विधान परिषदेतील ९ वी जागा
महाराष्ट्रात नवीन आघाडी सरकारला सत्ता स्थापन करून आता ६ महिने होतील. राजकारणात हा काळ राजकीय मधुचंद्राचा समजला जातो त्यामुळे फार राजकीय संघर्ष केला जात नाही व नवीन सरकारला स्थिर व्हायला वेळ दिला जातो .त्यामुळे जरी २०१२ पासून मी अनेक राजकीय लेख लिहिले असले , किंबहुना गेले दीड वर्ष उत्तम कथा मध्ये बहुतेक लेख हे राजकिय लेख होते. तरीपण माझा ब्लॉग सुरु झाल्यानंतर मात्र सुमारे १४० लेखांपैकी जेमतेम ४-५ लेख राजकीय होते. पण हा मधुचंद्र एका मोठ्या राजकीय सोहळ्याने संपुष्टात येणार आहे. नवीन मुख्यमंत्री विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून येतील आणि हा मधुचंद्र संपुष्टात येईल.
कसा असणार आहे हा सोहळा? या निवडणुकीला लॉक डाऊन मुळे स्थगिती आली होती व त्या मुळे मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता. पण ही निवडणूक मर्यादित मतदार करतात -महाराष्ट्र विधानसभेतील २८८ आमदार- त्यामुळे लॉक डाऊन वर फारसा विपरीत परिणाम होणार नव्हता. शिवाय जर सर्व संमतीने फक्त ९ उमेदवारच रिंगणात उभे राहिले तर मतदान पण होत नाही. किंबहुना यासाठीच निवडणूक आयोगाने या निवडणुकीला परवानगी दिली. इथे एक शक्यता आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांशी संपर्क साधला होता.त्यामुळे हे शक्य आहे की पंतप्रधानानी ठाकरे यांना ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सुचवले असण्याची शक्यता आहे. आता या निवडणुकीत २८८ आमदार ९ प्रतिनिधी निवडतील. यासाठी जो उमेदवार ३२ मते मिळवेल तो पहिल्या फेरीत निवडून येईल. आजचे पक्षबळ असे आहे की आघाडीकडे १६९ आमदार आहेत म्हणजे उरलेले ११९ आमदार हे विरोधी भाजप कडे आहेत. यात पण १६९ मधील तीन पक्षांचे आमदार ५६+५२+४४=१५४ आमदार आहेत म्हणजे १५ अन्य आमदारांचा आघाडीला पाठींबा आहे. ते ११९ पैकी भाजपचे १०५ आमदार आहेत म्हणजे त्यांना १४ अन्य आमदारांचा पाठींबा आहे. हे अशासाठी लिहिले आहे की एकूण १९+१४=३३ आमदारांवर पक्षीय अध्यादेशाचा (VIP) चा परिणाम होणार नाही. ही मते तरती म्हणजे (floating) असतील.
ही निवडणूक जाहीर झाली आणि भाऊ तोरसेकर यांनी यामध्ये मोठा डाव असल्याचे मत व्यक्त केले होते तेव्हा मला फारसे पटले नव्हते . पण परवा कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले की आघाडी ६ वी जागा लढवणार. तेव्हा मात्र ही निवडणूक दिसते तितकी सरळ नाही हे लक्षात आले. त्यासाठी जरा थोडे आकडे पाहूया.
आता ही निवडणूक जर बिनविरोध करायची असेल ज्यात मुख्यमंत्र्यांना निवडून यायचे आहे तर आघाडी ला आपल्या हक्काच्या मतांच्या आधारावर ५ उमेदवार (१५५) निवडून आणता येतील व एक अतिरिक्त जागा भाजपला आंदण द्यावी लागेल. सामान्य स्थितीत हे शक्य होते. जरी आघाडीचे नेते असले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तरी त्यांना २ अन्य तुल्यबळ पक्षांना सांभाळायचे आहे. आणि या समझोत्यात सेना २, राष्ट्रवादी २ व कॉंग्रेस १ असे वाटप होत असल्याची कुणकुण लागल्यावर हे थोरात यांचे हे मत प्रदर्शन बरेच काही सांगून जाते. पाण्यात एखादी लाट उसळी मारते ती म्हणजे आतील अनेक प्रवाहांचा परिणाम असते. ती एक लाट बरेच अंतर्प्रवाह सुचवून जात असते.
आज शिवसेना मुख्यमंत्रीपद मिळाल्याने समाधानी आहे तर राष्ट्रवादीने अनेक महत्वाची खाती व उप मुख्यमंत्रीपद घेवून सत्तेवर कब्जा मिळवला आहे. त्या मानाने कॉंग्रेस तिय्यम स्थानावर आहे व हे दोन खेळाडू कॉंग्रेस ला लिंबू टिंबू समजत आहेत. अर्थात हे न समजण्याइतके कॉंग्रेस नेतृत्व दुधखुळे नाही. ते योग्य संधीची वाट पाहत होते. त्यांनी ती संधी साधली. आता मुख्यमंत्र्यांनी ठरवायचे की आपल्या कोट्यातील एक जागा कॉंग्रेसला देवून निवडणूक बिनविरोध करायची का कॉंग्रेस ला दुसरा उमेदवार उभा करायची परवानगी देवून आघाडीचे ६ उमेदवार रिंगणात उतरवायचे. तसे केल्यास ६ उमेदवार निवडून आणायची जबाबदारी नेते म्हणून त्यांची असेल आणि एखादा उमेदवार जरी पराभूत झाला तरी आघाडीत बिघाडी आहे असा संदेश जातो आणि त्यातून जर कॉंग्रेस चा उमेदवार पराभूत झाला तर आघाडीला धोका निर्माण होऊ शकतो कारण भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे म्हणून कॉंग्रेस आघाडीत सामील झाली असली तरी हे सरकार चालवण्यात कॉंग्रेसला फारसे स्वारस्य नाही. अशा सरकारांमध्ये कॉंग्रेस फार काळ टिकत नाही हा इतिहास आहे.
आता भाजपची रणनीती काय असेल ते पाहूया. भाजप कडे ३ उमेदवार निवडून आणल्यानंतर १४ मते अतिरिक्त आहेत. शिवाय आघाडीतील जी तरती १९ मते आहेत त्याकडे पण भाजप धुरिणांचे लक्ष असणार. आता एक आमदार जास्तीचा निवडून आणून तसे काही साध्य होणार नसले तरी आघाडीत बिघाडी आहे असा संदेश जर राजकीय मधुचंद्र संपता संपता देता आला तर भाजप ती संधी घेईल असे दिसते. आणि भाजपने ४था उमेदवार उभा केला तर एकूण १० उमेदवार रिंगणात येतील.अशा वेळी प्रयेक आमदार मतदाराला कुणाला मत द्यायचे ते सांगितले जाते .
आता १० उमेदवारांमध्ये जेव्हा मतदान होईल तेव्हा पक्षादेशा प्रमाणे मतदान झाले तर ८ उमेदवार प्रत्येकी ३२ मते मिळवून पहिल्या फेरीत निवडणूक जिंकतील. आणि आघाडीच्या ६ व्या उमेदवाराला १९ तर भाजपच्या ४थ्या उमेदवाराला १४ मते मिळालेली असतील. मग सुरु होईल दुसर्या पसंतीच्या मतांची मोजणी . इथे जर भाजपच्या ४थ्या उमेदवाराला १०५ मते मिळतील व आघाडीच्या ६व्या उमेदवाराला १५२ दुसर्या पसंतीची मते मिळून तो विजयी होऊ शकतो. पण भाजपचा ४ था उमेदवार हा तगडा उमेदवार असेल (उदा. संजय काकडे) आणि असे अनेक इच्छुक उमेदवार आहेत. अर्थात कॉंग्रेस पण या खेळात माहीर असल्याने हे आव्हान सेनेपुढे असणार आहे.
त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी विधान परिषदेतील जागेचा त्याग करायचा की फडणवीस यांना मैत्रीची गळ घालून त्यांना ४था उमेदवार उभा करण्यापासून रोखायचे. कारण मुख्यमंत्रीपद तर मिळाले . पण नेतृत्वाचा कस अशावेळीच लागत असतो. त्यामुळे विधान परिषदेतील ९ वी जागा भविष्यातले काही संकेत देवून जाणार हे निश्चित.
अनिल जोशी
०८.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
मला वाटते विद्यमान मुख्यमंत्र्यांचा अनुभव कमी पडत आहे.त्या मानाने शरद पवार, सोनिया गांधी व मोदी, शहा व फडणविस हे सर्व राजकारणात मुरलेले नेते आहेत.नववा आमदार कोणीही होवो, ईथून पुढे हा तीन तिगाडा काम बिघाडा सुरू हेणार आहे.मधुचंद्र संपता संपता हे सरकार गडगडणार.औट घटकेचे राज्य मिळवून उद्धट खान यांनी मिळवले कमी व गमावले खूप.हिंदू मते घटली पण मुस्लीम मते अजिबात वाढली नाहीत
ReplyDelete