंवा वाचताना अनेक गोष्टी कल्पना शक्तीवर सोडून द्यायला लागायच्या तसे पण नव्हते. अनेक गोष्टी स्पष्ट पाने किंबहुना अधिक ठळकपणे मांडणारे हे माध्यम होते. याला असलेली तंत्राची साथ याला खूप समृद्ध करून गेली आणि मर्यादा पण घालून गेली. कारण अनेक गोष्टी पडद्यावर दिसण्यासाठी तडजोडी कराव्या लागत. त्याच प्रमाणे याची निर्मितीही खूप खर्चिक व कालापव्यय करणारी असल्याने आर्थिक गणिते जुळवण्यासाठी पण अनेक तडजोडी कराव्या लागत व लागतात. त्या बरोबरच सिनेमा चित्रित करण्यासाठी लागणारी फिल्म ही अतिशय महाग व सहज उपलब्ध न होणारी असल्याने मर्यादित प्रती निघत. मग ते सिनेमे अनेक वर्षे एका गावातून दुसर्या गावात फिरत अनेक वर्षे चालू राहत.
हे सगळ आठवण्याचे कारण म्हणजे सध्या सक्तीने घरात असल्याने टी व्ही वर जे अनेक जुने सिनेमे दाखवले जात आहेत ते पहिले जात आहेत. जे सिनेमे पूर्वी थेटर मध्ये जावून एन्जॉय केले होते ते फारच टुकार व फालतू वाटायला लागले. किती तरी ओढून ताणून घातलेले प्रसंग , मागे गाजलेल्या सिनेमा मधील प्रसंगांच्या कॉप्या मारणे, कारण नसताना रिलीफ म्हणून आचरट प्रसंग विनोद म्हणून घुसवणे त्यामुळे आपण स्वत:ची करमणूक कशी करून घेत होतो हे आठवून कीव करून घ्यायची.
वास्तविक सिनेमा या माध्यमाची ताकत अफाट आहे. जीवनाशी खूप जवळीक साधता येईल असे अनेक सिनेमे तयार झाले आणि त्यांनी खूप आनंद दिला. सिनेमा हे खरे तर दिग्दर्शकाचे माध्यम आहे. त्याची जर सर्व घटकांवर हुकुमत असेल तर चांगली निर्मिती होते. पण निर्माता, गुंतवणूकदार यांचा हस्तक्षेप वाढला तर मग सिनेमा बोम्बलतो. कधी तरी कलाकार जर नावाजलेले असतील तर ते आपल्या अटी लादायला लागतात. त्यासाठी दिग्दर्शक खमक्या हवा. दिग्दर्शकाची जर संकल्पना पक्की असेल आणि त्याला जर स्वातंत्र्य मिळाले तर तो चांगली निर्मिती होते.
जो चित्रपट परत पहिला आणि जर पुन्हा आवडला तर तो नक्की चांगला असतो. किंवा जर तो प्रत्येकवेळी नवी अनुभूती देत असेल तर त्यात त्याचे यश आहे. एखादा चित्रपट खूप काळानंतर पहिला व पुन्हा त्या काळात घेवून गेला तरी त्याचे ते यश असते.
आता चित्रपट डिजिटल झाल्याने फिल्म हा विषय नाही. डाऊन लोड केले की झाले. त्यामुळे त्यांचे आयुष्य कमी झाले. म्हणजे एकाच वेळी सर्वत्र प्रकाशित झाल्याने एक दोन आठवड्यात ते थेटर मधून बाहेर होतात. शिवाय आता थेटर मध्ये जाणे बरेच महाग झाले आहे. सोबत पॉप कोर्न , शीतपेये असे महाग घटक तिकीट खर्चाबरोबर येतात. शिवाय त्याच्या पायरेटेड प्रती लगेच उपलब्ध होतात त्यामुळे पण या क्षेत्राला खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याबरोबर घरोघर सहज उपलब्ध झालेली टी व्ही ची करमणूक पण सिनेमाला मारक ठरते आहे.
हे सगळे असले तरी माझ्या पिढीला असलेले सिनेमाचे गारुड मात्र कायम राहणार हे निश्चित.
अनिल जोशी.
१६.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी.
Comments
Post a Comment