बसंत है आया

 (सदर लेख एप्रिल च्या उत्तमकथा साठी लिहिला होता पण मध्ये तीन महिने अंक निघू शकला नाही म्हणून जुलै मध्ये प्रसिद्ध झाला.)

चैत्र पाडव्याला ऋतू चक्रातील पहिला ऋतू वसंत याचे आगमन होते. पानगळी नंतर रुक्ष झालेल्या वृक्षांना पालवी फुटते आणि हिरव्या गार वृक्षांना रंगी बेरंगी फुलांनी डवरलेले पाहताना मन प्रफुल्लीत होते. गोठवणारा हिवाळा सरून पुन्हा धरतीला उष्ण धुमारे फुटू लागतात.
संगीतात या ऋतूचा अविष्कार दाखवणारा राग म्हणजे राग बसंत. ललितलवंगलतापरिशीलन कोमल मलय समीरे ही कवी जयदेव यांची अष्टपदी म्हणजे वसंत ऋतूचे सुंदर वर्णन. वसंत ऋतूतील नवी पालवी आणि संगीतातील बसंत राग यांचे अतूट नाते सर्वमान्यच आहे. या रागाचे यथार्थ वर्णन करणारी बसंत रागातील चीज पंडित जसराज गातात-
और राग सब बने बाराती, दुल्हा राग बसंत
मदन महोत्सव आज सखी री, बिदा भयो हेमंत.

वसंत ऋतूत आंब्याच्या मोहोराचा मादक वास आमराईत दाटून राहतो. गुलमोहर केशरी आणि तांबड्या रंगांची उधळण करीत असतात, कोकीळ कुहू कुहू गात असतो.अंगणी गुलमोहर फुलला या गदिमांच्या गाण्यातील विरहिणी म्हणते –वसंत आला ,याल तुम्ही ही
कोकीळ कुजबुजला.
ऋतू प्रमाणे बसंत हा राग पण आल्हाद दायक आहे. वसंत ऋतूत तो कधीही गावा  असा ऋतुराग आहे.हा राग साधारणपणे आठव्या शतकापासून प्रचलित आहे असे मानले जाते.
प्राचीन काळापासून या रागाच्या शास्त्रीय स्वरूपाबद्दल मतभेद आहेत. दोन्ही मध्यमांचा प्रयोग करणारा ललित अंगाचा बसंत सध्या जास्त प्रचलित आहे.हा उत्तरांग प्रधान आणि आरोही चलनाचा राग आहे. अवरोहात षड्जावरून खाली उतरताना ,रागातल्या सर्व सुरांची विचारपूस करत मूळ षड्जावर येवून टेकाव एवढ्यात त्याला कोमल मध्यम हाक मारतो.अवरोहात त्याला स्थान नसत. मग बसंत त्वरित त्याच्याकडे जातो, मग गंधारावर विसावून म गम  ग रे सा अशा रस्त्याने मूळ षड्जावर येतो. बसंत बहार,बसंत हिंडोल,बसंती केदार,गौरी बसंत हे बसंत रागापासून बनलेले राग.
चैत्र वैशाख हा वसंत ऋतूचा काळ.पण माघातल्या वसंत पंचमी पासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. या वसंतोत्सवाला फाग म्हणतात.यात कृष्ण राधा यांची रासक्रीडा नृत्य व संगीत यातून सांगितली जाते.
केतकी गुलाब जुही चंपक –बसंत बहार , बसंतकी बहार आये ही बसंत बहार रागातील मंदारमाला नाटकातील रम मराठे व प्रसाद सावकार यांनी गायलेली जुगलबंदी,लोचन अम्बुधारांनी हे पयोधर न्हाले हे मृच्च्कटिक नाटकातील पद, बसंत है आया रंगीला,मन भवन संगीत सुहावन अशी काही गाणी आठवतात.
पण सर्व रसांचा राजा शृंगार याला पोषक असा हा राग. वसंत ऋतूचा आनंद द्विगुणीत करणारा.
अनिल जोशी

(रागाबाद्दलचे तांत्रिक तपशील अच्युत गोडबोले –सुलभा पिशवीकर यांचा नादवेध मधून साभार)

मित्र दिवाकर बुरसे याची वसंत ही कविता 
राग वसंत*

मुरलीचे स्वर ऐकुन राधा झाली की बावरी
यमुनातटि हा रंग खेळतो राधा कुंजविहारी
धुंद बसंतातून बहरती रंग रंग फुलपंखी
भिजली राधा, भिजला माधव, भिजली सुरासुरांनी।।१।।

या कुंजावर, त्या कुंजावर।।धृ।।
भ्रमरांचे गुंजारव सुंदर
वसंत फुलला अंगांगावर
जैशी सुमने वृक्षलतांवर
या कुंजावर, त्या कुंजावर।। २।।

कोकिळ बोले आम्रतरूवर
मधुबन नाचे त्या तालावर
रस शृंगारा, येई बहरा
तू तर राणा नऊ रसांवर! 
या कुंजावर, त्या कुंजावर।।३।

🙏🏼🙏🏼🙏🏼

दिवाकर बुरसे, पुणे
९२८४३००१२५ (w.a.)

Comments

  1. हा लेख नेहमीप्नरमाणेच छान लिहिला आहेस अनिल. अभिनंदन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती