मंदिर : राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक
आज अयोध्येत श्रीराम मंदिराच्या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण धार्मिक पद्धतीने केले. आणि अनेक वर्षे अनेक वाद , कोर्टबाजी यात अडकलेला हा प्रकल्प मार्गी लागला. देशात बहुतेक लोकांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. प्रभू रामचंद्र हा देशवासीयांच्या आस्थेचा विषय आहे आणि प्रभू रामचंद्र हे आयोध्येत जन्मले अशी सगळ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे भारताच्या एकात्मकतेसाठी प्रभू रामचंद्र हा महत्वाचा दुवा आहे. अनेक मोगल आक्रमकांनी या देशात सत्ता स्थापन केल्यानंतर येथील श्रद्ध्स्थाने व मंदिरे यांचा विध्वंस करून तेथे मशिदी उभारल्या हे वास्तव आहे. आयोध्येत पण राम जन्मभूमीच्या जागी असलेले भव्य मंदिर उध्वस्त करून तेथे मशीद उभारली गेली व तिला तत्कालीन मोगल सम्राट बाबर याचे नाव दिले गेले. त्या परिसरात एक मंदिर होते ते बंद होते. ते पंतप्रधान राजीव गांधी यांनी उघडायला लावून दिवा लागेल अशी सोय केली. पुढे विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमीत राम मंदिर व्हावे या साठी आंदोलन सुरु केले .त्याच्या जन जागृतीसाठी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी द्वारका येथून आयोध्येपर्यंत रथ यात्रा काढली . त्याचे नियोजन नरेंद्र मोदी यांनी केले होते.
पुढे ती बिहार मध्ये अडवली गेली. हा सगळा इतिहास झाला. यात राजकारण पण खूप झाले. म्हणजे व्ही पी सिंग यांच्या मंडल ला हा भाजपने टाकलेला प्रतिडाव होता. याचा परिणाम म्हणजे १९९१ मध्ये भाजप चे लोकसभेतील संख्या बळ १२० पर्यंत गेले. नंतर प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यात हा विषय राहिला. पुढे भाजप च्या नेतृत्वाखाली सरकार आले तरी इतर पक्षांच्या दबावामुळे तो विषय बाजूला ठेवावा लागला. पुढे २०१४ मध्ये भाजपचे बहुमताचे सरकार आले तरी राज्यसभेत बहुमत नव्हते त्यामुळे कायदा करून हा प्रश्न सोडवणे शक्य नव्हते. दुसरा पर्याय परस्पर सहमतीचा होता. पण तो व्यवहारात येत नव्हता . मग तिसरा पर्याय सर्वोच्च न्यायालायाचा. त्या नुसार निकाल लागला व राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. मग कोरोना संकटामुळे अडचण आली आणि अखेर आज भूमिपूजन झाले.
कोणताही देश म्हणजे फक्त भौगोलिक प्रदेश नसतो. त्यातील लोकांना एकसंध ठेवणारा दुवा म्हणजे तेथील संस्कृती असते. हा संस्कृतीचा वारसा कसा आहे यावर देशाची उभारणी होते. सुदैवाने आपल्याला हा हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. पण स्वातंत्र्यानंतर आपण निधर्मी वादाचा चुकीचा अर्थ लावून हा सांस्कृतिक वारसा नाकारला. यात कम्युनिस्ट चळवळीचा जितका सहभाग आहे तितकाच येथील मुस्लीम समाजाचे मतपेढी म्हणून होणारे तुष्टीकरण पण जबाबदार आहे. आणि याचे मुख्य कारण येथील बहुसंख्य असलेला हिंदू समाज हिंदू म्हणून एकत्र येत नव्हता.
मला आठवतंय की मुस्लीम मतदार वगळून या देशावर राज्य करणे अशक्य आहे हे अधोरेखित झाले होते. सर्व राजकारण्यांनी यासाठी मुस्लीम समाजातील मुल्ला मौलाविना हाताशी धरून ही मतपेढी कायम ठेवली. त्यामुळे मुस्लीम समाज प्रगती पासून दूर राहिला. नरेंद्र मोदी यांनी गुजरात मध्ये हिंदू मतपेढी तयार करून सत्ता मिळवली व राबवली. नरेंद्र मोदी यांना दोन वेळा बहुमत मिळाले त्यात मुस्लीम समाजाचा पण सहभाग असणार. तिहेरी तलाक विषयाने मुस्लीम मतपेढीला खिंडार पडले. यात मुस्लीम अनुनय नव्हता तर मुस्लीम समाजाला प्रगतीच्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न होता.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जो राम मंदिराचा पायाभरणीचा कार्यक्रम झाला त्याचे परिणाम खूप महत्वाचे असणार आहेत. जे राम मंदिर उभे राहील ते केवळ एक मंदिर नसेल तर ते भारतीय अस्मितेचे प्रतीक असेल. कारण आता या समाजाला एक चेहरा मिळेल. या निमित्ताने समाजात एक मोठी जागृती झाली आहे. आणि वर्षानुवर्षे या देशाला सांस्कृतिक वारशापासून लांब ठेवणाaऱ्या सर्व विरोधकांची पोटदुखी आहे. इतकी वर्षे उभा केलेला हा भ्रमाचा भोपळा फुटत आहे . त्यामुळे मग आरोप होतात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भूमिपूजन केले व मंदिर पूर्ण होईल त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत होणार याची धडकी भरली आहे. निवडणुका येतील, सरकारे येतील , जातील पण अयोध्येत उभे आलेले राम मंदिर हे देशाला प्रेरणा देत राहील. या समाजाला आपल्या वारशाची जाणीव होत राहील. त्यामुळे हे मंदिर हे फक्त मंदिर न राहता ते राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असेल..
अनिल जोशी
०५.०८.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
खूप छान लिहिलंय! ज्यांना फक्त स्वार्थासाठी पक्ष, पक्षासाठी सत्ता एवढंच कळतं त्यांना ' अस्मिता ' तीही राष्ट्रीय?
ReplyDeleteपण या ' प्रतिका ' ने सगळेच जागे होतील हे मात्र नक्की , झोपलेले आणि झोपेचं सोंग घेतलेलेही !
- उदय ठेकेदार