स्फूर्तीदायी स्मरण – प्राचार्य रा वा दीक्षित (१९२३-१९९०)
स्पेवशल
आठवणीतील गाव देवरुख लिहिताना एक ओझरता उल्लेख आला होता तो माझे श्वशुर रा वा
दीक्षित यांनी देवरुख येथील नव्याने स्थापन झालेल्या महाविद्यालयात प्राचार्य पद
स्वीकारले व ते देवरुख निवासी झाले. ही घटना साधारण १९७२ मधील.
त्यांना
घरात आबा म्हणत असत. ते धरून एकूण सहा भावंडे. तीन भाऊ व तीन बहिणी .मूळ गाव देवगड
तालुक्यातील तिर्लोट. सर्व कोकणातील कुटुंबांप्रमाणे कनिष्ठ मध्यम वर्गातले. हे
तिन्ही भाऊ हे खूप हुशार , कष्टाने एम ए झाले व ठरवून विद्यादानाच्या कार्यात कार्यरत
झाले. मोठे शिवराम हे रत्नागिरी येथे गोगटे महाविद्यालयात इंग्लिश चे प्राध्यापक
झाले. मधले सखाराम व आबा हे बेळगाव येथील लिंगराज महाविद्यालयात प्राध्यापक झाले. दोघे संस्कृत शिकवायचे.
आबा
जेव्हा मेट्रिक झाले तो काळ असा होता की त्त्या परीक्षेला कुणी नुसते बसले (पास न
होता) तरी नॉन मेट्रिक म्हणून पण मन असायचा. त्या काळात आबा या परीक्षेत १०वे आले
होते. तेव्हा या परीक्षेचे क्षेत्र हे कारवार ते कराची इतके मोठे होते. पुणे –मुंबई
हा त्यातील एक भाग होता ज्या भागात आबा पहिले आले होते. इतकी कुशाग्र बुद्धी व
परिश्रमांची तयारी या मुळे अन्य क्षेत्रात ते गेले असते तर ते खूप मोठ्या पदावर
पोहोचू शकले असते पण शिकवणे हे ध्येय ठेवले आणि ते निभावले.
इथे
एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. त्यांचा नातू अमित किंजवडेकर याला पण ही शिकवण्याची
उर्मी त्यांच्याकडून आली आहे. वडिलांचा व्यवसाय म्हणून तो architecht झाला. पण
बेळगाव येथे व्यवसाय करताना तो बेळगावच्या महाविद्यालयात शिकवायला लागला. त्या
साठी आवश्यक ती M Arch ही पदवी त्याने घेतली आणि या शिकवण्याच्या उर्मी मुळे
बेळगाव येथील व्यवसाय बंद करून तो आता मणिपाल विद्यापीठात Architecture चा
प्रोफेसर झाला व तो विद्यार्थीप्रिय पण आहे.
आबा अर्ध मागधीचे द्वि पदवीधर होते. पुढे या विषयांचे विद्यार्थी कमी होऊ लागले तेव्हा आबांना गदग , निपाणी अशा ठिकाणी जावे लागले. वयाच्या चाळीशी नंतर नोकरीत अस्थिरता निर्माण झाली होती. वेगळ्या गावात नोकरी, बेळगाव येथे कुटुंब, महाविद्यालयातील सर्व अन्य जबाबदार्या स्वीकारून त्या पार पाडायची वृत्ती , ही सगळी सर्कस सांभाळून त्यांनी शिवाजी विद्यापीठातून इंग्लिश घेवून ४५ व्या वर्षी एम ए ही पदवी घेतली. संस्थेच्या नियमानुसार फक्त लिंगायत असलेल्यांनाच पुढे वाव असल्याने आबांच्या कर्तृत्वाला वाव मिळणार नव्हता. अशा वेळी बंधू शिवराम यांनी त्यांना देवरुख येथे नव्याने स्थापन होणार्या महाविद्यालयात प्राचार्य हवे आल्याची माहिती दिली. आणि आबांनी हे आव्हान स्वीकारले व ते देवरुख ला आले.
या
छोट्या गावात महाविद्यालय सुरु केले तरी वाढवणे कर्म कठीण होते. कारण तेथील अनेक
विद्यार्थी हे इंग्लिश सोडून शालांत परीक्षा पास झालेले होते. त्यांना शालेय
स्तरावरील इंग्लिश महाविद्यालयात शिकवावे लागले. गाव छोटे असल्याने चांगले अध्यापक
मिळणे दुरापास्त होते. आबा यातून मार्ग काढत होते. त्यांनी स्थानिक तरुणांना जे
क्लार्क होते त्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यास उद्युक्त करून प्रोत्साहन दिले.
त्या मुळे त्यांची प्रगती झाली . शिवाय काही परिचित प्राध्यापकांना (डॉ सुरेश जोशी) देवरुख येथे येण्यास आग्रह
केला. अनेक प्राध्यापकांना संशोधन करून पी एच डी घेण्यास प्रोत्साहन दिले.
आजूबाजूच्या गावातून विद्यार्थ्यांना येणे सोपे व्हावे या साठी एस टी शी बोलणी
करून सोयीच्या बसेस ची व्यवस्था करून घेतली. विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून
देवरुख ला परीक्क्षा केंद्र करून घेतले. त्यांच्या या अथक कष्टांची जाणीव संस्थेचे
अध्यक्ष न्या.तात्यासाहेब आठल्ये यांना होती. त्यामुळे संथेचे अर्थकारण व
व्यवस्थापन त्यांनी सांभाळले व महाविद्यालय प्रशासन यात आबांना स्वातंत्र्य दिले.
त्यांनी एक म्हत्वाचे पथ्य पाळले ते म्हणजे गावातील राजकारणापासून पूर्ण अलिप्त
राहिले. सर्वांशी समान अंतर ठेवून ते वागत
आपल्या स्टाफ ला पण त्यांचे हेच सांगणे असे की आपण आपल्या अध्यापानावरच
लक्ष केंद्रित करावे. त्यांना वेळोवेळी मुंबईला कामासाठी जावे लागे. ती कामे
संपवून ते रात्रीच्या सध्या एस टी बसने १० तासांचा प्रवास करून सकाळी देवरुख ला
येत व सकाळी आपल्या वर्गावर शिकवायला जात. प्राचार्य असून या बाबतीत त्यांनी कधी
सवलत घेतली नाही. याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या सहकार्यांवर होत असे.
महाविद्यालयात
ते प्रशासक या नात्याने शिस्तीचे भोक्ते होते पण बाहेर मात्र ते प्राचार्य न राहता
आबा असायचे. सहकाऱ्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी पण.
हे
सगळे करत असताना प्रपंच , नातेवाईक यांच्या बाबतची कर्तव्ये ते पार पाडत असत.
देवरुख गाव छोटे असल्याने विद्यापीठातील वा शासकीय अधिकारी भेट द्यायला येत असत
त्यांची निवास व्यवस्था तात्यासाहेब आठल्ये यांच्या घरी तर जेवण वगैरे आबांच्या
घरी करावी लागे. कारण गावात चांगले हॉटेल नव्हते. मोठ्या तीन मुली –माझी पत्नी
क्रमांक ३- यांची लग्ने, मुलांचे शिक्षण, हे व्याप होतेच. अशात महाविद्यालयाला आग
लागली व सर्व इमरा व रेकॉर्ड जळून भस्मसात झाले. यात काही घातपात आहे का यासाठी
अनेक चौकश्या झाल्या. त्यचे नाही म्हटले तरी ताण तणाव होते. शिवाय महाविद्यालय
पुन्हा उभे करायचे होते. हे आव्हान पेलताना त्यांना हृदयविकाराने घेरले.
प्रकृतीच्या तक्रारी सुरु झाल्या.
अशात
निवृत्तीनंतर काय हा प्रश्न होताच. १९८३ मध्ये ते निवृत्त झाले व त्यांनी देवरुख
येथेच इंग्लिश शिकवायचे वर्ग सुरु केले.. निवृत्ती नंतरची पेन्शन महाराष्ट्र शासन
फक्त महाराष्ट्रातील नोकरीच्या कालावधी पुरती द्यायला तयार होते पण तो काळ कमी
होता . बाकी नोकरी ही बेळगाव, निपाणी येथील म्हणजे कर्नाटक मधील होती. पण आबांनी
असा दावा केला की हा सगळा भाग पूर्वीच्या मुंबई प्रांतात होता व अजूनही तो
वाद्ग्रस्त आहे . हे म्हणणे मान्य होवून त्यांना पूर्ण पेन्शन मिळाली .
१९८५
नंतर प्रकृती अधिक खराब होत गेली. त्यांच्या मोठ्या आतड्यावर दोन मोठ्या
शस्त्रक्रिया पुण्यात कराव्या लागल्या. तसे निवृत्ती नंतर आमच्याकडे पुण्याला
येवून राहत असत पण या आजारपणात ते आमच्याकडे आल्याने जास्त सहवास मिळाला. ते
जेव्हा आजारी असत तेव्हा ते एक आदर्श पेशंट असत.प्रकृती विषयी रडगाणे नाही,
उपचारांना सहकार्य करणे हे विशेष गुण होते. त्यामुळे त्यांच्या आजाराचे (गंभीर
असला तरी) ओझे वाटत नसे.
या
सगळ्या व्यापात त्यांचे वाचन सुरु होतेच. क्रिकेट हा आवडीचा विषय. त्यांच्याकडे
नियमित पाने Readers Digest येत असे . शिवाय India Today मधील ताज्या घडामोडीवरील
लेख भाषांतर करून प्रसिद्ध करण्याची त्यांनी रीतसर परवानगी घेतली होती त्या नुसार
त्यांचे लेख चिपळूण च्या सागर मध्ये प्रकाशित होत असत. त्यांचे अक्षर छोटे व
दाणेदार होते. त्या मुळे त्यांच्या पोस्ट कार्डावर पण भरपूर आशयसंपन्न मजकूर मावत
असे. त्यांच्याशी संभाषण व गप्पा पण अर्थवाही होत असत. माझा मुलगा हरीश याला
त्यांचा विशेष लळा होता.
त्यांचा
स्वभाव रोखठोक होता म्हणजे आत एक , बाहेर दुसरे असे नाही. बेळगाव येथील
महाविद्यालयात ते एन सी सी चे प्रमुख होते त्या मुळे त्यांचे नसलेले सुद्धा अनेक
विद्यार्थी त्यांना ओळखत असत.
१९९०
मध्ये पुण्यातच त्यांचे निधन झाले. आणि हा ऋणानुबंध इतका की त्यांच्या पत्नी
रत्नागिरीला हलु न शकण्याच्या अवस्थेत
असताना त्यांना बेळगाव येथे त्यांच्या मोठ्या मुलीकडे न्यावे लागले. तिथे पण अशा
काही अडचणी निर्माण झाल्या की अखेर पुण्याला आधी निवारा मग तपस येथे आणून अखेर
मागच्या जुलै मध्ये त्यांचे पण पुण्यातच निधन झाले . फरक इतकाच आबांचे अंतिम
संस्कार मुलांनी केले पण सासूबाई गेल्या आधी त्यांचे दोन्ही मुलगे निवर्तले होते.
म्हणजे १९८१ ते १९९० असा अवघ्या १० वर्षांचा आमचा सहवास . पण त्या आठवणी नेहेमी
स्फूर्ती देतात.
अनिल जोशी
०७.०६.२०२०.
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी
Wonderful write up.....brought back my entire childhood....golden memories of 80's in Devrukh, true character sketch of my " Devrukh" Ajoba......remembrance of him and his golden deeds, inspirational life is best way of paying respects to Him on his 31st Anniversary.....can't imagine 30 years have breezed away,........inspiring our lives for ever.......
ReplyDeleteखूप छान अर्थात मामाचे व्यक्तीमत्व एवढे बहू आयामी की शब्द अपुरे पडतात ।
ReplyDeleteA Journey down the memory lane. I was fortunate enough to know him as a father of Manik, best friend of my sister Shaila who was doing her collage education at Devrukh.
ReplyDelete