फळांचा राजा हापूस
उन्हाळा आणि आंबे हे एक पक्की समीकरण आहे. लहानपणी मला आठवतंय आम्ही विरार ला राहत होतो आणि त्या आवारात अनेक झाडे होती. त्यात एक आंब्याचे झाड पण होते. त्या झाडाखाली असंच कधीतरी बसलो असतांना वरून एक आंबा टपकन खाली पडला. पिकून गळून पडलेले ते फळ होते. घरी येवून ते धुतले आणि आईने मग तो आंबा पिळून कसा खायचा ते दाखवले. हा आनंद कधी कधी घेतल्याचं आठवतंय. आमचे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील बसणी. वडिलांचा तिकडे ओढा स्वाभाविक होता. घर चालू होते. मग ते काहीही प्रयत्न करून तिकडून खास हापूस आंबे आणायचेच. त्या काळात त्यांना रोज आमरस असला तरी चालायचे. बाकी काही नको, ते अगदी ते जाई पर्यंत. नोकरी निमित्त गावे बदलली , पण आंबे आणणे व खाणे यात कधी खंड पडला नाही. सध्याचा सिंधुदुर्ग व रत्नागिरी यांचा मिळून पूर्वी एक रत्नागिरी जिल्हा होता व त्याचा विस्तार बाणकोट ते बांदा म्हणजे सुमारे २०० किमी चा होता. त्यामुळे आंबा हापूस असला तरी देवगड कडचा वेगळा, रत्नागिरीचा वेगळा व दापोली कडचा वेगळा असे चवीचे प्रकार जाणकाराच्या लक्षात येतात. मला वाटत एक उन्हाळा आम्ही नागपूरला असल्याने त्या वर्षी आंबे आणले नव्हते.
तो वारसा पुढे भावाने चालू ठेवला. कोकणात आंबे तयार होऊ लागले की प्राधान्याने ते मुंबईला पाठवले जातात . तिकडची बाजारपेठ मोठी व कोकण आणि मुंबई यांचे एक अतूट असे नाते आहे. शिवाय तेथून निर्यात पण होते. तेव्हा काही वर्षे माझा भाऊ एका चुलत भावाला घेवून मोटार सायकलवरून कोकणात फिरून जिथे आंबे भरले जातात तिथे जावून ते पुण्याला पाठवायची व्यवस्था करत असे. कधी आम्ही सुटीला कोकणात गेलो तर तिथून येताना पोत्यात भरून आंबे आणल्याचे आठवतय कारण इथे जो पेटीचा भाव त्या भावात शेकडा आंबे मिळायचे. ते आंबे आल्यानंतर त्याची उस्तवार करणे पण जिकीरीचे काम असते. वरचेवर पाहून त्यात एखादा डागी आंबा नाही ना हे पहावे लागते. जेव्हा आंबे उतरवतात तेव्हा ते जमिनीवर आपटणार नाहीत हे पहावे लागते. ते जर आपटले तर पिकताना ते आंबे तिथे डागाळतात व त्या मुळे इतर आंबे खराब होतात. आंबे पिकले की ते मोकळे ठेवावे लागतात. आंबे दर्जेदार असल्याने त्याला मागणी चांगली असे. एकदा आंबे नेलेली माणसे पुन्हा पुन्हा आंबे नेत असतात .
पूर्वी आमची वडिलार्जित कलमांची बाग होती. ती खंडाने दिली जात असे. म्हणजे त्या आंब्यांच्या बदल्यात रोख रक्कम घ्याची. पुढे पुढे हे सगळे अवघड व्हायला लागले. वडिल व काका सगळे वयपरत्वे थकायला लागले होते. त्यांची जी इच्छा होती की निवृत्तीनंतर तिकडे जावून राहायचे ती पूर्ण होत नव्हती आणि मग तेथील सगळा पसारा आवरायचे ठरले. फक्त घर व परिसर सोडून सगळ्या गोष्टी विकून टाकल्या. आंब्याची बाग शेजार्याला विकली. त्यामुळे आमच्या बागेतील आंबे आम्हाला शेजारून विकत घेवून खाता येतात. आता फोन ची सुविधा असल्याने फोन केला की पेट्या येतात.
आमच्या परसात दोन आंब्याची झाडे आहेत. एक भोराम्बी जिचे फळ हापूस नसून सुद्धा रसाळ व गोड , फार पूर्वी भोरी नावाची एक म्हैस मेली तिला एका खड्ड्यात पुरली व तिथे एक आंब्याचे झाड लावले म्हणून ती भोराम्बी. तर दुसरा आमट्या आंबा. फार पूर्वी भोरी नावाची एक केशरी व लालबुंद पण आतून एकदम आंबट. कुणी मोहात पडून खायला घेतलाच तर पश्चात्ताप नक्कीच.
आता भरपूर आंबे खाणे हे तसे परवडणारे राहिले नाही.त्या निमित्ताने एक किस्सा आठवतो. मित्र मुकुंद गाडगीळ हा आंबे भक्त. मग त्याने शक्कल काढली. त्या सुमारास पैसे येतील असे रिकरिंग खाते दरमहा त्याने सुरु केले त्या मुळे तो भरपूर आंबे घेवून खावू शकायचा.
अशीच एक आठवण एका मित्राने सांगितली. शालांत परीक्षा झाल्यानंतर मोठी सुटी असते तेव्हा एका कोकणातील मित्रांना सांगितले तुम्ही माझ्या घरी सुटीला या. देवगड तालुक्यातील गाव होते ते. तिथे आंबे पेट्यांमध्ये भरून पाठवायची खूप कामे असतात. आम्हाला मदत होईल, तुम्हाला पण सुटीत बदल मिळेल व भरपूर आंबे खायला मिळतील. हे सगळे मित्र गेले. त्यांनी मदत पण केली , आंबे पण खाल्ले, सुटी आनंदात गेली.तो मित्र नंतर म्हणाला की आम्ही तिथे भरपूर आंबे खाल्ले. पण असं लक्षात आलं की आम्ही खाल्ले ते वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट आंबे होते पण कधी हापूस नाही खाल्ला. सगळा हापूस पेट्यांमध्ये भरून पाठवला गेला. आहे की नाही खास कोकणी चस्का.
एकदम आंबे तयार झाले की त्यांची योग्य ती सोय लावावी लगते. मग पूर्वी तयार आंब्यांचा रस काढून तो बाटल्यांमध्ये भरायचा व केनिंग सेंटर मध्ये त्या सीलबंद करायच्या हे पण केले आहे मग कोणत्याही सिझन मध्ये बाटली फोडली की आमरस मिळणार.
शिवाय रस सुकवून त्याचा गोळा करणे जो बराच टिकतो, त्याची साटे घालणे हे उद्योग कोकणात घरोघरी चालतात. अर्थात इतर कृषी प्रकारांप्रमाणे हे पीक पण बेभरवशी आहे. म्हणजे एखाद्या वर्षी पीक आले तर पुढील वर्षी येतेच असे नाही. त्याच प्रमाणे मोहोर आल्यानंतर मळभ आले, पाऊस आला तरी पीक हातचे जाते. त्यामुळे कधी कोकणात विचारले की यंदा आंबा कसा आहे तर उत्तर मिळेल काही खरे नाही, पण उशीरा आहे.
असे असले तरी दर वर्षी आंबे येतात, लोक खातात.
मग लहानपणी ऐकलेले गाणे आठवते -
आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो.
अनिल जोशी
१७.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
वाह अनिल जी.... आंब्याचा घमघमाट सुटलाय नुसता...
ReplyDelete... प्रशांत थोरात पुणे कार्यवाह,गुरुकृपा संस्था.
Waa. Khuupch chan
ReplyDelete