स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

(देवरुख ची गायिका रसिका गानू )
देवरुख हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याचे मुख्यालय असलेले गाव. कोकण म्हणजे तसा डोंगराळ प्रदेश पण रत्नागिरी जिल्ह्यात दोन गावे अशी आहेत की ती पठारावर आहेत त्यामुळे ती विशेष मानली जातात. एक दापोली व दुसरे देवरुख. देवरुख हे दोन महामार्गांच्या मधोमध व उंचावर आहे. कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावरील साखरपा व मुंबई गोवा रस्त्यावरील संगमेश्वर या दोन्ही ठिकाणांहून सारख्या अंतरावर (१६ किमी) हे गाव वसलेले आहे. या गावाचा माझा संबंध हा १९८१ मध्ये माझ्या विवाहानंतर आला. येथील माणिक रामकृष्ण दिक्षित हिच्याशी पुण्यातच विवाह झाल्यानंतर खास जावई या विशेष नात्याने या गावी प्रथम गेलो.
तसे हे दिक्षित यांचे मूळ गाव नव्हे. श्वशुर रा वा दिक्षित हे देवरुख येथे १९७० च्या सुमारास नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालाचे प्राचार्य म्हणून इथे आले होते. त्यांची अध्यापनाची सगळी कारकीर्द कर्नाटकात बेळगाव, गडद, निपाणी येथे घडली होती. अध्यापन व प्रशासन यातील हातोटी व काहीतरी साध्य करायचा ध्यास यामुळे ते इथे आले. त्यांचे मूळ गाव देवगड तालुक्यातील तिर्लोट. त्यामुळे या कोकण भूमीत काम करावे ही इच्छा होतीच. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी महाविद्यालाची उभारणी केली व आज ते छान नावारूपाला आले आहे.
प्रथम गावात आलो ते स्वागत अतिशय कौतुकाने झाले. पत्नी माणिक ही तेथे १० वर्षे वास्तव्याला होती त्यात तिचे पदवी पर्यंतचे शिक्षण व नंतर महाविद्यालयाच्या कार्यालयात नोकरी . तसेच दिक्षित कुटुंबाचे पण तेथील वास्तव्य तितकेच. पण स्वभावातील आत्मीयता व माणसे जोडण्याची वृत्ती या मुळे हे कुटुंब त्या गावत वर्षानुवर्षे वास्तव्याला असल्यासारखे झाले होते.
गावातील अनेक लोकांशी परिचय झाला. दुसर्याच दिवशी सकाळी कॉलेज मध्ये गेलो व वाचनालयाला भेट आली. मग गावातील काही प्राध्यापकांच्या घरी जाणे , गप्पा मारणे झाले.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती तात्यासाहेब आठल्ये यांचा परिचय झाला.
नंतर कारणा कारणाने येणे होतच राहिले. शेजारील गानू परिवार , घाणेकर, जोशी, आठल्ये, देव, आगरकर, देवर्डे, शिर्के हे प्राध्यापक व त्यांचे परिवार हे माझ्या परिवारात सामील झाले. आम्ही त्यांच्याकडे नि:संकोचपणे जात होतो व ते पण आमच्याकडे त्याच प्रेमाने येत राहिले. हे ऋणानुबंध नात्यांच्या सारखेच घट्ट होते.
पुढे निवृत्त झाले तरी सासरे तिथे क्लास घेत होते. त्यांचे १९९० मध्ये निधन झाले व मुळे तिथे राहणार नसल्याने देवरुख चे (भाड्याचे असले तरी) घर बंद झाले. सासूबाई काही वर्षे चिपळूण व रत्नागिरी येथे मुलांकडे वास्तव्यास होत्या पण त्यांना देवरुखची ओढ कायम होती.
देवरुख चे दिक्षित यांचे घर बंद झाले तरी जोडलेली अनेक घरे ज्यांचे दरवाजे आमच्यासाठी सतत उघडेच होते. कोणत्याही प्रसंगी देवरुखची मंडळी आली नाहीत असे कधी झालेच नाही.
गेल्या जुलै मध्ये वृद्धापकाळाने सासुबाईंचे निधन पुण्यात झाले तर त्यांच्या देवरूखच्या शेजारील घरातील मुली -सून या आमच्या घरातील सदस्य म्हणून मदतीला हजर होत्या.
हे असे ऋणानुबंध व नाती यांच्या खोलात न जाता ती स्वीकारावी म्हणजे त्यातील निर्भेळ आनंद मिळतो.
म्हणून देवरुख शी माझे नाते हे स्पेशल जावयाचे असले तरी ऋणानुबंध मात्र जन्मोजन्मीचे असल्यासारखे अनुभवायला मिळाले.
अनिल जोशी
२२.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी
खूप सुरेख मी एकदाच गेलो देवरुखला। 1975 पण मस्त गाव। रोह्याचे च वातावरण होते
ReplyDeleteखूप छान लेख. गाव डोळ्यापुढे उभे राहीले
ReplyDeleteRemembered unforgettable childhood memories....."Devrukh" always had and will have special space.....Unforgettable people and place.. Thank you for recollection those golden days...
ReplyDelete...
Very nice
ReplyDelete