काळ तर मोठा कठीण आला

Bhatkantiछायाचित्रण पाक्षिक आव्हान ३४ ...

आपल्यातील सकारात्मक वृत्ती जागृत ठेवण्यासाठी सध्या खूप कष्ट पडत आहेत. आजूबाजूच्या सगळ्या बातम्या या फक्त महितीपुरत्या घ्यायच्या ठरवल्या तरी जे काही अजाणतेपणे कानावर पडते ते भयानक आहे. सुरुवातीला खर सांगायचं तर या संकटाची भयानकता एवढी जाणवली नव्हती. घरून काम करायला सांगितले तेव्हा पहिली प्रतिक्रिया ही रोजचा जाण्या येण्याचा वेळ व त्रास वाचला एवढीच होती.
त्यानंतर परिस्थिती अधिक बिघडतच गेली. सर्वत्र संचारावर बंधने आली आणि हे परिस्थितीचे चक्र ठप्प झाल्याचा अनुभव येवू लागला. पुणेकरांच्या सकाळच्या प्रभात फेरीवर गदा आली आणि घरोघरी जाणवणारी महत्वाची घटना म्हणजे घरात कामाला येणाऱ्या मोलकरणी बंद झाल्या. त्यामुळे घरून काम करणाऱ्या गृहिणींना कार्यालयीन कामाबरोबर घरातील वाढीव काम अंगावर पडले. ज्यांची लहान मुले पाळणाघरात अगर अन्यत्र ठेवली जात असतील त्यांना सांभाळणे पण आले. आज अनेक ज्येष्ठ नागरिक घरातील अनेक कामांना माणसे ठेवतात. त्यामुळे सफाई, स्वयंपाक, सगळी कामे वयस्कर स्त्रियांना करावी लागत आहेत. शिवाय अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले आज परदेशात आहेत आणि त्यांची काळजी करण्यापलीकडे इथून काही करता येत नाहीत. अनेक ठरलेली लग्ने अनिश्चिततेच्या भोवर्यात आहेत. कुणी आप्त आजारी असतील तर त्यांच्या साठी कुणाला काही करता येत नाही.
सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने तपासण्या करायाला जाणे अशक्य झाले आहे. हे सगळे कधीतरी संपेल ही अशा पण हळू हळू अंधुक होऊ लागली आहे. कारण लॉकडाऊन च्या तारखा कोर्टातील तारखांप्रमाणे पुढे पुढे जात आहेत. आपण जेव्हा ट्रेकिंग ला जातो तेव्हा पहिल्यांदा एक उंचावरील ठिकाण खालून दिसते , तिथपर्यंत जायचे या उमेदीने आपण डोंगर चढायला लागतो पण जस जसे वर जावू लागत्तो तेव्हा लक्षात येत खालून दिसत असलेलं ठिकाण अजून वर आहे. तसं काहीसं होतंय. लॉक डाऊन संपायची तारीख जवळ आली की लक्षात येत की संकटाची तीव्रता वाढतेच आहे. मग लॉक डाऊन ची मुदत वाढतेच आहे.
व्यक्तिगत जीवनात या अडचणी येत आहेत तर पुढील आर्थिक संकट फारच गंभीर असणार आहे ज्याच्या कल्पनेनेच धडकी भरते आहे.
या सगळ्या परिस्थितीत स्वातंत्र्यपूर्व काळात असा लेख लिहिला गेला होता - काळ तर मोठा कठीण आला.
आज जरी सर्वत्र अंधकार पसरलेला दिसत असला तरी अशा रात्रीच्या अंधाराला सकाळच्या सूर्योदयाची आशा असते. आणि याच आशेवर आपण या संकटाला तोंड देत असतो.
पूरबसे सुरज उगा , ढला अंधियारा 
ही पंक्ती ऐकायला आपण उत्सुक आहोत.

अनिल जोशी
०६.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी.

Comments

  1. नक्कीच हा काळ अवघड असला तरी येणारा काळ प्रत्येकासाठी नविन संधी घेऊनच येणार आहे .
    योगेश भगरे .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती