प्रवासातील कुतूहल

स्पंदने विचारांची .............: 2015 दर्शन घेऊन वारकरी परतीच्या ...
प्रवास हा एक गुरु आहे असे म्हणतात पण प्रवास जे काही आपल्याला शिकवतो त्या साठी आपले कुतूहल मात्र जागृत असायला हवे. आता प्रवासाला जाताना आपण आपली जागा आरक्षित करतो. आणि मग आपल्याला कोणत्या जागेवर बसून वा बर्थ वर झोपून प्रवास करायचा आहे हे समजले की प्रच्वासातील अर्धे कुतूहल संपून जाते. अचानक प्रवासाला निघायचे आहे आणि आपण बस स्टोप वर वा स्टेशन वर बस/गाडी पडायला जातो. कोणती बस /गाडी मिळणार, बसायला जागा मिळेल की नाही अशा अनिश्चित अवस्थेत आपण प्रवास सुरु करतो कधी छान जागा मिळते व प्रवास सुखकर होतो तर कधी हाल होतात पण प्रवासाची निकड असल्याने आपण ते गोड मानून घेतो.
गर्दीच्या दिवसात विना आरक्षण प्रवास नको वाटतो. म्हणजे आपल्याला बस मध्ये प्रवेश पण मिळत नाही. असाच एक प्रसंग घडला. कोल्हापूर हून पुण्याला यायचे होते. कोकणातून कोल्हापूरला एकाला आरक्षण करायला सांगितले होते. पण त्याला ते जमले नाही आणि ओ भेटला पण नाही. तेव्हा आतासारख्या खूप बसेस वा खाजगी गाड्या नव्हत्या. तिथून सुटणाऱ्या सगळ्या गाड्या फुल. मग स्टेशनवर आलो. थोड्या वेळाने महाराष्ट्र एक्स्प्रेस सुटणार होती. मग एका हमालाला थोडे पैसे दिले व त्याने आम्हाला छान समोर सच्या खिडकीच्या बाजूच्या जागा त्याने दिल्या. रेल्वे चा प्रवास हा लांबचा असल्याने वेळ लागला पण प्रवास चांगला झाला. या उलट एकदा मुंबईला जायचे होते. सकाळी ७ च्या सुमारास मी स्टेशनवर पोचलो. तिथे थोड्याच वेळात मुंबीसाठी सह्याद्री एक्स्प्रेस येणार होती. तिकीट काढून गाडीत बसायचे आणि मुंबईला जायचे . आणि ही गाडी कोल्हापूर हून येते व अनेक प्रवासी पुण्याला उतरतात त्यामुळे जागा मिळते. पण तेवढ्यात काय बुद्धी सुचली मी एशियाड स्टोप वर गेलो तर दादर ला जाणारी बस सुटत होती. मी पटकन बसमध्ये बसलो. बस निघाली. लोणावळा वेळेत आले.  नंतर मात्र बस मुंगीच्या गतीने चालू लागली. ना धड कुठे थांबली व ना धावत होती. जी बस साधारण ११ साडे अकराला दादर ला पोचायची ती तब्बल ३ वाजता पोचली. तेव्हा जुना रस्ता होता त्यामुळे असा प्रकार वारंवार घडत असे. त्यामुळे प्रवासात चहा पाणी नाही , जेवण नाही असा लांबलेला प्रवास.
अर्थात आरक्षण करून पण प्रवास सुरळीत होतोच असे नाही. आम्ही वाराणसी हून येत होतो. गर्दीचे दिवस होते त्या मुळे अगदी चार्ट ओपन झाल्यावर आरक्षण केले तरी ते RAC मिळाले. आम्ही वाराणसीला गाडीत बसलो. बाजूच्या दोन सीटवर आम्ही तिघे. बाजूच्या मुख्य ६ जागांवर १० जण दाटी वाटी ने बसलेले. प्रवास सुरु झाला आणि अलाहाबाद आले. तिथे यांचे आरक्षण होते ते ६ जण आले. म्हणजे वाराणसी येथे जे लोक बसले होते ते विना आरक्षित होते. नंतर आणखी काही लोक आले. ज्या ठिकाणी रेल्वेने ९ जणांची सोय केली त्या जागेत तब्बल २७ लोक प्रवास करत होते. फार भयानक अनुभव होता तो.
असे हे काही अनुभव सहज आठवले. जरा हट के होते म्हणून लिहिले. नाही तरी  हल्ली आपण कमीत कमी धोका पत्करून प्रवास करतो. शक्यतो विमान सेवा असावी. नाही तर सुपर फास्ट रेल्वे तरी हवी. सगळा प्रवास एकदम हाय फाय. आणि प्रवासात कुणी सहप्रवासी भेटून प्रवास संस्मरणीय होईल ही पण शक्यता नाही. कारण सगळ बदललच आहे. सहसा कुणी ओळख वगैरे काढून प्रवासात बोलत वगैरे नाही.
त्यामुळे अचानक, न ठरवता प्रवास आता शक्य नाही . पण अजून एक महत्वाचा प्रवास बाकी आहे. तो कसा असेल या बद्दल कुणीच काही सांगू शकत नाही. त्या अटळ प्रवासाची प्रतीक्षा सगळ्यांनाच असते. पण सहसा कुणी त्या बद्दल विचार करत नाही . किंवा त्याबद्दल बोलणे पण होत नाही. या प्रवासाचे आरक्षण जन्माच्या वेळी झालेले असते पण त्याची तारीख, वेळ आपल्याला माहित नसते. म्हणूनच असेल कदाचित नियती आपल्याला अशा अचानक , न ठरवता प्रवासाच्या अनुभवाची शिदोरी देत असते.

अनिल जोशी
२०.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी. 

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती