तम निशेचा सरला
रात्र आणि अंधार यांचे अतूट नाते असते. किंबहुना अंधार पडू लागला के रात्र आली किंवा रात्र झाली की अंधार पडणार हे गृहीतच असते. पण रात्र हा शब्द तितकासा भयावह वाटत नाही जितका अंधार वाटतो. अंधार या शब्दात एक नकारात्मकता आहे. पण रात्र मात्र सुंदर वाटते. आणि रात्र म्हटली की अनेक गाणी आठवतात.
चोरी चोरी या चित्रपटातील ये रात भिगी भिगी हे गाणे आठवते.तो राजबिंडा राज कपूर आणि त्याच्या बरोबर नर्गिस . शंकर जय किशन यांच्या सुरावटी. , मन्ना डे यांचा आवाज. आणि कृष्ण धवल चित्रणाच्या मर्यादा असून सुद्धा पोषक असे चित्रण. हे गाणे ऐकणे म्हणजे खूप तरल अनुभव आहे . यात अंधाराचा कुठे मागमूस ही नाही .
रात्र आणि विरह यांचे पण असेच आहे. कुणी म्हणतात विरहात रात्र मोठी प्रेमी जनांस वाटे. जेव्हा श्रावणधारा बरसत असतात आणि येणारा प्रियकर आला नाही की विरहात झुरणाऱ्या प्रेमिकेची अवस्था या गाण्यात किती छान मांडली आहे..
रिमझिम झरती श्रावण धारा धर्तीच्या कलशात
प्रियावीण उदास वाटे रात.
बरस बरस तू मेघा रिमझिम आज यायचे माझे प्रियतम
बरस असा की प्रिया न जाईल मा
घा ये आकाश.
म्हणजे कवी म्हणतो इतका पण बरसू नकोस की प्रियकर येणार नाही आणि तो आल्यावर इतका बरस की तो जाऊच शकणार नाही. रैना बित जाये , शाम न आये या गाण्यात पण विरहातच सरत असलेल्या रात्रीची व्यथा आहे.
रात्रीस खेळ चाले हा गूढ सावल्यांचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
या गाण्यात रात्रीच्या गूढतेचा खेळ जाणवतो. आणि रात्रीची ही गूढ अशी ही भावना अंधारामुळे जाणवते ती मात्र अंधारामुळे. आपण एखाद्या भाय पटात अनेक वेळा तशी दृश्ये पहात आलो आहोत. सुनसान हवेली, तिचा तो कुरकुरणारा दरवाजा, मीणमीणता कंदील हातात घेऊन फिरणारा चौकीदार, दुरून ऐकू येणारा कुत्र्याच्या रडण्याचा भेसूर आवाज असा एकदम गूढ वातावरण निर्माण करणारा प्रसंग अनेकदा पहिला आहे. त्यामुळे गूढ अशी पण एक रात्रीची छटा आहे.
मिलन हा तर रात्रीचा स्थायीभाव आहे.
आली हासत पहिली रात
उधळत प्राणांची बरसात
या गाण्यात मीलनोत्सुक प्रेमिकेची भावना छान व्यक्त झाली आहे.
तेरे मेरे मिलनकी ये रैना
नाय कोई गुल खिलायेगी
अभी तो चंचल है तेरे नयना
या गाण्यात रात्रीबद्दल किती सुंदर भावना व्यक्त केली आहे.
रात्र म्हटली की निराशा पण जाणवू शकते. एखादा वाईट काळ असला की त्याला रात्रीच्या अंधाराची उपमा देतात. आणि असं पण सांगितलं जात की ही रात्र सरणार आहे आणि नवीन दिवस उगवेल तो नवीन असेल. हा आशावाद असतो तो त्या निराशेवर मात करण्याचा. कारण दिवस आणि रात्र हे दिनचक्र आहे. अव्याहत चालणारे .
सामान्यत: रात्र ही झोपेत निघून जातो. रात्र संपल्याची जाणीव घड्याळाचा गजर करून देतो. त्यावेळी आपण गजर करणाऱ्या घड्याळावर चिडतो पण . कारण रात्र संपली तरी डोळ्यांवरची झोप उडालेली नसते. त्यामुळे रात्र आणि झोप यांचे पण एक असेच घट्ट नाते आहे.
रात्र म्हटली की आणखी काही गोष्टी आणखी आहेत. गाण्याच्या मैफली , नाटके हे रात्रीचे रंग आहेत. तशी नाटके किंवा मैफली दिवसा पण होतात पण पु ल देशपांडे यांच्या शब्दात या सगळ्या चांदोबाच्या राज्यातील गोष्टी आहेत. दिवसावर सूर्याचा अधिकार असतो तर रात्र ही चांदोबाची .
गप्पांची मैफल रंगलेली असताना अचानक लक्षात येत की रात्र संपली की. मग म्हणतात रात्र सरली तरी गप्पा नाही संपल्या.
असे हे रात्रीचे विविध रंग आणि त्यांच्या छटा. मग पहाटे कुणीतरी ललत गावून रात्र संपत आल्याची जाणीव करून देते . कुणी भूपाळी गातो. पण त्यात भाव एकच अतो-
तम निशेचा सरला
अरुण कमळ प्राचीवर फुलले
परिमल या गगनी भरला
अनिल जोशी
०९.०८.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी.
छानच जमला आहे मेळ लेखाचा !
ReplyDeleteसुंदर!!
ReplyDeleteमस्त मस्त!
ReplyDeleteसुरेख वर्णन
ReplyDelete