सुदृढ व सशक्त लोकशाही साठी

सध्या कॉंग्रेस पक्षाची चालू असलेली वाताहत पाहत असताना अनेक जण असा सूर आळवू लागले आहेत की लोकशाही साठी सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष हवा आणि एक जुना व देशव्यापी पक्ष म्हणून ती जबाबदारी कॉंग्रेस ची आहे.. पण आपला पक्ष वाढवणे व त्याला पूर्वीचे दिवस आणून देणे , त्या साठी रस्त्यावर लोकांचे प्रश्न घेवून जाणे , अन्य पक्षांशी संबंध वाढवणे या सगळ्या गोष्टी करण्याची हा पक्ष उमेद घालवून बसला आहे. २०१४ पासून राहुल गांधी यांचे नेतृत्व पूर्ण पणे अयशस्वी ठरले असले तरी ते काँग्रेसजन मान्य करीत नाहीत. हे कॉंग्रेसजन म्हणजे सगळे दुद्धाचार्य आहेत. जे वयोवृद्ध झाले आहेत व ज्यांची लोकांमध्ये जावून काम करायची क्षमता कधीच नव्हती . पण लोकांमध्ये काम करणारे तरुण व तडफदार नेते या तथाकथित श्रेष्ठींच्या नाकर्तेपणामुळे हतबल व निराश झाले आहेत. त्यांना या पक्षात आपले भवितव्य दिसत नाही.
इतकी वर्षे कॉंग्रेस चे चालून गेले कारण कॉंग्रेस ला पर्याय नव्हता आणि तो पुढे आल्यानंतर कॉंग्रेस ची अवस्था दयनीय झाली. आणि या पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढेल असे राहुल गांधी यांचे नेतृत्व नाही हे अधोरेखित झाले आहे. मग आता अन्य कुणी तरी प्रबळ पर्याय उभा करायला हवा.
थोडं इतिहासात डोकावून पाहिलं तर लक्षात येईल की असा पर्याय शोधण्याचे, निर्माण करण्याचे प्रयत्न खूप आधी पासून झाले आहेत . कॉंग्रेस विरोधात सगळे पक्ष आपापसात लढले तर मत विभागणी होवून कॉंग्रेस चा फायदा होतो तेव्हा मत विभागणी टाळण्यासाठी एकत्र येवून कॉंग्रेस शी मुकाबला करूया असा विचार प्रथम डॉ राममनोहर लोहिया यांनी मांडला व परिणामी १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अनेक राज्यात कॉंग्रेसेतर सरकारे आली. पण वैयक्तिक महत्वाकांक्षा , हेवेदावे व कार्यक्रमाचा अभाव यामुळे ती अल्पजीवी ठरली. १९७१ मध्ये विरोधी पाकाक्षांची महाघाडी पण अयशस्वी ठरली. मग १९७५ मध्ये आणीबाणी मुळे सगळे पक्ष एकत्र येवून एक पक्ष स्थापन केला व कॉंग्रेस पुढे पर्याय उभा केला. त्याला निवडणूक जिंकण्यात यश मिळाले पण सरकार चालवणे व पक्ष एकसंध न ठेवता आल्याने तो प्रयोग पण फसला. सरकार गेल्यानंतर जनता पक्षातील समाजवाद्यांचा संघ द्वेष उफाळून आला व दुहेरी सदस्यत्वाच्या मुद्द्यावर पक्ष फुटला.
जनता पक्षातून फुटल्यानंतर निर्माण झालेल्या भाजपने एकला चलोरे चे धोरण स्वीकारले. पण तोवर लाटेवरचे राजकारण करता करता पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाले होते. पक्ष स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या सहानुभूती लाटेत पक्षाचा दारूण पराभव झाला व एक प्रकारे ही इष्टापत्ती ठरली . मग नेतृत्व अडवाणी यांच्याकडे आले आणि त्यांनी पक्ष संघटना वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. याचा परिणाम म्हणजे १९८९ मध्ये पक्षाने लोकसभेत २ वरून ९० पर्यंत झेप घेतली. कॉंग्रेस ला सत्तेबाहेर ठेवायला  व्ही पी सिंग सरकारला बाहेरून समर्थन दिले पण सरकारात जायचा मोह आवरला. पण उद्दिष्ट तेव्हाच ठरले होते आता सरकार आपलेच आणायचे. आणि १९९६ मध्ये भाजप हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून पुढे आला. त्यावेळी अन्य कुणाची साथ न मिळाल्याने तो प्रयोग फसला . पण त्यातून धडा घेवून १४-१५ पक्षांना एकत्र घेवून सरकार चालवले. पण पुढच्या निवडणुकीत मित्रपक्षांची कामगिरी कमी पडली व पुन्हा पराभव झाला. या नंतर पक्षाने स्वत: चे पूर्ण बहुमत मिळवायचे ध्येय ठेवले व त्यासाठी जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला करायचे धाडस पण दाखवले . आणि २०१४ मध्ये पूर्ण बहुमत घेतले व त्याची पुनरावृत्ती २०१९ मध्ये पण झाली.
हा सगळा इतिहास सांगायचे कारण म्हणजे पर्याय उभा करणे हे सोपे कम नाही. आज जनता दल   नावाचे काही पक्ष विविध राज्यात आहेत उदा. बिहार-राजद, ओरिसा-बिजद, उत्तर प्रदेश-समाजवादी पक्ष . हे सगळे एकेका नेत्याच्या करिष्म्यावर उभे राहिलेले पक्ष आहेत ते आपल्या समाजवादी विचारधारेला प्रमाणभूत मानून देशव्यापी पर्याय उभा करू शकतील का? याचे उत्तर नाही असेच आहे. कारण बिजू जनता दल सोडल्यास बाकी पक्ष आपापल्या राज्यातच सत्ताभ्रष्ट झालेले आहेत. शिवाय त्यांनी  आपले पक्ष हे पारिवारिक पक्ष बनवून आपले हातपाय बांधून घेतले आहेत. बंगाल , आंध्र, तेलंगण येथील पक्ष हे मध्यवर्ती कॉंग्रेसच्या नाकर्तेपणामुळे बाहेर पडले आहेत व त्यांची स्वतंत्र बेटे आहेत. त्यामुळे या सर्वांची मोट बांधणारे सक्षम नेतृत्व निर्माण होणे आवश्यक आहे .
कालांतराने असे नेतृत्व निर्माण होईल ही आणि हा देश आणि समाज इतका समृद्ध आहे की अशी पोकळी निर्माण होतच नाही. नेहरू नंतर या देशाचे कसे होणार अशी चिंता अनेक जण त्यावेळी करत असत. पण एका कवीने म्हणून ठेवलेच आहे की -
राम कृष्ण ही आले गेले, त्यावीण जग का ओस ची पडले
त्यामुळे कॉंग्रेसचे काय व्हयाचे ते होईल, भाजपचे पण तो बदलता राहील की त्याची कॉंग्रेस होईल याची उत्तरे येणारा काळ देईल.
मात्र सुदृढ व सशक्त लोकशाही साठी समाज जागृत व सहृदय असायला हवा . कारण देशातील लोकशाही हे राजकारणी टिकवत नाहीत तर ती टिकवणे , समृद्ध करणे हे मतदार करत असतात. आणि समाज हा शा राजकीय लाटांवर फारसा वहावत जात नाही. त्याचे पाय जमिनीवर असतात . त्या मुळे आपल्या समाजाच्या हातात आपली लोकशाही सुरक्षित आहे हे नक्की.

अनिल जोशी
२५.०७.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी. 

Comments

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती