वाढ दिवस शुभेच्छा


Image result for images of birthday greetings
आज एका मित्र व नातेवाईक अशा सुहृदाचा वाढदिवस त्या मुळे फोनवर संभाषण झाले. तशा शुभेच्छा हल्ली सामाज मध्यामांवरून तत्परतेने दिल्या, पाठवल्या जातात. पण प्रत्यक्ष बोलणे बरेच काही देवून जाते. आज शुभेच्छांचा स्वीकार करताना त्याने जे सांगितले ते विचारांना प्रवृत्त करणारे होते. आपण अशा परिस्थितीत इतके जगलो आणि जगतो आहोत हे काय कमी आहे?
कुणीतरी म्हटले आहे की रोज सकाळी उठल्यानंतर आपण खरच त्या परमेश्वराचे आजचा सुंदर दिवस दाखवला म्हणून आभार मानयला हवेत. आपण कोण्या आजाराची शिकार झालो नाही, आपण कोणत्या अपघातात सापडलो नाही, कोण्या चोर-लुटेर्याने आपले घर फोडले नाही. आणि आपण आपल्या घरात सुरक्षित आहोत. दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत नाही.
वयोपरत्वे शरीराचे काही त्रास आहेत पण त्यावर काही उपचार करून हा जीवन प्रवाह आपण वाहता ठेवत आहोत. काही चिंता, काळज्या अवश्य आहेत पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्याकडे आहे. आपली बुद्धी शाबूत आहे, विवेक जागृत आहे. सारासार विचार करण्याची क्षमता आहे.
नेहेमी असे सांगितले जाते जेव्हा आपल्याला आपल्याला काही दु:ख आहे तेव्हा आपण आपल्यापेक्षा जे जास्त दु:खी आहेत त्यांच्याकडे पहावे म्हणजे आपल्याला आपण नशीबवान आहोत हे जाणवते.
याचा अर्थ नशिबावर हवाला आणि प्रयत्नांना मूठमाती असा नक्कीच नाही. महत्वाकांक्षा , ईर्षा, स्पर्धा, उद्दिष्ट गाठण्याची धडपड ही पण जीवनाची  अंगे आहेत .
म्हणजे जर एखादा तरुण २५व्या वर्षी जर असा नशिबावर हवाला ठेवून हातावर हात ठेवून बसत असेल किंवा अपयशाने खचून नैराश्या च्या गर्तेत जात असेल तर ते निश्चितच चूक असेल. इथे प्रयत्न, कष्ट, हिम्मत याला पर्यायच नाही. पण आयुष्याच्या संध्याकाळी ना मिळालेल्या गोष्टींच्या विचाराने झुरत बसणे व स्वत:ला त्रास करून घेणे पण बरोबर वाटत नाही.
सुख आणि आनंद या दोन्ही गोष्टी नीट समजून घेणे आवश्यक आहे. सुख हे अधिक भौतीक्तेकडे झुकते तर आनंद ही मनाची अवस्था आहे. त्यामुळे यातला सूक्ष्म फरक समजून घेतला पाहिजे.
त्यामुळे आपल्याला काही आजार असेल , काही दु:खे असतील ती बाजूला ठेवून त्यावर आपला आनंद शोधून आला दिवस आनंदात कसा जाईल याचा विचार करणे हा आजच्या वाढ दिवस शुभेच्छांचा अर्थ जाणवला.तो मला सगळ्यांपर्यंत पोचवावा असे मनापासून वाटले म्हणून आज हे थोडे मोकळे ढाकळे लिहिले आहे.

अनिल जोशी 
०९.०५.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी. 

Comments

  1. आबा तुझे प्रत्येक विषयातले नाविन्य व विविधता, तसेच मोजक्या शब्दात मांडणी ही निश्चित दाद देण्यासारखी गोष्ट आहे. तुझे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन! असाच लिहीत रहा " आबाचा ढोल "!

    ReplyDelete
  2. अप्रतिम..अगदी मनातले लिहिले आहेत.

    धनश्री जोशी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती