ब्लॉग कशासाठी

काल १०० वा ब्लॉग लिहिल्यानंतर आज हे ब्लॉग कशासाठी या प्रश्नाचे माझ्या परीने शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिले कारण म्हणजे लिहिण्याची उर्मी . बरेच काही लिहावेसे वाटत असताना व्यक्त व्हायला मला हे मध्यम जास्त योग्य वाटले. गेले काही महिने उत्तम कथा मासिकातून मी दरमहा लिहित आहे आणि त्या मुळे माझी लेखनाची भूक वाढली आहे. साधारण पणे राजकारण व त्या अनुषंगाने हे लिखाण झाले. पण केंद्रातील व राज्यातील निवडणुका होवून गेल्याने राजकीय धुरळा खाली बसला आहे. राज्यात आता नवीन राजकीय समीकरण उदयास आले आहे व नवीन सरकार ने कार्यभार स्वीकारला आहे. या काळाला राजकीय मधुचंद्राचा काळ मानले जाते व फार काही राजकीय आंदोलने वगैरे होत नाहीत. त्यामुळे उत्तम कथा मध्ये पण मी चित्रपट, रंगभूमी , संगीत अशा विषयांवरच लहिले आहे. याचाच परिणाम म्हणजे ब्लॉग वर पण राजकारण खूप कमी लिहिले आहे आणि अन्य विषय हाताळले आहेत. १००व्या ब्लॉग नंतर ब्लॉग मध्ये हाताळलेले विविध विषय यांचे कौतुक झाले आहे.
आता ब्लॉग रोज लिहायला हवा का असा एक प्रश्न येतो. याचे उत्तर हो असेच आहे . कारण सातत्य असणे आवश्यक आहे  ते असेल तरच ब्लॉग प्रस्थापित होवू शकेल अर्थात तो खूप लांबचा पल्ला आहे .पण सातत्य हवे. अर्थात सगळे लेख चांगलेच होतील असे नाही पण सातत्य असेल तर ते जास्त चांगले होण्याची शक्यता असते.
हे ब्लॉग वाचून अनेकांच्या जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला आणि ही नक्कीच समाधानाची बाब आहे. हे लिहित असताना आणखी एक हेतू होता तो म्हणजे या छोया व सामान्य आयुष्यात काही अविस्मरणीय घटना व प्रसंग आले व ते लिहून ठेवावे वाटले. कारण हे व्यक्तिगत अनुभव असले तरी त्यांना एक संग्राह्य मूल्य आहे.
मग ती मंगेश पाडगावकर यांच्या बरोबरची गप्पांची मैफल असो, किंवा अचानक पुरुषोत्तम दारव्हेकर भेटतात आणि कट्यार मधील खान साहेबाच्या भूमिकेसाठीचा शोध  वसंतराव देशपांडे यांचे मेघमल्हार नाटक पाहत असताना कसा संपला हा किस्सा असो किंवा कवी किशोर पाठक याचे निधन झाल्याचे समजले तेव्हा सदाचार वसती गृहाच्या गच्चीवर वळवाच्या पावसात चिंब भिजल्याची आठवण असो. हे सगळ कुठेतरी लिहून ठेवायला हा ब्लॉग उपयोगी पडला.
या ब्लॉग बद्दल श्री मनोहर पारळकर यांच्याशी बोलताना त्यांनी एक मुद्दा सांगितला. ते म्हणाले की मोठे लेख वाचायला कुणाला वेळ नसतो तेव्हा ते छोटेच हवेत. त्यांचा हा सल्ला मी बहुतांशी पाळला आहे.
हे रोज लिहिणे अवघड नाही का? तर इतक्या वर्षांच्या लेखनाच्या सरावाने लिहायला बसल्यावर लिहिणे अवघड नाही. पण काय लिहायचे हे सुचणे हे अवघड व महत्वाचे आहे. याची प्रक्रिया २४ तास सुरु असते.या निर्मिती प्रक्रियेेे मधे निराशाा ,मरगळ या गोष्टी पासून दूर राहते व सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 
आणखी एक प्रतिक्रिया मित्र आदित्य जोशी याने दिली.तो म्हणाला की साधी सरळ भाषा व आशय या साठी ब्लॉग वाचनीय आहेत आणि या गोष्टी समाजामध्ये दुर्मिळ आहेत.मग या साठी तरी हे लेखन हवेच. 
आता  कदाचित हाही आठवणी व प्रसंग परत लिहिले जातील पण वेगळ्या संदर्भात. तेव्हा उद्यापासून पुन्हा नवीन विषय , नवीन काहीतरी . ही शोधयात्रा अशीच चालू ठेवू तुमच्या सहकार्याने.

अनिल जोशी 
०२.०४.२०२०
कृपया आपली प्रतिक्रिया आपल्या नावासह द्यावी. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्पेशल नात्याचे गाव - देवरुख

डोळे हे जुलमी गडे

राग मधुवंती