भय न उरले मृत्यूचे आता

मृत्यूचे चे भय नाही हे जरा ऐकायला आणि पटायला अवघड आहे. अटळ असलेला मृत्यू हा मनाच्या कोपर्यात सदैव कुठेतरी दबा धरून बसलेला असतो आणि आपण तो विषय टाळतोच. याचे कारण म्हणजे मनात त्याच्या बद्दल असलेली सुप्त भीती आणि  आपली जीवनासक्ती यामुळे आपण त्या विषयापासून दूर पळत राहतो.
पण परवा फेसबुक वर एक धनंजय केशव केळकर या नावाने आलेली एक पोस्ट वाचली. त्यात त्यांनी एका जगप्रसिद्ध डॉक्टर च्या बोलण्याचा हवाला दिला त्यात ते म्हणतात की त्यांनी किमान २०० जणांचा मृत्यू बेडच्या बाजूला बसून पहिला होता.  ते म्हणतात  -" तीव्र हार्ट attack, मोठा जीवघेणा अपघात, किंवा वयोमानाने आलेला नैसर्गिक मृत्यू या तीन गोष्टी सोडल्या तर माणसाची जो पर्यंत जगायची इच्छा असते तो पर्यंत तो जगतो. आणि एकदा आता आपण मरावे किंवा मारणार असे ठरवले की कुणी त्याला वाचवू नाही शकणार. (अर्थात किती तरी विकलांग मृत्यू ची वाट पाहत जगात असतात हे पण वास्तव आहे पण तो आजचा विषय नाही)
ते म्हणतात करोनाने आपण मारणार ही भीती सोडून द्या.रक्तातील प्राणवायूची पातळी लक्षात न येत खूप खाली गेली तरच मृत्यूची शक्यता असते. बाकी सगळे बरे होतातच. आज सगळे जण करोना च्या  भीतीखाली व दबावाखाली असताना असा कुणी दिलासा देत असेल व त्यात काही तथ्य असेल तर मनाला दिलासा हा मिळतोच.
मला आठवतंय लहानपणी आम्हाला आमची आई अनेक गोष्टी सांगायची. एकदा ती श्रावण बाळाची गोष्ट सांगत होती आणि ती जेव्हा सांगायला लागली की दशरथ राजाच्या बाणाने श्रावण बाळाचा मृत्यू झाला तेव्हा मी तिला थांबवले कारण हे मी ऐकू शकलो नाही व दुसर्या दिवशी मग ती गोष्ट ऐकली. पण मृत्यूची एक भीती होतीच. खरे तर मृत्यू पाहण्याचे ते वय नव्हते व कधी पहिला पण नव्हता . तो भेटायचा तो गोष्टींमधून. कधी आम्हा भावंडांची भांडणे झाली की किंवा अन्य कारणांनी आई वैतागून म्हणायची -मी मेल्यावर तुम्हाला बरे वाटेल. आणि तेव्हा वाटायचं खरच आई गेली तर...? मग आम्हाला जेवायला कोण वाढेल? वडिल दुसरे लग्न करून सावत्र आई आणतील का? आता हे सगळे हास्यास्पद वाटते आहे. कारण जेव्हा आम्ही मोठे झालो , आमच्या संसारात रमलो तेव्हा पण आईचा आधार, जिव्हाळा हे जाणवत होता. आपल्या मुलाचं कौतुक किती आणि कुणाजवळ करू असं तिला होत असे. एक घर लहान पडायला लागल्यावर दुसर घर घेतलं पण ते अगदी जवळ की आईला केव्हाही भेटता यावे म्हणून. पण प्रत्यक्षात ती जेव्हा गेली तेव्हा तिच्या व्याधीग्रस्त शरीरातून तिची सुटका नियतीने केली हीच भावना होती. लहानपणी वडिल पालक वाटायचे, पुढे आम्ही पायावर उभे राहिल्यावर ते मित्र झाले आणि त्यांनी एका ज्येष्ठ मित्राचा आधार दिला. जेव्हा ते गेले तेव्हा बहिण म्हणाली की आपण पोरके झालो. पोरके होणे या शब्दाचा तेव्हा असा अर्थ जाणवला की आता आपण
पोर नाही राहिलो.
जसं जसं वय वाढत जात तेव्हा आपला मृत्यूशी अधिक परिचय होत जातो. अचानक , अनपेक्षित अकाली मृत्यू चटका लावून जातात. आपल्या जोडीदाराचा मृत्यू किंवा अपत्याचा मृत्यू जो पाहण्याची वेळ सहसा कुणावर येवू नये - हे आपल्या काळजाचा लचका तोडून जातातच.
पण बर्याच अंशी तो कालाय तस्मै नम: अशा प्रकारे काल चक्राचा एक भाग असतो. पूर्वी एखादी प्रेतयात्रा दिसली तरी तोंड फिरवत होतो. मग हळू हळू कुणासाठी तरी स्मशानात जायला सुरुवात केली -घाबरत , घाबरत. पण नंतर मन निर्ढावत गेले. आणि हे असे होणे अपरिहार्य असते. पण सगळ्यांच्या बाबतीत असे होतेच असे नाही. कारण एकदा गाडीतून येत असताना एका वयस्कर माणसाशी बोलत असताना ते म्हणाले - मी हल्ली स्मशानात जात नाही कारण लवकरच आपण इथे येणार ही जाणीव मन खाते.
म्हणजे मृत्यूचे भय प्रत्येकाच्या मनात असते पण कधीतरी आपण त्यावर मात करू शकलो तर जीवन अधिक सुंदर होऊ शकते , आनंदी होऊ शकते हे मात्र मला वरील पोस्ट वाचून पटले आणि मग मृत्यूचे भय उरले नाही की जी मनाची पिसारखी हलकी अवस्था अनुभवता येते. आणि हा अनुभव प्रत्येकाला घेता येईल असे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.

अनिल जोशी
१८.०७.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी. 

Comments

  1. छान लिहिले आहेत.पटलं
    धनश्री जोशी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती