ते ठीक आहे , भाजपचे काय?

Image result for भाजप ध्वज

मी गेले दोन दिवस कॉंग्रेस च्या एकूण खेळी बद्दल लिहित होतो. त्यावर प्रतिक्रिया अशी आली की कॉंग्रेस ची या सरकारमध्ये येण्याबाबत काही धारणा असणार,राष्ट्रवादीचा पण काही डाव असू शकतो , शिवसेनेची महत्वाकांक्षा असू शकते. मग भाजपचे काय? त्यांचा अति आत्मविश्वासाचा फुगा फुटलाच की नाही? फडणवीस यांनी जागा कमी मिळाल्यावर सेनेला मुख्यमंत्रीपद देवून रिमोट कंट्रोल स्वत:कडे का ठेवला नाही? का फडणवीस यांची महत्वाकांक्षा पक्षाच्या हिताच्या आड आली?
वास्तव हे आहे की महाआघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे पराभव झाला त्याचे उत्तरदायित्व नैसर्गिकरीत्या फडणवीस यांच्याकडे जाते. आणि पराभवाला कुणी पालक नसतो. तो स्वीकारावा लागतो आणि टीकेचे धनी व्हावेच लागते.
आता महाघाडी सरकार होणे थांबवता आले असते का? अर्थात या जर तर च्या चर्चेला तसा अर्थ नाही पण त्या काळातील परिस्थिती पाहता काही अंदाज माझ्या आकलनानुसार. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदासाठी (कोणत्याही किमतीत सगळे पर्याय उघड ठेवून) आग्रही होते आणि त्यांचा दावा होता हा भाजपने त्यांना शब्द दिला होता. आणि तसे काही ठरले नसल्याने फडणवीस यांनी ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद मान्य करणे शक्यच नव्हते. शिवाय फडणवीस हे पक्षात निर्णय घेणारे एकटे नेते नव्हते. या सगळ्या गोष्टींकडे अमित शाह यांचे लक्ष होते. फडणवीस यांचे फोन उद्धव घेत नव्हते. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असता तर अमित शाह नक्कीच बोलायला आले असते. पण सगळी सूत्रे संजय राऊत यांच्याकडे होती आणि त्यांचा आवेश तर असा होता की त्यांनी मोदी यांना पण दाद दिली नसती इतके ते पवार यांच्या प्रभावाखाली होते. त्यामुळे आघाडीला सरकार स्थापन करू देणे हा शहाणपणाचा निर्णय होता.
कारण राष्ट्रवादीचा ही युती मोडणे हा हेतू होता. आणि त्यांनी या प्रकरणी कॉंग्रेस ची साथ घेतली. पण या दोघांना हे सरकार चालावे हे प्राधान्याने वाटत नाही. त्यामुळे कॉंग्रेस ची नाराजी असो, किंवा सुरुवातीला सरकार स्थापन झाल्या झाल्या उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा उत्साह दिसला पण सध्या तो कुठेच जाणवत नाही. ते जर पडद्याआडून कार्यरत असतील तर चांगलेच. पण एकूण परिस्थिती मध्ये अनुभवी प्रशासनाची जी कमतरता जाणवते त्यावरून हा अंदाज केला आहे.
आता भाजप बद्दल काही लिहिले तर भक्त म्हणायची पद्धत आहे. मी तर कोण्या देवाचा पण भक्त पण नाही तर भाजपचा कसा असेन? आता भाजप शी वैचारिक बांधिलकीमुळे व काही काळ संघ, अभाविप मध्ये कम केल्याने , काही मित्र आज भाजपचे मंत्री खासदार आहेत, काही पत्रकरांशी बोलणे होत असते, सभोवती घडणाऱ्या घटना डोळसपणे बघण्याची सवय आहे व भूत काळातील काही संदर्भ नीट आठवत असल्याने असे लिहिता येते.
आता भाजपची दु:स्थिती पण पाहवत नाही अशा प्रतिक्रिया येत आहेत. पण भाजप हा पक्ष आहे त्या मुळे चढ उतार येत असतातच. सगळी परिस्थिती अनुकूल असताना पण दोन वेळा भाजप दिल्ली विधानसभा जिंकू शकला नाही. या वेळच्या निवडणुकी आधी काही दिवस फोनवर जावडेकर यांच्याशी बोलणे झाले होते तेव्हा त्यांच्या बोलण्यात आले होते की भाजपचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतांचा वाटा ४० % असेल . तो ३८% झाला पण या मतांच्या टक्केवारीचा जागा जिंकण्यात उपयोग नाही झाला. तेव्हा सगळ्या खेळी, चाली यशस्वी होतातच असे नाही. आणि भाजप आपला विचार करायला समर्थ आहे.
आणखी एका आक्षेपाबद्दल लिहावे असे वाटते . चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मधून उमेदवारी दिली हे अनेकांना आवडले नाही. त्यांनी कोल्हापूर हून निवडणूक लढवायला हवी असे मत होते. इथे पण थोडी माहिती देतो. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असले तरी ते तेथील राजकीय नेते नाहीत. ते आधी विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाचे मंत्री होते. नंतर ते प्रचारक झाले व त्यात ते गुजरात मध्ये काम करत असताना अमित शाह यांच्या जास्त संपर्कात होते. भाजप ने अनेक पूर्णवेळ कार्यकर्त्यांना राज्यसभा, विधानपरिषद इथे संधी दिली . त्या मुळे प्रकाश जावडेकर दोन वेळा विधान परिषदेत व दोन वेळा राज्यसभेत गेले. तसेच बाळ आपटे पण राज्यसभेत गेले. त्यानुसार पदवीधर मतदार संगातून चंद्रकांत पाटील यांना संधी दिली गेली.
२०१४ मध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निवडायचा होता. आणि ज्येष्ठ नेते म्हणून नाथाभाऊ खडसे यांना विचादरले गेले . पण त्या वेळी ते विरोधी पक्ष नेते ( कॅबिनेट मंत्री दर्जा) होते आणि त्यांनी हे पद सोडून पक्षाध्यक्ष पद घ्यायला नकार दिला. आता पक्ष नेतृत्व सगळ्या बाबींचा विचार करत असते तसा त्यांनी तो केला. नाथाभाऊ हे प्रभावी विरोधी पक्ष नेते नव्हते. ते your majesty पद्धतीचे विरोधी पक्ष नेते होते ही पक्ष श्रेष्ठींची धारणा झाली होती. त्यामुळे काही वेळा सिद्ध करण्याची वेळ येते तेव्हा ज्येष्ठत्व व पक्षासाठी त्याग वगैरे बाबी उपयोगी येत नाहीत. नंतर फडणवीस यांच्याकडे सत्ता आल्यानंतर जी जुनी मंडळी होती त्यांच्या बरोबर नवीन टीम तयार होणे अपरिहार्य होते आणि त्यात चंद्र्कांत  पाटील यांना ती संधी मिळाली कारण राजकारणात त्यांची पाटी कोरी होती. आणि मग आपले नेतृत्व प्रस्थापित करायला त्यांनी विधानसभा लढवायचे ठरवले आणि मग सुरक्षित मतदार संघ दिला गेला. आता ज्यांना आपला मतदार संघ त्यांना असे मतदार संघ द्यावे लागतात. आजवर अटलजींनी ८- ९ वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली त्या वेळी पण काही स्थानिक नेत्यांवर अन्याय झालाच असेल ना. आता अमेठी, रायबरेली, गांधीनगर अशा मतदार संघात स्थानिक नेते नसतील का? पण चंद्रकांत पाटील यांना तेवढी उंची नसल्याने चर्चा झाली इतकेच.
अखेर हे राजकारण असते. आपण फक्त पाहत राहायचे. कारण ते आपले क्षेत्र नसते.

अनिल जोशी 
२१.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.



Comments

  1. I am little confused about the public promise of " sama samaan " distribution of power. Perhaps the BJP interpreted the promise as power other than the CM's office.

    This promise was made when the alliance was clinched in Feb / Mar ' 19 i.e.prior to the national election. BJP was facing the maha gathbandhan . Hence, they needed to strengthen the NDA .

    Perhaps, after the resounding success in May , the perception of relative strength, changed .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती