आठवणीतील गावे,बेगर्स होम आणि तेथील माणसे
(बेगर्स होम चेंबूर यु ट्यूब सौजन्य )
(आमच्या चेंबूर येथील घराबाहेत अशी रातराणी होती, जिचा घमघमाट सर्वदूर पसरायचा )
आठवणीतील गाव विसापूर लिहिताना तेथील बेगर्स होम चा उल्लेख होता. आणि आज मी विरार या गावाविषयी लिहितांना पण बेगर्स होम चा उल्लेख होणे अपरिहार्य आहे कारण आम्ही वडिलांच्या नोकरी निमित्त ज्या ज्या गावी वास्तव्य केले तिथे एक तर बेगर्स होम तरी होती किंवा बाल सुधार गृहे तरी. महाराष्ट्रात एक भिक्षेकरी कायदा (Beggars Act ) आहे त्या नुसार भीक मागणे हा गुन्हा आहे आणि यासाठी १ ते ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण या गुन्हेगारांना नेहेमीच्या तुरुंगात न ठेवता बेगर्स होम मध्ये ठेवण्यात येते व तिथे त्यांना स्वावलंबी होण्यासाठी व्यावसायिक शिक्षण ( सुतार काम , गवंडी काम , हातमाग विणकाम , कुक्कुट पालन, इत्यादी. ही बेगर्स होम समाज कल्याण खात्या तर्फे चालवली जातात. अर्थात भिकार्यांची संख्या व उपलब्ध बेगर्स होम यांचे व्यस्त प्रमाण असल्याने शिवाय सध्या अशी बेगर्स होम चालू आहेत की नाही याची पण कल्पना नाही. आणि एकदा भिक मागण्याची व त्यातून सोप्या पद्धतीने पैसे मिळायला लागले की कष्ट नको वाटतात. पण एक कैदी मात्र सजा संपल्यावर काही दिवसांनी परत विरार ला आला होता. येताना तो फुगेवाला बनून आला होता. त्याच्याकडून सर्वांनी अनेक छोट्या छोट्या गोष्टी खरेदी केल्या. एका भिकार्याचे झालेले हे एक पुनर्वसन आम्ही पहिले. पण बाकी हा प्रयोग मात्र फारसा यशस्वी झालेला दिसत नाही.
मला माझ्या आठवणीत जे आमचे पहिले घर आठवते ते विरारचे. विरार हे पश्चिम उपनगरी रेल्वेचे स्टेशन आहे. आम्ही तिथे १९५८ ते १९६३ या कालावधीत होतो. त्यामुळे बालपणीच्या खूप आठवणी तिथल्या आहेत. विरारला एक गावाबाहेर १-१.५ किमी अंतरावर जीवदानी चा डोंगर आहे . त्याच्या पायथ्याला हे बेगर्स होम व कर्मचारी वसाहत होती. हा रस्ता पुढे गणेश पुरी व वज्रेश्वरी येथे जातो. गणेश पुरी येथे तीन गरम पाण्याची -गंधक युक्त कुंडे आहेत. त्यात अंघोळ केली की खरुज आदि त्वचा रोग बरे होतात. त्या वेळी दिवसातून तीन बसेस जायच्या. अन्यथा वाहतूक टांगा, सरकारी बैलगाडी किंवा पायी. विरार हून दर तासाला चर्चगेट मुंबई येथे जायला लोकल गाडी असायची. आमच्या मागच्या दरवाजातून सुमारे एक दीड मैल लांब रेल्वे लाईन दिसायची. तेथून गुजरात येथे जाणार्या गाड्या, मालगाड्या दिसायच्या आणि त्यातल्या त्यात वेगामुळे फ्लायिंग राणी व डीलक्स (सध्याची राजधानी) या विशेष लक्षात राहायच्या.
शाळा स्टेशन जवळ होती व वस्ती पण तिथेच जवळपास होती. दर शनिवारी सकाळी तिथे आठवडी बाजार भरत असे. त्यावेळी ते एकदम छोटे गाव होते . पण तिथे प्राथमिक शाळा होती व हायस्कूल पण होते. हायस्कूल जवळ एक रबर फ्याक्टरी होती जिथून आम्ही फुगे घेतलेले आठवतात. दर वर्षी तेथील १५-१६ टांग्यांची शर्यत लागायची व त्यातील क्रमांकाप्रमाणे त्या टांग्यांना नंबर दिले जायचे. विरार हून वज्रेश्वरी प्रमाणे आगाशी व अर्नाळा येथे पण बसेस जायच्या. आगाशी येथे एक थेटर होते पण ते लांब पडायचे . आणि काही काळ टुरिंग टोकीज यायचे (तंबू मधील) तिथे काही सिनेमे पाहिल्याचे आठवते. (कोहिनूर,पैगाम, जिस देशमे गंगा बहती है इ.)
या आवारात एक विहीर होती जिचे पाणी पंपाने टाकीत चढवून नळाद्वारे सर्वांना मिळायचे. मोकळी हवा , भरपूर पाणी यामुळे इथे राहणे सुखावह होते. वीज नव्हती पण सरकारी गेस बत्ती यायची त्यामुळे अगदी कंदिलाच्या प्रकाशात राहावे लागत नसे.
ही बेगर्स होम प्रशस्त जागेत असायची. यातील काही ही स्वीकार केंद्रे असायची . म्हणजे पकडलेले भिकारी इथे यायचे व त्यांना मग जागा असेल त्या ठिकाणी त्यांना पाठवले जात असे. चेंबूर येथील बेगर्स होम तसे होते. मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा १९७१ मध्ये नव्या पेठेतील निवारा येथे स्वीकार केंद्र होते . पुढे तिथे निवारा ही संस्था उभी राहिली.
इथे आणखी एक सोय म्हणजे घरकामाला एखादा गडी म्हणजे शिक्षा भोगणारा भिकारी उपलब्ध होत असे. एक बुधासिंग नावाचा गाडी आमच्याकडे कामाला होता. तो बहिणीला खूप छान सांभाळायचा. पुढे आमची बदली मुंबईतील चेंबूर येथे झाली ( १० वर्षांनी) तेव्हा तो तिथे होता. फक्त तो क्षय रोगाने ग्रस्त होता. चेंबूर येथे महारोगी भिकारी पण असायचे. विरारला सार्वजनिक गणपती जोरात व्हायचा. एका वर्षी विरार येथे राहणारे आंजर्लेकर नावाचे चित्रकार जे वडिलांचे मित्र होते त्यांनी गणपतीच्या मागे तेथील परिसराचा देखावा चित्रित केला होता. आम्हाला शाळेत बैलगाडीतून नेणारा व आणणारा जो कैदी होता त्याचे नाव जगन होते. तो गाडीची व बैलांची छान काळजी घेत असे. एकदा शाळेतून येताना गाडी थांबली होती म्हणून उतरायला मी उडी मारली पण पडून हात मोडला. तेव्हा त्याने घरी हात रुमालाने बांधून व्यवस्थित आणले होते.
आणखी एक असाच तुकाराम नावाचा कैदी लक्षात आहे. तो अतिशय कष्टाळू होता. आमच्याकडे पिंपळगाव येथे होता.तो कधीही स्वस्थ बसत नसे. बंगल्याभोवती चा सगळा परिसर एकदम लक्ख ठेवत असे. त्याची सजा संपल्यावर पण तो आमच्याकडे राहत असे. एका छोट्या वादावरून त्याला काढून टाकावे लागले. त्याचे झाले असे की एकदा आई त्याला म्हणाली अरे किती काम करशील ? तेव्हा तो म्हणाला -तुमच्यावर अशी वेळ आली नाही म्हणून तुम्ही असं बोलता. ती वेळ आली की समजेल. हे वाक्य सहन न झाल्याने त्याला काढून टाकले.
इथे खूप सवंगडी मिळाले . कोटस्थाने, अमृत अशी काही नावे आठवतात. त्यातील अमृत कुटुंब आम्ही चेम्बुरला आलो तेव्हा तिथे होते. त्यांचा मुलगा किशोर त्या वर्षी एस एस सी झाला होता. कोटस्थाने कुटुंब वडिल विसापूर येथे असताना नगरला होते. त्यांच्याकडे एकदा गेलो होतो. पण त्यांच्या व्यसनामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. पुढे ते गेले व त्याच्या रवींद्र या मुलाला खात्यात नोकरी मिळाली. मी पण टेल्को मध्ये स्थिरावलो होतो. आमची तिथून बदली झाली त्या आनंदात असताना आई म्हणाली त्या राविन्द्रला तुला भेटायचे आहे. पण नगर ला जावून भेटणे काही झाली नाही.
विरार येथे आमच्याकडे खूप आप्त येवून गेले. मुंबई जवळ असल्याने दोन्ही मामा येत असत.आईचे वडिल ज्यांना सगळे भाऊ म्हणायचे ते पण विरारला राहायला आले होते. हे भाऊ स्वभावाने मिश्कील होते. १९६२ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत जनसंघाचा प्रचार करायला अनेक शहरातील लोक आपापल्या गावी काही दिवस प्रचाराला गेले होते आणि आमचे मामा आम्हाला घेवून त्यांच्या गावी पालगड येथे घेवून गेले होते. मी आजोबांना विचारले मग देणार का मत पणतीला? (जनसंघाला) तेव्हा ते हसत म्हणाले होते आमचे मत बैलजोडीला (कॉंग्रेस ला) .कारण ते अर्धांग झाला होता व मामाची मुंबईत दोन खोल्यांची लहान जागा होती.
मुंबई जवळ असली तरी मामांशी संपर्क पत्राद्वारे होत असे. या बाबत एक गमतीशीर आठवण आहे. आमच्याकडे एक लोणीवाला डब्यातून लोणी विकायला यायचा. आणि तो सायन ला मामाकडे पण जायचा. महिन्या दोन महिन्यातून एकदा तो यायचा. मामी तेव्हा स्मिताच्या वेळी गरोदर होती आणि कधी पण ती बाळंत होईल अशी स्थिती होती. आई पत्राची वाट पाहत असताना तो लोणीवाला आला व त्याने स्मिताच्या जन्माची बातमी दिली. ही बातमी सांगायला तो मुद्दाम विरारला आला होता. मग आम्ही लगेच मुंबईला जावू शकलो.
वडिलांची आई पण कोकणातून येवून राहायची . आईची आजी -जी गिरगावात राहायची व आईला तिची आई लवकर गेल्याने आजी आईच्या जागी होती. शिवाय एक मावशी वसई येथे राहायची त्यांच्याकडे पण जाणे येणे असायचे. बहिणीच्या जन्माच्या वेळी विरार येथे सोय नसल्याने आई वसई येथे बाळंत पणाला गेली होती.
विरार येथील पाणी हे नैसर्गिक गोड होते. कारण वसई ला पाणी मचूळ असायचे तर मुंबईचे क्लोरीन मिश्रित पाणी पण तेव्हा आवडत नसे. विरार येथील आणखी महत्वाची घटना म्हणजे माझी मुंज. मांडव घालून माझी व चुलत भाऊ रवी अशा दोन मुंजी तिथे थाटात केल्या. आणि विरार मधील वास्तव्याचा तो उत्कर्ष बिंदू होता. कारण त्यानंतर लगेच वडिलांची नागपूर येथे झाली व विरार पर्व संपले.
मी जेव्हा विसापूर बद्दल लिहिले व त्यात बेगर्स होम चा उल्लेख आला तेव्हा ज्येष्ठ कादंबरीकार वैजयंती काळे यांनी अशी सूचना केली की बेगर्स होम बद्दल थोडी जास्त माहिती व काही व्यक्तिचित्रे लिहून लेख जास्त जिवंत करता येईल . सुदैवाने अनेक गोष्टी अजून आठवत असल्याने तसा प्रयत्न केला आहे .
अनिल जोशी
खुप छान
ReplyDelete