आठवणीतील गावे- विसापूर
आपल्या आयुष्यात जशी अनेक माणसे या ना त्या कारणाने येतात तशी अनेक गावे पण येतात. आणि ती आपल्या आठवणीत असतात. वडिलांची सरकारी नोकरी बदलीची असल्याने आठवणीतील गावांची संख्या पण हस्त आहे. आज त्यातील विसापूर बद्दलच्या काही आठवणींना उजाळा देणार आहे.
वास्तविक विसापूर या गावत
अगदी लहानपण सोडल तर माझ वास्तव्य झालं नाही. विसापुरला वडिलांचे वास्तव्य दोन
टप्प्यात होते. त्यांचे लग्न झाले तेव्हा ते पुण्यात होते पण लगेच त्यांची बदली
विसापूर येथे झाली. सुमारे साडेचार वर्षांच्या वास्तव्यात आम्हा दोन्ही भावांचा
जन्म तिथलाच. म्हणजे जन्माच्या वेळी आई पुण्यात आली होती कारण विसापूर हे अगदी
खेडे होते. तेहील दुसर्या टप्प्याच्या अखेरपर्यंत तेथे वीज नव्हती. मात्र तेथे
रेल्वे स्टेशन असल्याने रेल्वेची वर्दळ मात्र आहे. दौंड येथून नगर कडे जाणार्या
दौंड मनमाड मार्गावर दौंड पासूनचे तिसरे स्टेशन व तसेच दोन तीन स्टेशन पुढे गेले
की नाग हे जिल्ह्याचे ठिकाण. शेजारी बेलवंडी हे साखर कारखान्याचे गाव.
विसापूरचे वैशिष्ठ्य म्हणजे
तिथे मोठा जिल्हा तुरुंग आहे. त्याच बरोबर समाज कल्याण खात्यातर्फे चालवले जाणारे
बेगर्स होम पण आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेजारी पाण्याचा मोठा तलाव आहे.
त्यामुळे या दोन्ही आस्थापनांना व कर्मचार्यांच्या वसाहतीला घरपोच नळाचे पाणी ही
सोय आहे. म्हणजे वीज नाही पण नळाचे भरपूर पाणी मात्र उपलब्ध.
वडिलांचे तेथील पहिले
वास्तव्य आमच्या लक्षात नाही पण आईच्या कडून अनेक आठवणी ऐकलेल्या. पुण्या मुंबई
पासून तसे जवळ असल्याने अनेक नातेवाईक आमच्याकडे येवून राहून गेले. मोकळा परिसर व
स्वच्ह हवा यामुळे त्यांचे वास्तव्य रम्य आठवणी म्हणून सुखावह झाले होते.हे
वास्तव्य १९५८ मध्ये संपले.
मग ११ वर्षांनी १९६९ मध्ये
पुन्हा त्यांची बदली झाली. पण ती विसापुरला न होता तेथून एक मैल भर लांब असलेल्या
पिंपळगाव पिसा येथील बेगर्स होम मध्ये झाली .इथे जायला विसापूर स्टेशन लाच उतरावे
लागे. शिवाय जी काय एक दोन दुकाने होती ती विसापूर स्टेशन जवळ होती. आठवडी बाजार
दर रविवारी विसापूर येथे असायचा. तर दुसर्या बाजूला पिंपळगाव येथे पण (बहुतेक
गुरुवारी) बाजार असायचा. इथे प्रशस्त असलेला तीन मोठ्या खोल्या व व्हरांडा असलेला
एक बंगला राहायला मिळाला होता. इथे जेव्हा बदली झाली तेव्हा मी दहावीत गेलो होतो.
त्यावेळी आम्ही मुंबईत होतो. आणि एस एस सी ची परीक्षा अकरावीची. तेव्हा ही दोन्ही
वर्षे तशी महत्वाची. त्यामुळे माझ्या मामाने सुचवले की मी विसापुरला न जाता
त्याच्याकडे राहावे. त्यामुळे आमचा परिवार पिंपळगाव-विसापुरला व मी मामाकडे
डोंबिवली येथे असे स्थलांतरित झालो.
त्यामुळे सुटीला मी
विसापुरला जात असे तेवढेच माझे तेथील वास्तव्य. भाऊ आणि बहिण यांची शिक्षणे मात्र
विसापूरच्या शाळेत झाली. यथाकाल एस एस सी नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी
पुण्यात आलो पण विसापुरला जायला एकच सोयीची गाडी मुंबई-दौंड –मनमाड सवारी. मुंबई
हून सकाळी १०च्या सुमारास निघालेली ही गाडी विसापुरला संध्याली ७ वाजता पोचत असे
.पुण्याहून हीच गाडी ४ च्या सुमारास निघे. १९७३ -७४ च्या सुमारास कोल्हापूर –नागपूर
ही महाराष्ट्र एक्स्प्रेस गाडी सुरु झाली ती पुण्याहून रात्री १० नंतर निघे ती
विसापुरला रात्री १ च्या सुमारास पोचत असे. नोकरीला लागल्यावर मला तिकडे जायला ही
गाडी सोयीची होती. येताना संध्याकाळी ६ च्या सुमारास मुंबई सवारी गाडी येत असे. ती
रात्री १०च्या सुमारास पुण्यात येत असे. या गाडीच्या वेळेला तिथे अप्रतिम चवीची
गरमागरम भाजी मिळत असत ती खाण्यासाठी लोक फिरायला स्टेशन वर येत असत. पुण्यापासून
या गाड्यांना कोळशाचे इंजिन लागत असे या
मध्ये दोन तासाच्या प्रवासानंतर पाणी भरावे लागत असल्याने अशा पाण्याच्या
स्थानकांवर गाडी १० मिनिटे थांबत असे. विसापूर हे असेच पाण्याचे स्थानक होते. पुढे
डीझेल इंजिन आल्यानंतर त्यांचे महत्व कमी झाले. त्यामुळे झेलम, गोवा , आझाद हिंद
किंवा वाराणसी एक्स्प्रेस्ने प्रवास करताना या गाड्या विसापुरला न थांबता गेल्या
तेव्हा विसापुरला धावत्या गाडीतूनच बाय बाय करावे लागले होते.
१९७४ मधेच वडिलांची बदली
पिंपळगाव हून विसापूर येथे झाली. येथे राहायला आऊट हाउस सह ९ खोल्यांचा बंगला
मिळाला होता. पण १९७५ मध्ये भाऊ पण बाहेर पडला व त्या मोठ्या घरात आई, वडिल व बहिण
अशी तिघ राहत असत. पिंपळगाव किंवा विसापूर येथे रोज संध्याकाळी सरकारी पेट्रोमेक्स
ची बत्ती येत असे त्यामुळे अगदी मिणमिणत्या प्रकाशात राहावे लागत नसे पण बहिण
जेव्हा पहाटे अभ्यासाला उठायची तेव्हा मात्र तिला कंदिलाच्या प्रकाशातच अभ्यास
करावा लागे. विसापूर येथून स्टेशन चालत जायच्या अंतरावर होते. पण पिंपळगाव ला
जायला टांगा किंवा बैलगाडी हीच साधने उपलब्ध होती.
१९७६ च्या जून मध्ये १
तारखेला मी विसापूर स्टेशन वर उतरलो आणि भावाने बातमी दिली की वडिलांची बदली
पुण्याला झाली. आणि तेथील वास्तव्य संपले. नंतर आधी लिहिल्याप्रमाणे धावत्या
गाडीतून बाय बाय .
इथे नुसते गाव, बाजार, तलाव
एवढेच आठवणीत राहत नाही. अनेक माणसे संबंधात आली. आधीच्या वास्तव्यातील दामले आणि
देशपांडे. दामले पुढे मुंबईला घरी आले होते. तर देशपांडे यांनी आमच्या इमारतीत
शनिवार पेठेत घर घेतल्याने नाळ पुढच्या पिढ्यांपर्यंत जोडली गेली. नंतरच्या
वास्तव्यात प्रधान, पंडित, शहाणे, ठेकेदार, पानसे, अवचट, नगरच्या जोशी बाई,
दीक्षित बाई, डॉ. पाटील, डॉ शिंगवी अशी किती नावे द्यावीत. यातील काही मंडळी अजून
भेटतात. काही दिवसांपूर्वी भरत नाट्य मंदिर येथे संगीत शिक्का कट्यार पाहायला गेलो
असता नंतर आनंद पानसे यांना भेटलो तेव्हा त्यांनी विसापूरची आठवण आवर्जून काढली.
वास्तविक ते पण माझ्यासारखेच सुटी पुरते तिकडे जात होते.
तसेच प्रकाश अवचट हा पण
मुंबईला शिकायला होता तो पण सुटीला विसापुरला येत असे. पुढे तो पण टेल्को मध्ये
नोकरीला लागला व आम्ही भेटत राहिलो.
आमची लग्ने झाली आणि मग आमच्या बायकांना एकदा
विसापूर दाखवून आणावे असं विचार आला. आता हाताशी गाड्या आहेत. मनात आले की दीड दोन
तासात विसापुरला पोहोचू शकतो. पण तो योग काही अजून आला नाही. पाहूया केव्हा येतोय?
अनिल जोशी
०२.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया
आपल्या नावासह द्यावी
रम्य ते बालपण....
ReplyDelete