मु पो टिळकनगर, डोंबिवली -ती २ वर्षे



DI/Dombivli Railway Station Map/Atlas CR/Central Zone - Railway ...
Kalyan-Dombivli Will Not Run For Six Hours - कल्याण ...Image result for डोंबिवली स्टेशन फोटो(शाळेचे फोटो सौजन्य पुुुष्पा जपे संदर्भ मााझी  शाळा व्य.ल. जपे)
पुण्याहून जाताना कल्याण सुटले की गाडी वेग घ्यायची आणि बाजूचे ठाकुर्ली स्टेशन लक्षात यायचे नाही पण डोंबिवली स्टेशन च्या ४ क्रमांकाच्या फलाटावरील धुरळा उडवत गाडी सुसाट जायची. अशा या डोंबिवलीत चक्क दोन वर्षे राहण्याचा योग आला. तसा दोन वर्षांचा काळ म्हणजे फार नाही पण त्या दोन वर्षात जे जे काही मिळाले ते इतके भरघोस होते की ती शिदोरी आज जवळ जवळ ५० वर्षे उलटून गेली तरी पुरून उरली आहे. माझा धाकटा मामा- विजुमामा याने बिऱ्हाड करण्यासाठी डोंबिवलीत जागा घेतली. त्या नंतर एक चुलत मामा -ज्याचे नाते सक्ख्या नात्याप्रमाणे घटत होते - शिरू मामा याने पण डोंबिवली येथे जागा घेतली. दोन्ही जागा टिळक नगर मधेच. तर शिरुमामाची जागा पाहायला आम्ही डोंबिवलीत गेलो तेव्हा वडिलांचे एक मावस भाऊ बापू सहस्रबुद्धे व बहिण मराठे यांच्या राम नगर मधील घरी पण गेलो होतो. ही दोन्ही घरे स्टेशन जवळ होती. पुढे मामेभाऊ सुहास याची मुंज डोंबिवलीत झाली (ब्राम्हण सभा - निमकर मामा कंत्राटदार ) कारण मुंबई पेक्षा तिथे कार्य स्वस्तात व चांगले होत असे.या सगळ्या १९६९ च्या सुरुवातीच्या गोष्टी. पुढे जुलै १९६९ मध्ये वडिलांची बदली नगर जिल्ह्यातील विसापूर या गावी झाली . तेव्हा मी १०वी ला राजा शिवाजी (तेव्हाच्या king george _) शाळेत होतो व आम्ही तेव्हा चेंबूर येथे राहत होतो. विजुमामाने आग्रह केला व मी विसापुरला न जाता डोंबिवलीत व टिळक नगर विद्यामंदिरात ऑगस्ट मध्ये दाखल झालो हा भाग आधीच्या ब्लॉग मध्ये येवून गेला आहे.
तेव्हा पासून जुन१९७१ पर्यंत एस एस सी होईपर्यंत हे डोंबिवली मधील वास्तव्य खूप महत्वाचे व विविधता पूर्ण ठरले. यात तीन भाग होतात. एक शिक्षण ज्या साठी मी तिथे आलो होतो. १०वीत माझे उच्च (higher) गणित ज्यात अर्धे बीज गणित व अर्धी भूमिती असे होते. पण ते बीजगणित मला काही केल्या जमत नव्हते . मग आमच्या मामीने सुचवले की lower गणित घे ज्यात अंक गणित, बीज गणित व भूमिती असे व ११वी ल्या त्या साठी श्रोत्री सरांचा क्लास पण लावला . आणि हा निर्णय योग्य ठरला कारण एस एस सी ला गणितात विशेष प्राविण्य (distinction ) मिळून फर्स्ट क्लास मिळाला व डोंबिवली मधील वास्तव्याचे जे महत्वाचे उद्दिष्ट होते ते साध्य झाले. इथे विशेषत्वाने नमूद करावे लागेल की टिळक नगर विद्यामंदिर या शाळेत कुणी बोर्डात येवो वा न येवो पण सगळे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतील हे पहिले जायचे व जास्तीत जास्त विद्यार्थी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण व्हायचे. किंग जॉर्ज मध्ये ६-७ तुकड्या होत्या ज्यात अ व ब या तुकड्यांवर जास्त लक्ष केंद्रित केले जायचे त्यामुळे कुणी तरी बोर्डात यायचे, या दोन तुकड्यांतील मुलांना चांगले गुण मिळायचे पण बाकी तुकड्या राम  भरोसे त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असायचे. त्यामुळे  डोंबिवली येथे यायचा व्यक्तिश: मला फायदा झाला. माझ्या आठवणी प्रमाणे आंम्ही ९६ जण परीक्षेला बसलो व सर्व चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो. पुढे मी पुण्याला आलो व विजुमामा पण डोंबिवली सोडून सांताक्रूझ ला गेला. श्रीकांत केळकर, श्रीराम घैसास, श्रीपाद साठे या मित्रांशी संपर्क होता. नंदू गाडगीळ ची दोन नाटके पहिली तेव्हा त्याची भेट झाली होती. सन २०१३ मध्ये म्हणजे ४२ वर्षांनी आमच्या बेच चे स्नेह संमेलन ठरले आणि ४२ वर्षांनी ९६ पैकी ४२ जण आम्ही डोंबिवली इथे भेटलो. अतिशय हृद्य असा हा प्रसंग होता. प्रत्येकाला किती बोलू अन किती नको असे झाले होते. या आधी आमच्या कंपनी मधील व बस मधील एक मित्र राजू विळेकर याच्या घरी गेलो असता -तसे बर्याचदा जात असू- असे लक्षात आले की त्याची बायको ही आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे. ती पण आमच्याच वर्गातील. फक ती अ तुकडीत होती त्यामुळे ओळखले नव्हते . तिच्या कडून समजले होते की मंदा भट, सुजाता मोरे व इतर काही जणी पुण्यात आहेत. त्यांच्या भेटीचा योग या संमेलनात आला.तेव्हा लक्षात आले की आम्ही चक्क १२ जण पुण्यात आहोत . मग इथे आम्ही भेटलो , प्रत्येकाच्या घरी गेलो.२०१५ मधले संमेलन पुण्यात केले. सुजाता मोरे, संजीवनी पुराणिक, तेजस्विनी कोल्हटकर याचे मिस्टर घरी येवून छान गप्पा मारून गेले . त्यामुळे श्री घाणेकर ( तेजस्विनी) यांचे अचानक जाणे चटका लावून गेले. यात विशेष उल्लेख म्हणजे आमच्या वर्गातील पहिला नंबर मिळवणारी शोभा सहस्रबुद्धे हिच्या घरी त्याच्या दिव्यांचा संग्रह पाहायला गेलो तेव्हा श्री मकरंद करंदीकर यांचा परिचय झाला. पण त्याचे घट्ट मैत्रीत रुपांतर कधी झाले ते समजलेच नाही . तेव्हा मुंबईत गेलो की त्यांच्याकडे जाणे हे अपरिहार्य झाले आहे. ते पण एकदा घरी येवून गेले. राजू विळेकर हा तर खूप आधी पासूनचा मित्र.
या संमेलनाच्या निमित्ताने व नंतर फोनवर बोलणे झाले त्यात माधव गोगटे -ग्रुपचा संघटक, नाना देवरे ज्याच्या प्रगतीने-व्यावसायिक व अध्यात्मिक-  खूप आनंद झाला. वसुंधरा देशपांडे जिने WA ग्रुप स्थापन करून रोजच्या संपर्कासाठी मध्यम उपलब्ध करून दिले. तिला गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला तेव्हा आम्ही तिकडे गेलो होतो. त्या वेळी डॉ नरेंद्र जाधव यांच्याशी परिचय व फोटो पण झाला. पुढे त्यांचे एक जी एस टी व नोटाबंदी या विषयावरचे सुरेख व्याख्यान ऐकायचा योग आला.  सुनंदा थत्ते ही आता कानपूरहून पुण्यात आली, सुरेश देशपांडे, स्मिता गडकरी -हिच्याशी दोन मिनिटे बोलले तरी त्या १५ मिनिटांचा आशय असतो,रेखा ब्रह्मे , आणखी पण किती तरी नावे सांगता येतील. इतक्या वर्षांनी भेटल्यावर मुकुंद जोशी, सहस्रबुद्धे, पत्की, राजू व अशोक वल्लभदास हे काही भेटले नाहीत. कोकणे दोन वेळा भेटला आणि अचानक त्याने एक्झिट घेतली.
पुण्यातील मैत्रिणींबद्दल काय बोलावे? सगळ्या जणींमध्ये जाणवतो तो विलक्षण जिव्हाळा. श्रीपाद साठे संपर्कात होताच पण विशेष म्हणजे जगदीश महाशब्दे आमच्या कंपनीत असून आम्ही दोघांनी कंपनी सोडल्यावर आपण एका कंपनीत होतो हे लक्षात आले. आता प्रकाश साठे पण पुण्यात आला आहे त्याला मधुसूदन घाणेकर यांच्याबरोबर काम करतांना छंद जोपासायला मिळत आहे. मला वाटते शाळा आणि मित्र मैत्रिणी यांच्याबद्दल अजून बरेच काही लिहिता येईल.
शाळा म्हटली की शिक्षक आले. सुरेंद्र बाजपायी व भागवत हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. यांच्या सोबर, भारंबे, जोरे, अशी काही नवे आठवतात. मुख्याध्यापक पुरोहित सर हे गंभीर प्रकृतीचे असले तरी त्यांच्या स्वभाव मिश्कील होता. शिक्षिकांमध्ये मंजिरी केळकर या दोन्ही वर्षे वर्गशिक्षिका होत्या. त्या मराठी विषय शिकवायच्या. सोबत शिरहट्टी, निरगुडकर, पावसकर. पळधे, वैद्य, अशी काही नावे आठवतात.   गेल्या आठवड्यात श्रीकांत केळकर याचा फोन आला व त्याने डोंबिवली बद्दल लिही असा आग्रह धरला म्हणून हे लिहिणे झाले व आता दुसर्या विषयाकडे वळतो.
डोंबिवलीचे दुसरे वैशिष्ठ्य म्हणजे सांस्कृतिक जीवन. आम्ही मुंबईत जिथे राहत होतो तो मिश्र भाषिक असा भाग होता त्या मुळे तसे सहज उपलब्ध होणारे सांस्कृतिक जीवन नव्हते. डोंबिवली हे एक संस्कृतिक सरोवर होते. गणेशोत्सव व अन्य वेळी पण गाण्याचे अनेक कार्यक्रम होत असत. तिथेच विश्वनाथ बागुल. भालचंद्र पेंढारकर, मास्टर दामले , जयश्री शेजवाडकर, उदयराज गोडबोले,वसंतराव देशपांडे, गजाननराव जोशी -व्हायोलीन असे कार्यक्रम ऐकले. शाळेत विज्ञान परिषदेमार्फत व्याख्याने होत. एकदा भगवान श्रीकृष्ण या विषयावर चार प्राध्यापकांचा  त्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडणारा परिसंवाद झाला. एरवी पुराणकथा कीर्तनातून ऐकणे माहित होते पण असे पण वैचारिक खाद्य त्यातून मिळते हे प्रथमच समजले. डोंबिवली च्या सांस्कृतिक विश्वात बाजापायी सर आघाडीवर असायचे. आता सुरेश देशपांडे, शालन अध्यापक ती धुरा समर्थपणे पेलत आहेत. डोंबिवली साहित्य परिषद इतकी समर्थ आहे की त्यांनी एक अखिल भारतीय साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवले . यात सुरेश देशपांडे याचा सिंहाचा वाटा होता. शिवाय आमच्या शेजारी खरे व शरद जोशी हे दोघे संगीत प्रेमी राहत असत . आमच्याकडे तबला होता, खरे पेटी वाजवायचे व गायचे. हा दैवाचा खेळ निराळा या गाण्यातील तुकडे ते पेटीवर वाजवून गायचे. शरद जोशी हे व्हायोलीन व बासरी वाजवायचे. बँकेतून आल्यावर तास दोन तास नियमाने रियाज करायचे. श्रीकांतचा भाऊ शशी हा माझ्यापेक्क्षा थोडा वयाने लहान होता तरी आपणहून यायला लागला व तो रम मराठे व इतर नाट्यगीते गायचा मग मी पण तबल्यावर हात साफ करून घ्याचो. तो पण पुढे पुण्यात आला व माझ्या आधी टेल्को मध्ये लागला. काही दिवस आम्ही दोघे सामंत गुरुजींकडे तबला शिकायला जायचो. तो पुढे जात राहिला. मी मात्र नाटके, साहित्य , दिवाळी अंक अशा मुळे तबला क्लास सोडला.
डोंबिवली मधील वास्तव्यातील तिसरा भाग म्हणजे संघ शाखा. रोज शाखेत जावे लागेल अशी मामाची प्रेमळ अट होती. त्यामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी उतरायला व चटपटीत पण यायला मदत झाली. हिवाळी शिबीर, सहली, संचलन याबरोबर मी महिन्यात नाशिक येथे २५ दिवसांच्या वर्गाला गेलो . तिथे प्रत्यक्ष गोळवलकर गुरुजी, नानाजी देशमुख, अटलजी, बाबा आपटे, बाबा भिडे, मोरोपंत पिंगळे , नाना ढोबळे, व अनेक संघ प्रचारक ज्यांचे विचार ऐकायला मिळाले , काहींचा परिचय   झाला. माझ्या सोबत अजित डोंगरे होता व तो पण माझ्यासारखा पुण्यात शिकायला आला होता . त्यावेळी सुरुवातीला आम्ही रोज संध्याकाळी भेटत असू . पुढे स्थिरावल्यानंतर भेटी थांबल्या. त्याचा काही दिवसांपूर्वी फोन आला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शाखेत मोहन व रमेश बापट. त्याचे मोठे बांध्य हरिभाऊ त्यांची एका लग्नात अशीच भेट झाली. संजय सोनटक्के व बंधू, बाबा पोफळे, उमेश व धनंजय डोंगरे, देसाई -नाव आठवत नाही, विजय भट , अरविंद करंबेळकर, असे मित्र मिळाले.
पुण्यात आल्यावर वर्गात विविध शाळेतून आलेल्या मुलांचे स्वाभाविक गट होते व मी बाहेरून आलेला. एकाने विचारले कुठून आला. मी म्हटलं डोंबिवली हून. तो म्हणाला अस पण गाव असत? पुढे मी पुण्यात स्थिरावलो. तो मात्र रिझर्व्ह बॅकेतील नोकरी मुळे डोंबिवलीत स्थायिक झाला (प्रकाश पाटील) व तेथील सांस्कृतिक जीवनात रामला.
जेव्हा डोंबिवली बद्दल लिहायचे ठरले तेव्हा काय लिहावे याबद्दल साशंक होतो. कारण ज्या डोंबिवलीत मी राहिलो ती आणि सध्याची डोंबिवली यात कालानुरूप खूप फरक पडला . त्या वेळी डोंबिवलीत जायचे म्हणजे लोकल हा एकमेव पर्याय होता. व अंतर्गत प्रवास टांग्यातून. नुकतीच कल्याण पनवेल एस टी डोंबिवली मार्गे जावू लागली होती. पण मनातली डोंबिवली मात्र तशीच आहे. टुमदार व छान .

अनिल जोशी
२७.०६.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.

Comments

  1. सुरेख शब्दांकन।

    ReplyDelete
  2. छान लिहिलंय ,सगळे अगदी डोळ्यासमोर उभे राहिले. मन भूतकाळात गेले

    ReplyDelete
  3. खूप छान वर्णन केलेस. दोन वर्षांचा कालखंड छोटा आहेच, पण स्मरणरंजनासाठी मोठा आहे. माझ्या अश्याच आठवणी १९६२ पासून १९७३(पुणे-पूर्व) व नंतर १८ सालपर्यंत लिहील्या आहेत. त्यातील गायन-वादनातील तुझे नाव व त्रोटक माहीती हस्तलिखित रुपात वेगळ्या पाठवत आहे(अक्षरास हसू नये) देसाई बंधु म्हणजे चंद्रशेखर व मदन. माधव सरपोतदार गायन-वादनात व शाखेत असेच....उल्लेख किती जणांचे करणार....तरीही. मस्त वाटले. अण्णाच्या मुलीला व कुटुंबियांना वाचून दाखवतो.

    ReplyDelete
  4. व्वा! अनिल. छानच लिहीले आहेस अपेक्षेप्रमाणे. डोंबिवलीची काय जादू आहे ही इथे राहिलेल्यांनाच कळते. ती तू शब्दांकीत केल्यामुळे इतरांनाही कळेल. स्मरणरंजनाचा आनंद मिळाला व थोडेसे भावूकही व्हायला झाले. आपल्या सहाध्यायींना हे पाठवतो. धन्यवाद.

    ReplyDelete
  5. मी पण डोंबिवलीकर असून पुण्यात स्थायिक झालो आहे लेख वाचून जुनी डोंबिवली डोळ्यासमोर आली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती