कॉंग्रेस नक्की कुणावर नाराज आहे

Image result for flag of indian national congressImage result for flag of ncp

कालच्या ब्लॉग मध्ये कॉंग्रेस च्या बुजगावणे नितीबद्दल लिहिले. पण एकूणच कॉंग्रेस नाराज आहे हे नक्की. ही नाराजी प्रथम व्यक्त केली नेते बाळासाहेब थोरात यांनी. विधानसभेची ६वी जागा आघाडीने लढवावी व कॉंग्रेस ला पण दुसरी जागा मिळावी म्हणून. पण त्यांना ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माघार घ्यावी लागली. पण नाराजी, खद खद तशीच राहिली. मग एकूण आघाडी सरकारचे परिस्थिती हाताळण्यात येत असलेले अपयश , कोरोना रुग्णांची वाढती संख्या, यंत्रणेत समन्वयाचा अभाव, त्यामुळे सरकारच्या या अपयशापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा हा विचार कॉंग्रेस च्या मनात बळावू लागला. 
मुळात कॉंग्रेस या आघाडी सरकारमध्ये येण्यास फारशी उत्सुक नव्हती. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवे होते शिवाय २०१४ मध्ये भाजपने त्यांना जो धोबी पछाड मारला होता त्याचा बदला घ्यायचा होता. १९९५ मध्ये शिवसेना व भाजपने युती करून शरद पवार यांच्या अखंड कॉंग्रेस ला पराभूत केले होते ते शरद पवार यांच्या मनात हे शल्य होतेच. संधी मिळताच त्यांनी युतीत बिब्बा घालण्यासाठी २०१४ च्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानांच भाजपला पाठींबा देवून एक डाव टाकला होता. पण फडणवीस यांनी नंतर सेनेला सरकारमध्ये घेवून राष्ट्रवादीला बाजूला ठेवले. त्यामुळे जर सेनेला मुख्यमंत्रीपद देवून जर युती तुटत असेल तर ती संधी शरद पवार यांनी घ्यायचे ठरवले. आणि या सरकारमध्ये जर कॉंग्रेस आली तरच हे शक्य होते. आणि कॉंग्रेस ला सरकारमध्ये आणणे हे सेनेला शक्य नव्हते आणि ते काम फक्त शरद पवारच करू शकत होते. त्यामुळे हे सरकार बनवण्यात पुढाकार हा शरद पवार यांचा, मुख्यमंत्रीपद शिवसेनेला . पण यात कॉंग्रेस ला काय मिळणार होते? फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे मानसिक समाधान
नंतरच्या सत्ता वाटपात बोके न्यायाप्रमाणे लोण्याचा गोळा राष्ट्रवादीने घेतला , मुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून शिवसेना खुश. यात कॉंग्रेस सहभागी झाली ती एक लिंबू टिंबू पार्टनर म्हणून. ५ वर्षांनी सत्तेत यायला मिळाले . राजकारण करताना सत्ताकारण महत्वाचे असते. आणि सत्ताकारणा बरोबर असते ते अपरिहार्य अर्थकारण. पण हे सरकार आले आणि ते स्थिर होत असतांना कोरोनाचे संकट आले आणि सरकारमध्ये राहण्यात फायद्यापेक्षा तोटे जास्त जाणवायला लागले. आणि या सरकारमध्ये राहणे आता सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी स्थिती झाली आहे. त्यातून भाजपला कर्नाटकात रोखण्याचा प्लान फसला आणि मध्यप्रदेशात स्वपक्षाचे सरकार पण गेले. मग अशा परिस्थितीत या सरकारमध्ये राहण्याबाबत कॉंग्रेसच्या मनात चलबिचल सुरु झालेली दिसत आहे. फक्त ही योग्य वेळ नसल्याने या ना त्या मार्गाने ते नाराजी व्यक्त करत आहेत. 
ही नाराजी नक्की कोणाबद्दल आहे तर ती ज्या परिस्थितीत शरद पवार पक्षाला नाचवत आहेत त्याबद्दल असू शकते. कारण राष्ट्रवादी पक्ष स्थापनेनंतर ना राष्ट्रवादी महाराष्ट्रात मूळ धरू शकली ना कॉंग्रेस वाढू शकली. १५ वर्षे आघाडी सरकार मध्ये मुख्यमंत्रीपद घेवून पण सरकारमध्ये वरचष्मा राहिला राष्ट्रवादीचाच. 
शिवसेनेबद्दल कॉंग्रेसला प्रेम वाटायचे काहीच कारण नाही. कारण विचारधारा व कार्यशैली यांच्यात असलेली तफावत. राष्ट्रवादीचे तसे नाही. त्यांची विचारधारा ही लवचिक असते. एका वेळी ते कॉंग्रेस शी असलेली नाळ कुरवाळू शकतात तर कोणत्या पक्षाशी हात मिळवणी करताना तत्व बाजूला ठेवू शकतात. आता सुद्धा २०१९ मध्ये कॉंग्रेस वर व शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी अजित पवार यांना फडणवीस यांच्याबरोबर शपथ घ्यायला लावून आपले महत्व अधोरेखित केले. 
त्यांमुळे कॉंग्रेस ची नाराजी ही कुणाबद्दल असेल याचा अंदाज येवू शकतो.

अनिल जोशी 
१९.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती