माझ्या काही (ब्लॉग) पाक कृती

Image result for images of chefImage result for images of chefImage result for images of chef

काल रात्री माझ्या स्वप्नात आमच्या कलासागर मध्ये लिहिणारा बहिर्जी आला.छान बोलत असताना म्हणाला, रोज तुझे ब्लॉग वाचतो. त्यावर काही लिहायचा विचार आहे. हे ऐकले आणि मला दरदरून घाम फुटला आणि मी जागा झालो. आता जर बहिर्जीने माझ्या ब्लॉग वर काही लिहिले तर तो नक्की आपली टोपी उडवणार कारण इतकी वर्षे त्याने अनेकांच्या टोप्या उडवल्या आहेत. आता त्याच्या मनातला हा विचार पक्का होवून त्याने आपली टोपी उडवण्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच आपल्या लेखांची थोडी टवाळी करून आपली खिलाडू वृत्ती दाखवावी व आपल्या वाचकांना पण त्याचा आनंद द्यावा असे वाटले.
(यासाठी बहिर्जी याने मित्र अविनाश हळबे यांची माफी मागून पुढील लेखन करण्याचे धाडस करत आहे.) 

आता या साठी आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक वाटले. आता रोज लिहिणारी जमात म्हणजे दैनिकांचे संपादक. ते रोज न चुकता लिहित असतात भले तो त्यांच्या व्यवसायाचा भाग असेल. पण त्यांची भूमिका ही पुलंच्या बिगरी ते मेट्रिक या लेखातील तमाम मास्तर लोकांसाठी असते. अखंड उपदेशाचे डोस पाजायचे, नाहीतर कुणाला तरी झोडपून काढायचे. हे मास्तर १५ ऑगस्ट अगर २६ जानेवारी अशा उत्सवांच्या वेळी अपवाद म्हणून विध्यार्थ्यांचे कौतुक करायचे तसे कधी तरी कुणाचे तरी कौतुक करतात पण तितकेच. आपल्यला ही भूमिका घेणे योग्य नाही या निर्णयापर्यंत आल्यावर पुन्हा माझ्या भूमिकेचा शोध सुरु केला. कधी क्वचित लिहिणारा मी फेसबुक सारखे साधन हाताशी आल्यावर बर्यापैकी नियमाने लिहू लागलो. आश्चर्य म्हणजे ते लोक वाचू लागले आणि यांना ते आवडू लागले. हा हा म्हणता फेसबुक मित्रांची संख्या दोन हजारांवर पोचली. माझ्या पोस्ट आवडू लागल्यावर मला त्यात चौकात एखादी भज्यांची, वडापावची किंवा भेळेची गाडी लावल्याचा फील येवू लागला. नित्य नियमाने लोकांना जिभेचे चोचले पुरवणारा एक तसा आचारीच. प्रतिष्ठित नाव म्हणजे बल्लवाचार्य. रोज झरा कधी घेवून मागणी असेल त्या प्रमाणे लाडवांचा, जिलब्यांचा, वड्यांचा घाणा घालणारा. पण हे लिखाण पटकन शोधून मिळत नाही त्यामुळे मग एकदा फेसबुकवर वेळोवेळी पडलेल्या कवितांच्या कारंज्यांच्या छापील प्रती काढून घेतल्या.
मग जेव्हा मला ब्लॉग चा शोध लागला व मी डिसेंबर २५ पासून नित्यनियमाने ब्लॉग लिहू लागलो तेव्हा माझी वडापावची, भाज्यांची किंवा भेळेची गाडी नाहीशी झाली. सुमारे १२५च्या वर लेख लिहीन झाल्यावर मी स्वत:च्या मालकीच्या एका मोठ्या हॉटेलचा शेफ झाल्याचा फील आला. अर्थात हे स्टार हॉटेल नाही . करारान तिथे फक्त बेचव पदार्थ आणि ते सुद्धा महाग मिळतात.
त्यामुळे माझ्या ब्लॉग च्या काही पाक कृतींची कृती देत आहे.
१) शास्त्रीय संगीत भाताचे प्रकार. 
यात एखाद्या रागाचे त्याच्या त्याच्या प्रकृती प्रमाणे तांदूळ घ्यायचे. आता यमनचे तांदूळ घेतले तर त्याचा छान उन उन वरण भात, वर तूप, लिंबाची फोड असा यमनभात होतो. याने मन आणि पोट दोन्ही तृप्त होते.
जर चन्द्रकौंस किंवा बागेश्री तांदूळ घेतले तर त्यावर घट्ट आधमुरे दही, सोबत तळलेली मिरची व चवीपुरते मीठ असा चान्द्रकौंस-बागेश्री बुत्ती भात होतो. हा पोटाला आणि मनाला थंडावा देणारा असतो.
जर दुल्हा राग बसंत तांदूळ घेतले तर त्याची साजूक तुपात घोळलेली व तब्बेतीत शिजवलेली बिर्याणी होते. सोबत बहार चे पनीर वा चीजचे तुकडे असतील तर तबियत खुश व्हायलाच पाहिजे .आणि दरबारीचे तांदूळ घेतले तर त्याचा पुलाव होतो. \
ललत किंवा भटीयारचे तांदूळ ताक भाताचा आनंद देतात तर भैरवी म्हणजे फोडणीचा भात.
२) सुगम संगीत तोंडी लावणी.
सध्या भाताला तोंडी लावणी म्हणजे व्यंजने लागतात. त्यामुळे जुने हिंदी सिने संगीत म्हणजे साधे गोडे वरण तर नंतरच्या काळात १९७० च्या दशकापर्यंतचे सिने संगीत म्हणजे गरम मसाल्याची आमटी, चवदार. यापुढचे सिनेसंगीत हे डाल तडका. मराठी लावण्या म्हणजे भरली वांगी तर भावगीते म्हणजे साधी कोणतीही भाजी. भक्तिगीते-भजने म्हणजे कोशिंबीर तर भारुड-गवळणी म्हणजे चटणी लोणचे.
३) आठवणींच्या साईड डिश.
आठवणी या आजूबाजूला असतात म्हणून साईड डिश. त्या मेन कोर्स होऊ शकत नाहीत. त्यामुळे एखादी आठवण किंवा आठवणींची मालिका नेहेमीच्या मसाल्यात घोळून याची साईड डिश बनते व जेवणात (की जीवनात) लज्जत आणते.
४) राजकीय मिसळ 
राजकीय लेख हे मिसळी सारखे चवदार आणि खाताना हमखास ठसका लावणारे असतात. पण यांचा चाहता खवय्या वर्ग संख्येने खूप आहे. कोणत्याही घटनेच्या फरसाणवर आधीच्या काही संदर्भांचा तर्रीबाज रस्सा घालून ही मिसळ केली जाते . सोबत मग काही भाकितांचे ब्रेडचे तुकडे असले की मेनू संपन्न.
) आमच्या कडील आणखी एक खास पदार्थ म्हणजे ड्राय फ्रुट मोदक.
हे मनाच्या  खास कप्प्यात साठवलेल्या आठवणींच्या ड्राय फ्रुट पासून बनवलेले असतात व त्याची कृती ही स्पेशल आमचीच असल्याने खवय्यांनी त्यांचा फक्त आस्वाद घ्यायचा .
(उदा. मंगेश पाडगावकर, पंडित जसराज, शांताबाई शेळके, दादुमिया ,द मा मिरासदार 
पुरुषोत्तम दारव्हेकर ,भाऊसाहेब पाटणकर, अशा सारख्या दिग्गजांच्या सहवासातील आठवणी)

हे वानगीदाखल दिलेले काही पदार्थ.  यासाठी वापरले जाणारे मसाले हे खास स्वानुभवातून बनवलेले व भाषेतील ओलावा व गोडवा हे ईश्वरदत्त वैशिष्ठ्य. सोबत थोडे चिंतन, तत्वज्ञान, मनकवडेपणा हे पण आवश्यक .
त्यामुळे हे शेफ पद आनंद देणारे आहे व रसिक खावय्यांमुळे टिकून राहील असा विश्वास वाटतो.

Comments

  1. भट्टी मस्त जमलीय अनिल.😁

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती