तपस’ च्या मुली



Inside View - Tapas Elder Care Centre Photos, Baner, pune - Dementia Care Centers
Inside View - Tapas Elder Care Centre Photos, Baner, pune - Dementia Care Centers
तपस ही एक संस्था आहे. याला वृद्ध निवास म्हणता येईल. पुण्याच्या पाषाण येथे प्रसिद्ध शिव मंदिराजवळच्या एका तीन माजली बंगल्यात हा निवास आहे. इथे अनेक ज्येष्ठ नागरिक , यात विकलांग सुद्धा आहेत राहत असतात. काही अपरिहार्य कारणांनी माझ्या विकलांग सासूबाईना कुठे ठेवता येईल याचा शोध घेत असताना आम्ही या संस्थेत पोचलो. आम्ही गेलो तेव्हा तेथील निवासी हे विश्रांती साठी आपापल्या खोल्यांमध्ये होते. आम्हाला संस्थेविषयी माहिती एक तरुण मुलगी देत होती. ती येथील नर्स वाटत नव्हती पण अतिशय सफाईदार पणे ती आम्हाला संस्थेची माहिती देत होती. तिच्या माहिती देण्याच्या पद्धतीने आम्ही आश्वस्त झालो होतो. मग सहज आम्ही तिला तिच्याबद्दल विचारले तेव्हा फापट पसारा न लावता फक्त व्यावसायिक माहिती दिली. ती मराठवाड्यातील होती. ती म्हणाली तिचा संबंध राष्ट्र सेवा दलाशी आला त्यामुळे तिला समाजकार्याची आवड निर्माण झाली. पुढे तिने समाज कल्याण विषयात पदवी (एम एस डब्ल्यू ) घेतली व या संस्थेत काम करायला आली व ज्येष्ठांची सेवा करण्यात तिला समाधान मिळते.
समाज सेवा किंवा समाज कल्याण या विषयाची व्याप्ती खूप आहे. आणि याची जाणीव मला उंबरठा हा चित्रपट पाहताना झाली होती. या चित्रपटाची नायिका जेव्हा एका संस्थेत निवासी काम स्वीकारते तेव्हा तिची सासू त्या बद्दल नापसंती व्यक्त करते. तिच्या मते घर सांभाळून करता येईल असे समाज कार्य करावे.
नंतर सासूबाईना तिथे घेवून गेलो तेव्हा दुपारची वेळ होती. तेव्हा तेथील सर्व सदस्यांना खाली आणले होते. सगळे एका मोठ्या टेबल वर बसले होते. ज्यांना हाताने जेवता येत नव्हते त्यांना या मुली भरवत होत्या. काहीना खूप वेळ लागत होता , काही कुरकुर करत होते पण न कंटाळता त्या आपले कम करत होत्या. त्यांच्या कम करण्याच्या पद्धतीमध्ये कर्तव्य जाणवत नव्हते तर आस्था जाणवत होती.
तिथे काही चित्रे लावली होती. त्याबद्दल विचारले तेव्हा सांगण्यात आले सकाळी सगळ्यांना खाली आणले जाते व त्यांना जे जमेल ते करायला प्रोत्साहन दिले जाते. कागदाच्यावस्तू करणे, चित्रे, अंताक्षरी अशा अनेक प्रकारे त्यांना त्यांच्या एकाकीपणातून , आजाराच्या नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. एका सदस्याला साधारणपणे दोन तास जेवायला लागले तरी त्या मुलीने जेवण झाल्यावर त्यांना हाताला धरून वर खोलीत नेले. या संस्थेशी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी जोडलेले आहेत. त्याचा ही हा परिणाम असणार. शिवाय प्राजक्ता वाढावकर या संस्था चालिका आहेत त्यांना समाजकार्याची मोठी पार्श्वभूमी आहे असे समजले. त्यांची भेट काही झाली नाही.
तिथून येतांना आमच्या मनात एक आशा निर्माण झाली की कदाचित सासूबाई बर्या होतील. पण त्यांचा या संस्थेशी ऋणानुबंध चारच दिवसांचा ठरला. दोनच दिवसात त्यांची शुद्ध हरपली व ४ थ्या दिवशी त्यांचे निधन झाले. आम्हाला समजताच भल्या सकाळी आम्ही तिथे पोचलो. तपस अजून जागे व्हायचे होते. हळू हळू एकेक जण खाली येत होत्या. तिथे काम करणाऱ्या मुली खाली येताच आम्हाला तिथे पाहून त्यांना परिस्थितीची जाणीव झाली. काही औपचारिकता पूर्ण होण्यासाठी आम्हाला तिथे थांबणे भाग होते. वातावरणात एक विचित्र तणाव होता. पण या ही परिस्थितीत या मुलींनी पटापट आवरायला सुरुवात केली . हळू हळू एक एक सदस्य खाली येत होता. त्यांच्या अल्पोपहाराची वेळ झाली होती.
तेवढ्यात आम्ही वाट पाहत होतो ती गाडी आली आणि आम्ही निघालो. निघताना जेव्हा आम्ही त्या मुलीना सांगितले तुम्ही खरच खूप चांगले कम करत आहात तेव्हा त्या म्हणाल्या – वाईट एवढाच वाटत की आम्हाला आजींची काही दिवस तरी सेवा करायला मिळायला हवी होती.
मनातल्या मनात आम्ही त्या मुलींना सलाम केला. ना मैत्रिणी, ना हॉटेलिंग,पार्ट्या, सिनेमे, पार्लर , पिकनिक, या सगळ्या च्या पलीकडे आपल्या कामावर प्रेम करणाऱ्या या मुलींनी मनात घर केले. कदाचित स्वत:च्या संसारात रमल्यावर त्या एवढा वेळ देवू शकणार नाहीत पण त्या नवीन मुलींसाठी एक आदर्श निर्माण करतील. जेणेकरून अशा मुली काही वर्षे तरी पूर्णांशाने या कार्यात राहतील.

अनिल जोशी
०४.०५.२०२०

कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी. 

Comments

  1. फारच चांगलं कार्य करीत आहेत... त्यांना सलामच करायला हवा...
    ... प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती