कॉंग्रेस ची पावले विघटनाकडे


हा मथळा माझा नाही तर दिनांक २९ जून च्या महाराष्ट्र टाईम्स मधील सुनील चावके यांच्या लेखाचा आहे. गेली अनेक वर्षे ते दिल्ली मधील घटनांवर दर सोमवारच्या अंकात लिहित असतात. मी त्यांच्या लेखनाचा चाहता होतो पण जसे मोदी सत्तेत आले त्यांच्या लेखनाचा सूर बदलला. पण नंतर त्यांचे लेखन फार एकांगी होऊ लागले . त्यामुळे त्यांचा लेख म्हणजे मोदी विरोध व कॉंग्रेस समर्थन हे समीकरण झाले. पण मिडिया मध्ये असे चालतेच . पण सोमवारच्या अंकातील लेख हा नुकत्याच कॉंग्रेस कार्यकारिणीचा वृत्तांत व त्यावर टिपण्णी असा आहे.
आज कॉंग्रेस ची अवस्था बिकट आहे. कॉंग्रेस हा एक देशव्यापी पक्ष असून त्याला देशभरात काही प्रमाणात निश्चित समर्थन आहे व सुदृढ लोकशाही साठी कॉंग्रेस देशात असणे आवश्यक आहे हे सगळे मान्य करतात कारण देशव्यापी देशाचा दुसरा पक्ष नाही . या पक्षाला स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी आहे व स्वातंत्र्योत्तर काळात या देशात सत्ता राबवण्याचा अनुभव आहे. या पक्षाचे व देशाचे नेतृत्व एका परिवारातील सदस्यांनी केले ही पक्षाची ओळख आहे व तोच आज त्याचा कमकुवतपणा ठरला आहे.
कॉंग्रेस चे लहानपणापासून जाणवलेले सामर्थ्य अचाट आहे. अगदी लहान अताना १९६२ मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा आम्ही विरार येथे राहत होतो व आम्ही सरकारी वसाहतीत राहत असल्याने तिथे मतदान केंद्र होते. त्या केद्रावर जे मतदान झाले त्यात कॉंग्रेस ला १७२, प्रजा समाजवादी पक्ष २५ व जनसंघ ३ अशी मते पडली होती . हे केंद्र वसई मतदारसंघात येत असे. १९६२ मध्ये युद्ध हरून सुद्धा पंडित नेहरू यांची लोकप्रियता कायम होती. कॉंग्रेस पक्षाला भरघोस पाठींबा देशभरातून मिळाला होता. १९६७ मध्ये आम्ही मुंबईत होतो. आम्ही ज्या भागात राहत होतो तो माटुंगा विधानसभा मतदार संघ ज्यात कॉंग्रेस चे लीलाधार शाह निवडून आले होते .त्यांनी स्वतंत्र पक्षाचे मूर्ती यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे कॉंग्रेसचे महापौर माधवन हे आमच्याच बिल्डींग मध्ये राहत होते. जनसंघाचे ठक्कर तिसर्या क्रमांकावर होते तर समितीचे गाडगीळ ४थ्या क्रमांकावर होते. समिती तर्फे लोकसभेला आचार्य अत्रे उभे होते त्यांचा कॉंग्रेस चे भंडारे यांनी अतिशय कमी मताधिक्याने पराभव केला होता. शेजारच्या मतदारसंघात कॉम्रेड डांगे तर दक्षिण मुंबईत जॉर्ज फर्नांडेस कॉंग्रेस चे बलाढ्य उमेदवार स का पाटील यांचा पराभव करून निवडून आले होते .मुंबईत स का पाटील तर मद्रास मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष कामराज पराभूत झाले होते.तर ईशान्य मुंबईतून स गो बर्वे यांनी कृष्ण मेनन यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत कॉंग्रेस विरोधी वातावरण असताना आणखी महत्वाचा घटक नुकतीच  जन्मलेली शिवसेना हा होता. उमेदवार उभा न करता सेना रिंगणात होती. आचार्य अत्रे व कृष्ण मेनन यांना पाडण्यात ती सक्रीय होती. अत्रे  कम्युनिस्ट पक्षाच्या आहारी गेले असा प्रचार केला गेला. आता संयुक्त महाराष्ट्र लढ्यात कम्युनिस्ट , समाजवादी, जनसंघ , हिंदुमहासभा , शेतकरी कामकरी पक्ष सगळे एक दिलाने लढले होते . अत्रे यांना कोणता पक्ष नव्हता म्हणजे सुरुवातीला पुण्यात ते कॉंग्रेस मध्ये होते पण पक्षीय राजकारणात ते रमले नाहीत. महापालिकेत असताना ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते व त्या काळात पुण्यातील रस्ते डांबरी करणे व बस सेवा सुरु करणे ही कामे त्यांनी केली होती. पण त्यांना लोकसभेला पडण्याची कामगिरी शिवसेनेने पार पाडली होती. मुंबईतून कम्युनिस्टांना संपवणे हा एक अजेंडा शिवसेनेचा होता त्याची ही सुरुवात होती . अर्थात हा आजचा विषय नाही.
१९६९ मध्ये कॉंग्रेस पक्ष फुटला व इंदिरा गांधी यांचे विरोधक बाजूला पडले.सुरुवातीला यशवंतराव चव्हाण जुन्या लोकांसोबत होते पण नंतर ते इंदिरा गांधी यांच्या सोबत गेले. यात त्यांचे महत्वाचे गृह खाते गेले व अर्थ खाते आले.
१९७१ मध्ये लोकसभेतील अल्पमताच्या अस्थिरतेमुळे मध्यावधी लोकसभा निवडणुका जाहीर केल्या व सगळी प्रचार मोहीम एकहाती चालवली. या वेळी सर्व विरोधक संघटना कॉंग्रेस, स्वतंत्र पक्ष, जनसंघ व संयुक्त समाजवादी पक्ष एकत्र येवून बडी आघाडी केली व नारा दिला -इंदिरा हटाव . याला प्रत्युत्तर म्हणून इंदिरा गांधी यांनी नारा दिला गरिबी हटाव. ही निवडणूक कॉंग्रेस ने २/३ बहुमत मिळवून जिंकली आणि आपलाच पक्ष कॉंग्रेस पक्ष यावर शिक्का मोर्तब केले. इथे हळू हळू पक्ष संघटनेचे महत्व कमी व्हा व  सुरुवात झाली व सर्व सत्ता इंदिरा गांधी यांच्या हाती एकवटली. त्यांचे वर्णन The only man in the cabinet असे होत असे. पाकिस्तान मधील अतर्गत संघर्षामुळे पूर्व पाकिस्तान मधील अनेक निर्वासित भारतात आले व आपल्या तिजोरीवर खूप ताण पडू लागला.अखेर पाकिस्तानशी युद्ध करून पूर्व पाकिस्तान वेगळा केला व बांगलादेश ची निर्मिती झाली. पुढे देशात भीषण दुष्काळ पडला. युद्ध खर्च व दुष्काळ यामुळे महागाई व अन्न टंचाई दोन्हीचे चटके बसू लागले. शिवाय कॉंग्रेस मधील अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर येवू लागले त्या मुळे जनतेमध्ये असंतोष वाढू लागला.गजरात मधील विध्यार्थी आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.तेथील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस चा पराभव झाला व जनता मोर्चा नावाने सर्व विरोधकांचे सरकार निवडून आले. या आंदोलनाला नव निर्माण आंदोलन असे म्हटले गेले. यातून प्रेरणा घेवून बिहार मध्ये विध्यार्थ्यानी आंदोलन सुरु केले व यासाठी त्यांनी ज्येष्ठ सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांच्याकडे त्याचे नेतृत्व दिले. या दरम्यान इंदिरा गांधी यांची १९७१ मधील निवडणूक अल्लाहाबाद हाय कोर्टाने रद्द ठरवली . इथे इंदिरा गांधी यांना आपण सगळीकडून घेरलो गेलो अशी भावना निर्माण झाली आणि त्यांनी २५ जून १९७५ रोजी देशांतर्गत आणीबाणी जाहीर केली, विरोधकांना तुरुंगात टाकले व प्रसिद्धी माध्यमांवर सेन्सॉर शिप लावली. लोकसभा व विधानसभा यांची मुदत ५ वरून ६ वर्षे वाढवली . त्यामुळे १९७६ मध्ये होणार्या निवडणुका लांबल्या. मग विरोधकांना खिंडीत पकडून अचानक जानेवारी १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्या . इतके दिवस विरोधक तुरुंगात होते , विस्कळीत होते त्यामुळे त्यांना हरवणे सोपे ठरेल असा अंदाज होता. पण विरोधक तुरुंगात आपापसातील मतभेद विसरून एकत्र यायच्या मनस्थितीत होते त्याला चालना मिळून कॉंग्रेस विरोधात जनता पक्ष म्हणून उभे ठाकले व त्यांनी कॉंग्रेस पुढे आव्हान उभे केले . शिवाय जनतेची सहानुभूती पण विरोधाकांसोबत होती. परिणामी या निवडणुकीत कॉंग्रेस चा पराभव झाला .अगदी स्वत: इंदिरा गांधी व संजय गांधी पण पराभूत झाले. जनतेने एका अर्थाने त्यांचा सत्तेचा माज उतरवला .या पराभवामुळे कॉंग्रेस पक्ष पुन्हा फुटला. १९७९ मध्ये महाराष्ट्रात पण शरद पवार यांनी कॉंग्रेस ची साथ सोडली व विरोधकांच्या मदतीने मुख्यमंत्री पद घेतले.
१९८० मध्ये जनता पक्षाच्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे ते सरकार पडले व १९८० मध्ये जनतेने पुन्हा इंदिरा गांधी यांच्या हाती सत्ता दिली. या काळात त्यांची पक्षावरची पकड सुटली. पंजाब, आसाम येथील आंदोलने तीव्र झाली व याचा परिपाक म्हणजे इंदिरा गांधी यांची हत्या झाली . या आधी एका विमान अपघातात इंदिरा गांधी यांचे नियोजित वारसदार संजय गांधी यांचा मृत्यू झाला व ती जागा राजीव गांधी यांनी घेतली. त्यामुळे ते पंतप्रधान झाले. नंतर झालेल्या निवडणुकीत १९८४ मध्ये कॉंग्रेस ला न भूतो न भविष्यती असे यश (४/५बहुमत) मिळाले. इथे पुन्हा विरोधक हतप्रभ झाले. राजीव गांधी यांच्या या कालखंडात विरोधकांच्या सोबतीला त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ सहकारी विश्वनाथ प्रताप सिंग  बंड करून बाहेर पडले व हे आव्हान कॉंग्रेस ला महाग पडले. त्यामुळे १९८४ मध्ये ४/५ बहुमत मिळवलेला पक्ष १९८९ मध्ये पराभूत झाला.
व्ही पी सिंग यांचे सरकार भाजप ने पाठींबा काढून घेतल्याने व त्यानंतर कॉंग्रेस च्या पाठींब्याने बनलेले चंद्रशेखर यांचे सरकार पडले व १९९१ मध्ये देशाला पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत मतदानाचे दोन टप्पे झाल्यानंतर तिसर्या टप्प्याच्या आधी कॉंग्रेस नेते राजीव गांधी यांची तमिळनाडू मध्ये हत्या झाली. पण कॉंग्रेस पक्ष बहुमताजवळ पोचला होता. या वेळी ज्येष्ठ नेते नरसिंह राव यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. कुशलतेने भाजप व डावे पक्ष यांच्या सहकार्याने ५ वर्षे कारभार केला . मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री करून आर्थिक सुधारणांना वेग दिला.
मध्यंतरीच्या काळात कॉंग्रेस चे नेतृत्व सोनिया गांधी यांच्याकडे दिले. १९९६ मध्ये कॉंग्रेस अल्पमतात गेली व प्रथमच भाजप मोठा पक्ष म्हणून निवडून आला. त्या मुळे अटल बिहारी बाजपायी, देवेगौडा, गुजराल असे तीन अल्पकालीन पंतप्रधान झाले पुढे १९९८ ते २००४ मध्ये इतर विरोधकांच्या सहाय्याने अटल बिहारी बाजपायी हे पंतप्रधान झाले. पण २००४ मध्ये जनतेने पुन्हा कॉंग्रेस ला बहुमताच्या जवळ नेले.व २००४ ते २०१४  यु पी ए या नावाने कॉंग्रेस ने मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून सरकार चालवत होते .पण सतीची सगळी सूत्रे सोनिया व नंतर राहुल गांधी यांच्याकडे राहिली. दुसर्या कालखंडात खरे तर राहुल गांधी यांच्याकडे सरकारची धुरा द्यायची योजना होती पण सरकार विरोधात जनक्षोभ वाढत होता. या वेळी भाजपने धूर्त खेळी केली. अडवाणी व अन्य ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करून पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून गुजरात चे मुख्य मंत्री नरेंद्र मोदी यांना आणले व देशातील वातावरण बदलून गेले. भाजपने एकट्याने स्पष्ट बहुमत मिळवले तर कॉंग्रेस पन्नास जागा पण मिळवू शकला नाही.
पुढे पक्षाचे अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे देण्यात आले पण २०१९ मध्ये पुन्हा जास्त जागा मिळवून भाजप सत्तेत आला. या पराभवाची जबाबदारी घेवून राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडले व सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष झाल्या. कॉंग्रेस पक्ष पराभवाच्या गर्तेतून बाहेर येत नाही तसेच त्यावरील गांधी कुटुंबाची पकड कायम आहे. आज नेहेमी प्रमाणे गांधी हे नाव पक्षाला यश मिळवून देवू शकत नाही पण पक्ष म्हणून त्याला पुढे नेणारे जनाधार असलेले नेतृत्व पक्षात उरले नाही . जे नेतृत्व होते त्याचे पद्धतशीरपणे खच्चीकरण केले गेले. पक्षाचे सगळे अर्थकारण हे गांधी कुटुंबाच्या हातात असल्याने कॉंग्रेस जनांची अवस्था बिकट झाली आहे.
१९७१ च्या निवडणुकीच्या वेळेला मी डोंबिवलीत होतो. तिथे नगरपालिकेत जनसंघाचे बहुमत होते व वातावरण जनसंघाला अनुकूल होते. जनसंघाचे उमेदवार प्रा मुकुंद आगासकर यांच्यासाठी जनसंघाने तिथे अनेक सभा घेतली. वामनराव परब, जयवंतीबेन मेहता, राम कापसे, ग भा कानिटकर, रामभाऊ म्हाळगी, बलराज मधोक, अटलजी  तर शिवसेनेने माजी लष्कर प्रमुख करिअप्पा यांना पाठींबा दिला होता तसाच दक्षिण मुंबईत जॉर्ज फर्नांडीस यांच्या विरोधात अपक्ष नवल टाटा यांना पाठींबा दिला होता. त्यांच्या काही सभा झाल्या होत्या. कॉंग्रेस तर्फे एकच यशवंतराव चव्हाण यांची सभा झाली होती. त्या मुळे चित्र असे होते की लढत सेना व जनसंघ यांच्यात होईल पण कॉंग्रेस उमेदवार राजा कुलकर्णी यांना जनसंघ व शिवसेना दोघांच्या मतांच्या बेरजे पेक्षा जास्त मते मिळाली होती.
पुढे पुण्यात आल्यावर खोलीत ग्रामीण भागातील विद्यार्थी राहायला होते. अशा विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून जाणवले की ग्रामीण भागात कॉंग्रेस ची पाळे मुळे किती घट्ट रुजलेली आहेत. कॉंग्रेस ने कुणालाही उभे करावे आणि निवडून आणावे अशी परिस्थिती होती. त्यावेळी बारामती मधून र के खाडिलकर निवडून आले होते. तेव्हा ही मुले म्हणायची ते आले ते फक्त कॉंग्रेस पक्षामुळे. तर खेड मतदार संघातून पुण्याच्या विशाल सह्याद्री चे संपादक अनंतराव पाटील निवडून आले होते. पुढे १९७२ मध्ये विधानसभा निवडणुकीत जनसंघाचे म्हाळगी व कृष्णराव भेगडे, समाजवादी पक्षाचे दादा जाधवराव वगळता कॉंग्रेस चे उमेदवार निवडून आले . पण भोर मध्ये अधिकृत उमेदवरा विरुद्ध अनंतराव थोपटे तर जुन्नर मध्ये किसनराव बाणखेले हे बंडखोर निवडून आले. थोपटे कॉंग्रेस मध्ये राहिले व पुढे मंत्री झाले तर बाणखेले जनता दलातर्फे लोकसभेत गेले . श्रीगोंदा मतदार संघात उमेदवारी उशिरा मागे घेतल्याने मतपत्रिकेवर नाव राहिलेले भारस्कर निवडून आले. एवढे होवून पण २८८ मध्ये एकूण विरोधकांची संख्या २० वर पोहोचली नव्हती. हे सगळे सांगायचा हेतू इतकाच की ग्रामीण भागात कॉंग्रेस किती घट्ट रुजलेली होती याची कल्पना यावी. १९७७ च्या निवडणुकीत जेव्हा जनता पक्षाचा जोर दिसत होता तेव्हा पण चर्चा अशीच होती शहरी भागात फारतर ८-१० जागा मिळतील.
१९७७ व १९८९ मध्ये कॉंग्रेस पक्षाचा पराभव झाला तेव्हा जागांची संख्या आता सारखी दयनीय नव्हती.
परवाच्या कार्यकारिणीत सिंग नावाच्या एका नेत्याने असे सांगितले की फक्त मोदी यांना विरोध करून पक्ष वाढणार नाही त्यांच्या धोरणांना विरोध करावा. पण हे राहुल गांधी यांना हे मान्य नाही. ते सातत्याने मोदी यांना विरोध करत आहेत व इतर नेते तसा करत नाहीत हे त्यांचे म्हणणे आहे. कुणी वेगळा विचार मांडला की कर हकालपट्टी हेच धोरण आहे. रायबरेलीच्या कॉंग्रेस आमदाराने प्रियांका यांनी नाटकबाजी बंद करावी याचा पक्षाला तोटा होतो तर त्यांची हकाल पट्टी केली. पूर्वी सोनिया यांनी नेते राहावे पण पंतप्रधान होण्याचा हट्ट धरू नये असे मत मांडले तर त्यांची पण हकाल पट्टी झाली. त्यामुळे पक्षात गप्प राहायचे किंवा बाहेर पडायचे असे दोनच पर्याय कॉंग्रेस नेत्यांकडे आहेत.
राहुल गांधी हे अयाशस्वी नेते आहेत हे सिद्ध झाले आहे. त्यांची जागा घायला व पक्षाला पुन्हा यशस्वी करायला कुणी पुढे येत नाही . आता ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांचे निकटवर्ती पण ते पक्ष सोडून गेले तरी त्यांना थांबवू शकले नाहीत. आमदार, नेते पक्ष सोडून जातात तिथे पण हे काही करत नाहीत. इतके निष्क्रिय नेतृत्व आहे. रोज मोदी यांना विरोध करताना आपण देशाच्या लष्कराच्या विरोधात बोलून जनतेची सहानुभूती घालवतो आहोत हे पण त्यांच्या लक्षात येत नाही.
कॉंग्रेस पक्ष हा सशक्त लोकशाही साठी आवश्यक आहे. पण तो निर्नायकी आहे आणि त्याच्या खजिन्यावर गांधी कुटुंबाचा विळखा आहे. बाकीचे नेते हे दरबारी व जनाधार नसलेले आहेत. या पक्षाची ही शोकांतिका सुजाण नागरिक म्हणून खूप दु:ख देते.

अनिल जोशी
०४.०७ २०२०
कृपया आपली प्रतिक्रिया नावासह द्यावी.

Comments

  1. विघटन म्हणण्या ऐवजी नष्टतेकडे म्हणावे अशी परीस्थिती आहे. पक्ष नसून गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. अश्या परिस्थितीत प्रतिमा वर्धन न होता हननच होते. तसा भाजपसुद्धा याला अपवाद नाही, पण सध्यातरी कॉंग्रेसला घरघर लागलेली आहे. शरद पवार मात्र देशपातळीवर कधीच तळपले नाहीत याचे आश्चर्य वाटते. मुळात कॉंग्रेसला महाराष्ट्राबद्दल तिटकाराच आहे. मुंबई विमानतळाला छत्रपतींचे नाव देताना अन्य पर्याय होते ते सर्व अमराठीच होते. कॉंग्रेस संपणार आहे, आपण लिहून तो विषय विनाकारण लोकांच्या नजरेत समोर ठेवण्याचे काहीच कारण नाही. इंदिरा गांधी १९८० साली फुकट प्रसिद्धी मिळाल्यानेच दिमाखात परत आलेल्या, तसे होऊ नये.

    ReplyDelete
  2. अबब, अनिल, किती सविस्तर तपशील आणि समर्पक विश्लेषण केले आहेस ! कथा -कविता-लेख, संगीत, नाटक या विषयात रमणाऱ्या तूझा राजकारण या विषयातला अभ्यास खरोखरचअचंबित करतो. महाराष्ट्र टाईम्सने तुझा हा लेखही प्रकाशित करावा असे मनापासून वाटते.
    काँग्रेस हा पक्ष आता असा पेशंट झाला आहे की डायलिसिस करूनही त्याची उर्जा आता फार काळ टिकेल असे वाटत नाही. असो.

    या लेखाप्रमाणेच तुझ्या ब्लॉगमधले अनेक लेख प्रथितयश वर्तमानपत्रातही प्रसिद्ध होण्याच्या दर्जाचे आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावा. त्यासाठी शुभेच्छा. - अरविंद सोनटके

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती