अपुले बोलणे आपल्याशी

Questions to Help You Comprehend the Philosophy of MindCreativity isn't a Skill, it is a State of Mind. - Steve Glaveski ...

गेला आठवडा सुशांत राजपूत या अभिनेत्याची आत्महत्या हा विषय चर्चेत होता. एका आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्याची आत्महत्या चुटपूट लावून गेली व त्या निमित्ताने या विषयाचे अनेक पैलू बाहेर चर्चेत आले. त्या पैकी कोणतीही व्यक्ती असा टोकाचा निर्णय घेण्याप्रत कशी येते हे समजत नाही कारण मानवी मनाचे मनोव्यापार अतिशय गुंतागुंतीचे असतात. कुणी एकटे पडल्यास त्याला सावरणे आवश्यक असते पण त्या साठी हे एकटेपण समजणारे दुसरे कुणी जवळचे असणे आवश्यक असते. प्रत्येकाला आपले डोके टेकायला कुणाचा तरी खांदा आवश्यक असतो. पण तो तसा मिळतोच असे नाही आणि तसे न झाल्यास एकाकीपण वाढत जाते.
मानस शास्त्र असे सांगते की असे एकाकीपण वाढत गेले की डिप्रेशन येते. आणि या मनातील या वादळाला जर योग्य वळण नाही मिळाले तर ते डिप्रेशन वाढत जाते. आणि असे वाढलेले डिप्रेशन अखेर त्या व्यक्तीला आत्महत्येच्या टोकावर घेवून जाते.
यशाच्या शिखरावर असताना कुणी जवळचे नसणे हे क्लेशदायी असतेच आणि ते एकाकीपण असह्य होते. पण हे एकाकीपण कुणालाच चुकलेले नाही. पण त्यावर प्रत्येक जण काही ना काही पर्याय काढत असतो. माणसाने या साठीच कुटुंब, समाज या व्यवस्था निर्माण केल्या असाव्यात. त्यामुळे आयुष्यात निर्माण होणारी पोकळी भरून निघू शकते.
मित्रांच्या सोबत रंगलेली मैफल स्फूर्तीदायी असतेच , त्यात अनुभव, आनंद यांची सहज देवाण घेवाण होत असते , मने मोकळी होतात. पण अशा मैफली सतत घडत नाहीत. कुणी जिवलग भेटल्यावर त्याच्याशी बोलण्यात वेळ कसा निघून गेला हे समजत पण नाही पण त्या साठी भेट होणे आवश्यक असते. म्हणजे कुणीतरी दुसरे असणे क्रमप्राप्त असते. पण दर वेळी असे कोण भेटणार?
संतांनी असे सांगितले आहे की प्रत्येक जण एकटा येतो आणि एकटाच जातो. हे वास्तव आहे पण या येण्या जाण्याच्या मध्ये जो आयुष्याचा पट आहे त्यात ती व्यक्ती रंग भरते.. पण हे सगळे आयुष्य जगताना कधी ना कधी एकाकीपण डोके वर काढतेच.
हे एकाकी पण वेगवेगळ्या रुपात आपले  डोके वर काढते. आज अनेक वयस्कर जोडपी मुले अन्य ठिकाणी असल्याने एकाकी जीवन जगात आहेत. मग त्यांचे फोन, कधीतरी घडणाऱ्या भेटी या शिदोरीवर ते आपल्या एकाकीपणावर मात करतात. यात जोडीदार असेल तर ठीक जर तो साथ सोडून गेला असेल तर त्या एकाकीपणाची कल्पनाच केलेली बरी. यात जर त्या व्यक्तीला आपले असे काही काम असेल तर एकाकी पणाची तीव्रता कमी होते पण वय वाढल्यावर गात्रे थकली की एकाकी पण असह्य होते. जरी कुटुंबातील सगळे सोबत असले तरी संवाद होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोच असे नाही मग एकाकीपण उरतेच.
हे एकाकीपण वयस्कर लोकांच्या आयुष्यातच असते असे नाही तर ते कोणत्याही वयाच्या वळणावर समोर येते. कामाच्या तणावामुळे किंवा पती पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतील तर परस्परांना पुरेसा वेळ देवू शकत नाहीत. आणि याचा परिणाम म्हणजे वाढते एकाकीपण, डिप्रेशन.
आता यावर उपाय काय असा प्रश्न साहजिकच मनात येतो. अर्थात आहे ही सभोवतालची परिस्थिती बदलणे शक्य नसते पण यातून मार्ग आपल्यालाच काढावा लागतो. याला साध्या भाषेत आपले मन रमवणे म्हणतात. आणि हे सोपे नसते. कारण मनोव्यापार हे फार गुंतागुंतीचे असतात.
आपल्या मनात ताण तणाव केव्हा निर्माण होतात? तर मनातील भाव भावना अव्यक्त राहून मनात साठून राहतात तेव्हा. या भावना सर्व प्रकारच्या असतात यात सगळे विकार असतात. यात आनंद किंवा सुखद भावना असतील व त्या मनातच राहिल्या तरी त्या फार त्रास देत नाहीत आणि त्या कुणा पाशी पण व्यक्त करता येतात. पण राग. लोभ, मत्सर हे पटकन व्यक्त पण करता येत नाहीत आणि त्याचा त्रास जास्त होतो. आपल्याला कुणाचा राग आला तरी तो व्यक्त करता येतोच असे नाही. शिवाय आपली मते व त्यामागची भावना समोरील व्यक्तीने समजून घेतली तर त्याचा उपयोग अन्यथा नुसता मनस्ताप.
यासाठी मी लहानपणी एक युक्ती करत असे. आपल्याला भारी असलेल्या मित्राचा बर्याच वेळा राग आला तरी त्याच्याशी दोन हात करण्याची क्षमता नसल्याने मनात कुढत बसण्य ऐवजी आपण मनातल्या मनात त्याची त्याच्या पालकांकडे किवा शिक्षकांकडे तक्रार करायची आणि मग त्याला होणार्या काल्पनिक शिक्षेचा काल्पनिक आनंद घ्यायचा. आपले मन मोकळे होते जरी परिस्थिती तशीच असली तरी. मग तोच प्रयोग अन्य ठिकाणी पण करून पाहता येईल. आपल्या बॉस ची तक्रार त्याच्या बॉस कडे, आपल्या प्रतिस्पर्धी सहकार्याची तक्रार बॉस कडे, आणि ज्या व्यक्तीकडे तक्रार करायची ती मृत असली तरी बिघडत नाही, मन मोकळे झाले  की झाले.
हा थोडा गमतीचा भाग झाला पण याचा मतितार्थ आपला संवाद आपल्याच मनाशी करायचा. आपण आपल्याशीच बोलायचे व मोकळे व्हायचे. सगळ्या भूमिका आपणच करायच्या. कारण आपल्याला दु:ख देणारे आपणच असतो आणि आनंद देणारे पण आपणच. हा आपला आपल्याला शोध लागला की आपण आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकतो. एखादे चांगले पुस्तक आनंद देते पण त्यावेळी ते पुस्तक वाचायची आपली इच्छा असायला हवी. संगीताचे पण तसेच आहे. काही वेळा चांगले संगीत पण नकोसे होते. चार लोकांच्यात पण आपण एकाकी पडू शकतो . हे असे घडत असते. म्हणून जर आपण आपल्याशी बोलू लागलो की इतर काय बोलतात ते आपल्यापर्यंत पोहोचू शकते. आणि एकाकी पणावर काही प्रमाणात मात करता येते. काय हरकत आहे असा प्रयोग करून बघायला?

अनिल जोशी.
२०.०६.२०२०
कृपया आपली प्रतिकृया आपल्या नावासह द्यावी.


Comments

  1. व्यक्त होणे महत्वाचे

    ReplyDelete
  2. Ganesh Jadhav
    छान Solution आहे....काल्पनिक निचरा करायचा भावनांचा.... स्वसंवाद

    ReplyDelete
  3. छान मनोविश्लेषण.

    ReplyDelete

Post a Comment